‘कोकणातील कातळसडे, खाजणे आणि देवरायांत फुलपाखरांचा सर्वाधिक आढळ’

चिपळूण : आंबोली, पारपोली, मार्लेश्वर, तिल्लारी, गगनबावडा, आंबाघाट, चांदोली परिसर, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी किनाऱ्यावरील खाजण वने आदींसह कातळसडे आणि देवराया हा वैशिष्ट्यपूर्ण फुलपाखरांचा अधिवास असल्याचे प्रतिपादन देवरूख (संगमेश्वर) येथे, आपल्या परसदारी फुलपाखरू उद्यान ही संकल्पना यशस्वी करणारे वन्यजीव अभ्यासक प्रतीक मोरे केले. वन विभाग रत्नागिरी (चिपळूण) आणि मानद वन्यजीव रक्षक नीलेश बापट यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच ‘रत्नागिरी जिल्ह्यातील फुलपाखरांची जैवविविधता, संवर्धन आणि उद्यान निर्मिती’ या विषयावरील वेबिनार व्याख्यानात मोरे बोलत होते.

मोरे यांनी आपल्या व्याख्यानाची सुरुवात पश्चिम महाराष्ट्रातील चार प्रकारच्या जंगलांची माहिती देऊन केली. जागतिक वारसा स्थानांसहित २ संरक्षित जैविक क्षेत्रे, १३ उद्याने, अभयारण्ये आदींचा समावेश राज्यातील जंगलांत होत असून, त्यात जागतिक स्तरावर नष्ट व्हायला आलेल्या ३२५ प्रजाती असल्याचे त्यांनी सांगितले. कोकणातील कातळसडे आणि खाजणात फुलपाखरांचा अधिक अधिवास असून, सिंधुदुर्गातील आंबोलीनजीकच्या पारपोली गावात फुलपाखरांच्या २०५पेक्षा अधिक प्रजातींची नोंद झाल्याची माहिती त्यांनी दिली. पारपोली हे अशी नोंद होणारे महाराष्ट्रातील एकमेव गाव आहे. २०१६मध्ये मलबार नेचर कॉन्झर्वेशन क्लबतर्फे आयोजित बटरफ्लाय फेस्टिव्हलमध्ये हे फुलपाखरांचे गाव म्हणून घोषित झाल्याचे त्यांनी नमूद केले.

या वेळी त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात आढळणाऱ्या विविध फुलपाखरांच्या शरीराच्या रचनेविषयी, आयुष्य, प्रजातींविषयी, जीवनपद्धतीविषयी सविस्तर माहिती दिली. फुलपाखरांच्या पंखाला सहज हात लावला असता आपल्या हाताला धुरळ्यासारखे लहान रंगीत कण लागतात. सूक्ष्मदर्शकाखाली पाहिले असता हे कण बारीक, चपट्या खवल्यांसारखे दिसतात. हे खवले पोकळ, बारीक पिशवीसारखे असतात. या पोकळीत अत्यंत सूक्ष्म कण भरलेले असतात, असे ते म्हणाले.

बहुसंख्य फुलपाखरे दिवसा संचार करतात. रात्री विश्रांती घेतात. ती फार चपळ असतात. या कीटकांना जबडे नसतात. त्यांना घनपदार्थ चावा घेऊन खाता येत नाही. त्यांच्या तोंडात एक शुंड असते. ती घड्याळातील स्प्रिंगप्रमाणे गुंडाळलेली असते. अन्नभक्षण करण्याच्या वेळी ही गुंडाळलेली शुंड उचलून, तिच्या साह्याने फुलांतील मकरंदाचे चोषण केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. फुलपाखरांच्या जीवनावस्था निसर्गत: कमकुवत असतात. पक्षी, सरडे, मांसाहारी कीटक, कोळी हे त्यांचे प्रमुख शत्रू आहेत. शत्रूंपासून संरक्षण करण्यासाठी त्यांना तीक्ष्ण संरक्षक अवयव नसतात. शत्रूंपासून संरक्षण करण्यासाठी त्यांच्या जीवनावस्थांचा रंग आणि आकार परिस्थितीशी एकरूप असल्याचे मोरे म्हणाले. फुलपाखरांची आयुर्मर्यादा ही वातावरणातील तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश यांवर अवलंबून असते. हिवाळ्यात यांची प्रत्येक अवस्था दीर्घकालीन असते. उन्हाळ्यात ती अल्पकालीन असते. काही फुलपाखरांच्या एका वर्षात २/३, तर काहींची एकच पिढी निर्माण होत असल्याचे ते म्हणाले.

फुलपाखरे ही पर्यावरणीय बदलांचा नैसर्गिक दर्शक असून जगात त्यांच्या वीस हजाराहून अधिक प्रजाती आढळतात. यावेळी मोरे यांनी जिल्ह्यात आढळणाऱ्या विविध फुलपाखरांविषयी माहिती दिली. फुलपाखरांना सौंदर्याचे वरदान लाभलेले आहे. इकोसिस्टीमसह परागीभवन आणि अन्नसाखळीतील त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे त्यांनी नमूद केले. कित्येक फुलपाखरे आपल्याकडे टोळ्यांप्रमाणे जास्त पावसाच्या एका प्रदेशातून तुलनेने कमी पावसाच्या प्रदेशात स्थलांतर करतात. फुलपाखरे हवेत कित्येक तास उडत राहतात. ती नद्या, डोंगर, समुद्र आदी अडथळे सहज पार करतात. त्यांच्या स्थलांतराचे निश्चित कारण अद्याप समजू न शकल्याचे मोरे यांनी सांगितले.

चिखल, कुजलेले पदार्थ, प्राण्यांचा घाम यातून फुलपाखरांना क्षार, खनिजे, सोडियम, अमिनो आम्ले शोषून घेता येतात. फुलपाखरांना ऱ्हास होणारी जंगले, नष्ट होणारा अधिवास, वणवे, जमीन आणि वातावरणातील बदल यांचा त्रास होत असल्याचे मोरे म्हणाले. पर्यावरण शिक्षण घडावे, फुलपाखरांचा अधिवास अभ्यासला जावा, टुरिझम बहरावे, नेचर ट्रेल्स, संख्यात्मक वाढ, संरक्षण आणि संवर्धन, संशोधन, छंद आदी कारणांसाठी फुलपाखरू उद्याने तयार व्हायला हवी असल्याचे आपल्या व्याख्यानाच्या अखेरच्या टप्प्यात मोरे यांनी म्हटले. जगात फुलपाखरांचा अभ्यास मागील काही वर्षांपासून विशेष प्रमाणात होत आहे. यासाठीच्या आवश्यक असणाऱ्या बाबीही या वेळी मोरे यांनी नमूद केल्या.

फुलपाखरांमध्ये औषधी गुणधर्म नाहीत. रंगद्रव्यामध्ये फुलपाखरांचा उपयोग होतो, पण हे प्रकार आपण थांबवायला हवेत, असे मत मोरे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादरम्यान मांडले.

सुरुवातीला सर्वांचे स्वागत आणि वेबिनारची भूमिका याबाबत विभागीय वनाधिकारी दीपक खाडे यांनी मार्गदर्शन केले. मानद वन्यजीव रक्षक नीलेश बापट यांनी प्रास्ताविक केले. सहायक वनसंरक्षक सचिन निलख यांनी सर्वांचे आभार मानले. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख वन कर्मचाऱ्यांसह ठाणे, मुंबई, रत्नागिरी, पुणे, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आदी ठिकाणहून अभ्यासक आणि जिज्ञासू पर्यावरणप्रेमी वेबिनारमध्ये सहभागी झाले होते.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply