रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा दोन दिवसांपूर्वीच म्हणजे २३ मार्च २०२२ रोजी करोनामुक्त झाला होता. आज (२५ मार्च) झालेल्या तपासणीत पुन्हा एक नवा करोनाबाधित आढळला आहे. हा रुग्ण चिपळूण तालुक्यात आढळला असून, तो गृह विलगीकरणात आहे. जिल्ह्यात करोनाप्रतिबंधक लसीकरण वेगाने सुरू असून, १२ ते १४ वयोगटाच्या लसीकरणालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
जिल्ह्यात करोनाचे आतापर्यंत ८४ हजार ४६७ रुग्ण आढळले असून, त्यापैकी ८१ हजार ९३२ म्हणजे ९७ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
जिल्ह्यात आज (२५ मार्च) झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ९४ पैकी ९३ जणांचे आणि रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या सर्व २५३ अशा ३४६ जणांचे नमुने निगेटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील नऊ लाख ३४ हजार ८९३ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात एक करोनाबाधित रुग्ण आहे. त्या रुग्णाला कोणतीही लक्षणे नाहीत. त्यामुळे तो गृह विलगीकरणात आहे. रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही.
जिल्ह्यात कोरोनामुळे २५३४ जणांचा बळी गेला. एकूण मृत्युदर ३.०० टक्के आहे.
जिल्ह्यातील मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२३, खेड २३१, गुहागर १८२, चिपळूण ४९०, संगमेश्वर २२९, रत्नागिरी ८४१, लांजा १३२, राजापूर -१६७. (एकूण २,५३४).
जिल्ह्यातील लसीकरण
रत्नागिरी जिल्ह्यात २४ मार्च रोजी करोनाप्रतिबंधक लसीकरणाची ६७ सत्रे पार पडली. त्यात १७५१ नागरिकांनी लशीचा पहिला, तर ११२९ जणांनी दुसरा डोस घेतला. शिवाय ९२ जणांनी बूस्टर डोस घेतला. १२ ते १४ वयोगटातल्या १६१३ जणांना २४ मार्च रोजी पहिला डोस देण्यात आला. एकूण २९७२ जणांचे लसीकरण २४ मार्च रोजी झाले. २४ मार्चपर्यंतच्या एकूण आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १८ वर्षांवरच्या १० लाख ५४ हजार १७ जणांचा पहिला, तर ८ लाख ८१ हजार ४४८ जणांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण २० लाख ४७ हजार ९८० जणांचे लसीकरण झाले आहे.