गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांना डोंबिवलीत सांगीतिक श्रद्धांजली

डोंबिवली : येथे दर वर्षी कुलकर्णी परिवार गानसरस्वती किशोरी आमोणकर महोत्सव २०१७ पासून आयोजित करतात. यावेळी तब्बल दोन वर्षांनी हा महोत्सव खूप देखण्या पद्धतीने पार पडला.

कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात “कलर्स ऑफ व्हायलीन” हा वेगवेगळ्या संगीताचा आविष्कार असणारा एक अनोखा प्रयोग रायकर व्हायोलिन अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी व्हायोलिन वादक पं. मिलिंद रायकर सरांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला.
सरांना तब्बल २१ एक वर्षे किशोरीताईंची तालीम मिळाली होती.


किशोरीताई आपले गाणे सादर करताना अनेकदा कॉर्ड्सचा पण प्रयोग करायच्या आणि मिलिंद सरांनी पण तसे कधीतरी करावे, असेही सुचवायच्या. एकदा एनसीपीएला फ्रेंच कलाकारांसोबत ताईंनी म्हारो प्रणाम.. हे भजन गाताना या तऱ्हेचा प्रयोग केला होता.


यावेळी डोंबिवलीच्या कार्यक्रमात सरांनी तो प्रयोग स्मरणात ठेवून त्याचा उपयोग केला. आपल्या विद्यार्थ्यांकडून त्या तऱ्हेच्या हार्मनीचा संयतपणे वापर करत बँकग्राउंड संगीत तयार केले आणि यज्ञेशने व्हायोलिनवर म्हारो प्रणाम सादर केले तेव्हा रसिक पुलकित झाले. ही रचना करताना सरांनी ज्या तऱ्हेचा विचार मांडण्याचा प्रयोग केला, तो रसिकांना कमालीचा आवडला आणि रसिकांच्या टाळ्यांच्या अगदी गजर झाला.

सरांच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधीचा सुयोग्य वापर करत फारच सुरेल वाजवले. श्वेता, सिद्धार्थ, कनका, शुभदा, मेधा या आणि इतर सर्व विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत त्यांच्या वादनातून जाणवत होती.

दुसऱ्या सत्रात स्वरप्रज्ञ पंडित मिलिंद रायकरांनी आपल्या व्हायोलिन वादनाने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकले. त्यांना डोंबिवलीतील प्रसिद्ध तबला वादक पंडित विश्वनाथ शिरोडकर यांनी अप्रतिम संयत साथ दिल्याने कार्यक्रम एका वेगळ्या उंचीवर गेला. सरांनी वाजवलेला बागेश्री रसिकांच्या खूप दिवस स्मरणात राहील. सरांनी घेतलेल्या काही जागा इतक्या अप्रतिम आणि सुरेल होत्या की रसिकांना ताईंच्या बागेश्रीची आठवण व्हावी.

नंतर रसिकांच्या आग्रहास्तव आणि रामनवमीचे औचित्य साधत सरांनी पायोजी मैने रामरतन धन पायो.. हे भजन सादर केले तेव्हा रसिकांची अगदी घेता किती घेशील दो करांनी अशीच अवस्था झाली.

दोन वर्षांनी घराबाहेर पडलेले जुन्या पठडीतील प्रसिद्ध गायक पंडित मधुबुवा जोशींनी संपूर्ण कार्यक्रमाचा सहकुटुंब मनःपूत आनंद घेतला.
डोंबिवलीतील प्रसिद्ध संवादिनी वादिका सौ. सीमाताई शिरोडकर, तबलजी निषाद पवार, अनेक प्रतिष्ठित आणि मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली.

कुलकर्णी परिवाराने उपस्थित कलावंतआणि रसिकांचे आभार मानले. इंद्रधनुष फाउंडेशनने आणि इतर अनेकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सढळ हाताने मदत केली.

  • निकेत पावसकर
    तळेरे, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग
    (संपर्क – 9860927199, 9403120156)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply