महाड : महाराष्ट्र राज्य पंचगव्य डॉक्टर्स असोसिएशनने आयोजित केलेले आठवे पंचगव्य चिकित्सा संमेलन महाड येथील वीरेश्वर मंदिरामध्ये उत्साहात पार पडले. सोलगाव (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील पंडित पंचगव्य गुरुकुल विस्तार केंद्र आणि संमेलन समितीने या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
कार्यक्रमाला पंडित पंचगव्य गुरुकुलचे सुहास पंडित, सई पंडित, संदीप सुतार, प्रमोद केळकर, पंचगव्य डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष मधुकर फडोल, उपाध्यक्ष जमानंद कांबळे, सचिव योगेश आंब्रे आणि महाराष्ट्रातील विविध भागातून आलेले दीडशेहून अधिक पंचगव्य चिकित्सक या संमेलनाला उपस्थित होते.
संमेलनाच्या पहिल्या दिवशी सकाळी गोप्रचारासाठी विरेश्वर मंदिर येथून महाड बाजारपेठ मार्गे गो पदयात्रा काढण्यात आली. कांचीपुरमच्या पंचगव्य विद्यापीठाचे कुलपती निरंजन वर्मा, उपकुलपती कमल टावरी यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा निघाली. पदयात्रेत गाईचे महत्त्व, गोचिकित्सा व गाय वाचवण्याचा संदेश देण्यात आला. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रामध्ये निरंजन वर्मा यांचे गोचिकित्सा या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाला महाडमधील स्वतःची गोशाळा असलेले उद्योजक अमृत पटेल आणि विश्राम पटेल विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाडकरांचा या व्याख्यानमालेला चांगला प्रतिसाद मिळाला. या व्याख्यानात निरंजन वर्मा यांनी व्हायरसची उत्पत्ती, त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आणि पंचगव्य औषधीमुळे वाढणारी रोगप्रतिकारक शक्ती, शिवपुराणातील व्हायरसचा उल्लेख यावर विवेचन केले. या व्याख्यानानंतर रायगड जिल्ह्यातील गो संगोपन व संवर्धन, गोरक्षा, गो आधारित शेती, प्रचार व प्रसार या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचा निरंजन वर्मा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रामध्ये करोना काळामध्ये पंचगव्य चिकित्सेच्या आधारे करोनावर मात करणाऱ्या करोनायोद्ध्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पंचगव्य चिकित्सा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गव्यसिद्धांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट गोसेवक, चिकित्सक, प्रचारक यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. पंचगव्य डॉक्टर असोसिएशनशी संलग्न जिल्हानिहाय समित्यांची नियुक्ती यावेळी करण्यात आली.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड