‘तांबट’ पक्ष्याचा फराळ!

दिवाळीच्या दिवसांत परसातल्या उंबराच्या झाडावर फळं खाणाऱ्या तांबटाच्या जोडीचं सुखद दर्शनधीरज वाटेकर यांना घडलं आणि त्यांच्या फराळाचा सोहळा त्यांना अनुभवता आला, त्याबद्दल त्यांनी लिहिलेला हा लेख…
…..

दीपावलीच्या चौथ्या दिवशीची, रविवार (१५ नोव्हेंबर २०२०) सकाळची घटना. पूर्वेकडल्या दारात बांधलेल्या किल्ल्यावर सूर्याची कोवळी किरणं पडण्याच्या तयारीत होती. किल्ल्यावर उशिरा पेरलेले धान्यही किंचितसे उगवून आलेले. किल्ल्यावर पाणी शिंपडण्याच्या हेतूने मावळ्यांना ‘थोडी विश्रांती घ्या’ म्हणत जमिनीवर उतरवलं. पत्नीला भोवताली साधीशी रांगोळी काढायला सांगितली. बहिणीने पुण्याहून मावळे पाठविल्याने गेल्या वर्षीच्या सैन्यदलात चांगलीच भर पडलेली. लेकासोबत छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या मावळ्यांना किल्ल्यावर पुन्हा स्थानापन्न करत असताना पश्चिमेकडच्या उंबरावरची फळं जमिनीवर पडत असल्याचा आवाज आला. झाडावरून पडणाऱ्या उंबराच्या फळांच्या आवाजाचा वेग नेहमीपेक्षा जास्त असल्यानं उत्सुकता ताणली गेली. थोडं बारकाईनं पाहिलं, तेव्हा डोके, छाती आणि कंठ तपकिरी रंगाचा असलेल्या तांबट पक्ष्याची (Brown Headed Barbet) जोडी पिकलेल्या उंबराच्या फळांच्या फराळाचा आस्वाद घेताना दिसली. ‘तांबट’ पक्ष्याचा हा दिवाळी फराळ कार्यक्रम तीसेक मिनिटे चालला. एरव्ही कॅमेऱ्याची चाहूल लागताच उडून जाणाऱ्या ‘तांबट’ची त्या दिवशीची कृती मात्र पर्यावरणीय कारणे आमची दीपावली सुखद करून गेली.

दीपावलीचा पहिला दिवस अशी मान्यता असलेल्या वसुबारसेच्या सकाळी परिसरातील बालमावळ्यांनी साकारलेल्या किल्ल्यावर शेवटचा हात फिरवून तातडीच्या प्रवासाला निघालेलो, तो परतायला धनत्रयोदशीची रात्र झाली. घरून निघताना किल्ल्यावर धान्य पेरणी केलेली. तिसऱ्या दिवशी नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान आटोपल्यावर लगबगीनं किल्ल्यावर महाराजांना आणि मावळ्यांना स्थानापन्न केलं. छानसे फोटोही घेतले. करोनाच्या संकटात दीपावलीचा आनंद विशेष नसला, तरी काळासोबत चालायला हवं. यंदा अभ्यंगस्नानानंतर ग्रामदेवतेच्या दर्शनाला जाणं, घरचा फराळ अर्पण करणंही शक्य झालं नाही. अशात दिवस सरला. दीपावलीच्या चौथ्या दिवशी सकाळी किल्ल्यावर पेरलेले धान्य उगवू लागल्याचे लक्षात आले. तिकडे लक्ष देत असताना परसदारातल्या उंबरावरच्या पिकल्या फळांच्या जमिनीवर पडताना होणाऱ्या आवाजाने लक्ष वेधून घेतले. जवळपास अर्धा डझनहून अधिक खारुताईंची टीम परसदारी आंबा, नारळ आणि उंबरावर फळे खायला कायम कार्यरत असते. निसर्गनियमानुसार सकाळी त्यांचा खाण्याचा वेगही अधिक असतो. फळे खाताना बरीचशी जमिनीवरही पडतात. तेव्हा आवाज येतो. आता हे सवयीचे झालेले; पण आजच्या आवाजाचा वेग कानाला अधिक जाणवला. म्हणून पाहिलं तेव्हा ‘तांबट’ पक्ष्याचा जोडीनं दीपावली फराळ आनंद कार्यक्रम सुरू असल्याचं दिसलं. या जोडीला पाहताच दुसरं काही सुचेचना. किल्ल्यावरील मावळे चटकन स्थानापन्न करून आम्ही तांबटांच्या दिवाळी फराळ कार्यक्रमाचा आनंद घेण्यास सज्ज झालो. त्या आनंदात काही फोटोही घेतले; मात्र दोघे तांबट स्वतंत्रपणे फलाहार करण्यात मग्न होते. दारातल्या उंबराला फळे धरू लागल्यावर तांबटाचे एकट्याने येणे आम्हाला नवीन नाही. तसे विविध पक्षी येत असतात; पण दीपावलीच्या, फटाक्यांच्या आवाजी वातावरणात सकाळी सकाळी यांचे जोडीने येणे नाही म्हटले तरी सुखद पर्यावरणीय अनुभूती प्रदान करणारे होते.

गेली काही दशके वर्षे फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनी आणि वायुप्रदूषणाचा, त्यांच्या अतितीव्र प्रकाशाचा पशु-पक्ष्यांवर परिणाम होत असल्याचे आपण वाचतो आहोत. पक्ष्यांच्या स्थलांतरणाचाही हा काळ असल्याने अनेक स्वयंसेवी संस्था, पक्षिप्रेमी, अभ्यासक, संशोधक याबाबत समाजात सतत जागरूकता निर्माण करण्याचे काम करत असतात. दीपावलीतील रॉकेट्ससारख्या फटाक्यांमुळे पक्ष्यांची झाडावरील घरटी जळण्याचा धोका असतो. फटाक्यांच्या आवाजाचा सर्वाधिक परिणाम चिमण्यांवर होत असल्याचेही वाचल्याचे आठवते. तशी मलाही यंदा दीपावलीत परसदारी चिमणी दिसली नाही. गेल्या वर्षी देशातल्या काही शहरांत फटाके फोडण्याचे, पर्यायाने पशु-पक्षी जखमी होण्याचे प्रमाण कमी झाल्याचे नोंदवले गेले आहे. तमिळनाडूतल्या वेल्लोडसारख्या पक्षी अभयारण्यात शेकडो कुटुंबे पशू आणि पक्ष्यांसाठी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करत असल्याचेही मागे वाचले होते. आमचे मात्र आजही दाट लोकवस्तीच्या शहरात फटाके वाजविणे सुरू आहे. लहानग्यांना समजावताना अडचणीचे होते; पण मोठ्यांनी तरी हा मोह टाळायला हवा. फटाके उडविण्याची पद्धत हजारो वर्षे जुनी असली तरी वर्तमानात ती किती उपयोगात आणावयाची, याचे तारतम्य प्रदूषित जगात आपण बाळगायला हवे. आमच्या बालपणी भुईचक्र, लवंगी फटाके, फुलबाजे, पाऊस, एखाद-दुसरा दादा बॉम्ब, एवढेच फटाके असायचे. आता त्यात खूप वाढ झाली आहे. नवनवीन प्रकार आलेत. पूर्वीची लवंगी फटाक्यांची छोटी माळ आता मोठया आकारात कित्येक मीटर लांब झाली आहे. दीपावलीसारख्या उत्सवी काळात या विषयावर सातत्याने चर्चा झडतात. रोजगाराचा सारासार विचार करून सरसकट फटाकेबंदीला विरोधही केला जातो. फटाकेबंदीमुळे चोरट्या विक्रीला बळ मिळू शकते असाही एक मतप्रवाह आहे. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांवर बंदी आणावी असा काहींचा विचार असतो. काही जण प्रदूषणविरहित फटाक्यांना प्राधान्य देण्याचा विचार मांडतात. तरीही काही गोष्टी आम्ही आपणहून समजून कमी करायला हव्यात.

… तर आजच्या फटाक्यांच्या आवाजात, जमिनीवर कमी उतरणाऱ्या वृक्षवासी तांबटाला सकाळच्या सूर्यप्रकाशात उंबराच्या झाडावर बसून फराळ करताना पाहण्यात खूप मजा आली. त्या दोघांमधला एक जण तर आपल्या चोचीत उंबराच्या फळांचा नुसता बकाणा भरत होता. त्यांच्या आजच्या वावरात भीती दिसत नव्हती. त्यांना न्याहाळताना मला ज्येष्ठ साहित्यिक स्नेही प्रल्हाददादा जाधव यांनी लिहिलेल्या ‘तांबट’ पुस्तकाची आठवण झाली. दीपावलीच्या दिवसांत निमशहरी भागात सकाळ-संध्याकाळी फटाके वाजविण्याच्या मुहूर्तावर परसदारी शुकशुकाट असतो. यंदा करोनाकारणे, फटाक्यांचे आवाज काहीसे कमी झाल्याने पक्ष्यांची हालचाल जाणवत होती. प्रस्तुतचे तांबट पक्षी उभयता म्हणूनच चटकन उडून न जाता फराळ करीत बसले असावेत! नंतर दुपारी, भोजनसमयी एक कोकीळही उंबरावर येऊन विसावलेला; पण तो मला पाहून चटकन उडाला, बहुदा त्याला आज फराळात रस नसावा. सोमवारी, दीपावलीच्या पाचव्या दिवशीही सकाळी तांबट आलेला, पण एकट्याने! आणि मला बघताच तोही उडून गेला. जाण्यापूर्वी मात्र त्याने २/३ वेळा ‘कुटरुक् कुटरुक् कुटरुक्’ एकसुरी आवाज ऐकवून मला मोहवून टाकलं, प्रस्तुतचा मजकूर लिहायला प्रोत्साहन दिलं.

खरे तर उंबराच्या झाडाची दारात होणारी पानगळ, फळांची पडणारी रास यांना कितीही नाही म्हटले तरी मी कंटाळलोय. शहरी वातावरणात, मर्यादित जागेत यांचे करायचे काय, असे गेल्या दहा-बारा वर्षांत अनेकदा वाटून गेले आहे. एक-दोनदा उंबराच्या काही फांद्या तोडूनही झाल्यात. आत्ताही तोडायच्यात; पण सकाळ-दुपार-संध्याकाळी झाडावर बसलेलं पक्षीवैभव न्याहाळताना फांद्या छाटण्याचा विचार आपोआप गळून पडतो आहे. गेली दोन-तीन वर्षे हे असेच चालले आहे. यंदा तर पानगळीचा आणि फळांचा त्रासही वाढला. आगामी दिवसांत काही फांद्या छाटण्याचे जवळपास निश्चित केले असताना तांबटाच्या जोड्याने ऐन दीपावलीत फलाहाराच्या (फराळ) निमित्ताने दिलेले हे दर्शन मला पुन्हा माझ्या विचारापासून परावृत्त करू पाहते आहे.

 • धीरज वाटेकर
  (‘पर्यटन आणि चरित्र लेखन’ या विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक; कोकण इतिहास, ग्रंथ चळवळ, पर्यटन, पर्यावरण, सामाजिक जागृतीपर विषयात गेली २० वर्षे कार्यरत पत्रकार)
  पत्ता : ‘विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेंड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी.
  मोबाइल : ९८६०३६०९४८
  ई-मेल : dheerajwatekar@gmail.com
  ब्लॉग : dheerajwatekar.blogspot.com

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply