Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

‘ब्लू मॉरमॉन’ आले हो अंगणी

Advertisements

भारतात ‘सदर्न बर्डविंग’ या फुलपाखरानंतर सर्वांत मोठे फुलपाखरू असल्याचा मान मिळालेले, महाराष्ट्राचे ‘राज्य फुलपाखरू’ ‘ब्लू मॉरमॉन’ आज (१० एप्रिल २०२२) चिपळूण येथे आमच्या खेण्ड निवासस्थानी अंगणी बागडताना पाहून सध्याच्या उन्हाच्या तीव्र कडाक्यातही परसदारी नैसर्गिक शांतता अनुभवायला मिळाली. कोकणाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या शहरात वर्षभर सामान्यपणे आढळणारे हे फुलपाखरू श्रीरामनवमीदिनी प्रत्यक्ष आपल्या परसदारी अनुभवण्याचा आजचा आनंद केवळ शब्दातीत होता.

पावसाळा आणि त्यानंतरच्या काळात हे फुलपाखरू अधिक ठिकाणी आढळून येत असताना सध्याच्या दिवसात त्याने सहज दर्शन दिल्याने निसर्गाबद्दलची नामिक ओढ अधिक तीव्र होण्यास मदत झाली.

‘ब्ल्यू मॉरमॉन’ फुलपाखराप्रमाणे प्राणी शेकरू, पक्षी हरियाल, वृक्ष आंबा, फूल जारुळ ही आपल्या राज्याची मानचिन्हे आहेत. हे फुलपाखरू भारतील भारतातील पश्चिम घाट, दक्षिण भारत, पूर्व किनाऱ्यासह श्रीलंकेतही आढळते. शास्त्रीयदृष्ट्या ब्लू मॉरमॉन (राणी पाकोळी ; Papilio polymnestor) च्या पंखांचा विस्तार १२० ते १५० मिमी असतो. मखमली काळ्या रंगाच्या ब्लू मॉरमॉनच्या पंखावर निळ्या रंगाच्या चमकदार खुणा असतात. चार आकर्षक पंख, अंगावर संवेदना असणारी लव ही याची अधिकची वैशिष्ट्ये आहेत. याच्या पंखाच्या खालची बाजू काळी असते. शरीराकडील एका बाजूवर काही लाल ठिपकेही असतात. लिंबू, संत्रे, बेल या या फुलपाखराच्या आवडत्या वनस्पती आहेत, असे कुठेतरी वाचलेले आठवते. कदाचित परसदारच्या बेलाच्या झाडाने त्याच्या सध्याच्या चैत्रपालवीने तर याला आकर्षित केले नसेल ना? फुलपाखराचे अस्तित्व असणे हा जैवविविधतेच्या समृद्धतेचा पुरावा असल्याने आणि आपल्या परसदारी हे शक्य असल्याने समाजाने निसर्गाकडे अधिक सजगतेने पाहायला हवे आहे.

जास्त पाऊस असलेल्या सदाहरित जंगलासह पानगळीच्या जंगलातही हे फुलपाखरू आढळते. त्याचे एका दिशेने वेगात उडणे आणि उडताना सतत मार्ग बदलणे, वर-खाली उडणे सारे माहिती असल्याने छायाचित्र घेता येईल का? असाही प्रश्न असतो. पण आमच्या अंगणी त्याला विशेष कोणताही अडथळा येईतोपर्यंत अगदी वाऱ्याच्या हलक्या झुळूकीतही पान हलूनही ते पानावरून हललेले नव्हते. एखाद्या पानावर बसून ते क्षार शोषायला लागले की ते सहसा विचलित होत नसल्याचा हा परिणाम असावा. किंवा दुपारच्या उन्हाच्या कडाक्यात ते आपले पंख उघडे ठेवून विश्रांती घेत असल्याने फोटो चक्क मोबाइलवर टिपण्याची लॉटरी लागली असावी. कारण त्याच्या अगदी जवळ गेलो तरी त्याला काही फरक पडलेला नव्हता. सह्याद्रीतील जंगल वाटा आणि झऱ्यांवर याला अनेकदा पाहिलेले आहे. शहरातील बागांमध्ये, मुंबई, पुणे, बेंगलोर अशा शहरांत अगदी वाहतुकीच्या गर्दीत हे फुलपाखरू आढळून आल्याच्या नोंदी आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्या अंगणी त्याला आल्याचे पाहून मिळालेले समाधान केवळ अवर्णनीय !

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version