रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे येत्या ५ मे रोजी पनवेल येथील हभप कीर्तनभास्कर अनंत गणेश तथा नंदकुमार कर्वे गोंडवन संस्थानच्या राजघराण्यातील तीन पिढ्यांचे बलिदान या आख्यान विषयावर कीर्तन करणार आहेत.

भारतीय स्वातंत्र्यासाठी देशभरातील विविध ठिकाणच्या देशभक्तांनी योगदान केले. यामध्ये गोंडवन संस्थानच्या राजघराण्यातील पिढ्यांचेही योगदान होते. त्यामुळे या राजघराण्यातील तीन पिढ्यांचे बलिदान ते मांडणार आहेत.
हभप कर्वे यांना अलीकडेच रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचा आदर्श कीर्तनकार पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. भजनी कलाकार असलेल्या वडिलांकडून त्यांना संगीताचा वारसा लाभला. संगीत विशारद (हार्मोनियम वादन), संगीत अलंकार असलेले कर्वे हे रसायनी येथे एचओसी स्कूलमध्ये संगीत शिक्षक होते. संगीत राज्य नाट्य स्पर्धेत त्यांनी भूमिका व संगीत संयोजन केले. पनवेल कल्चरल सेंटरचे ते माजी अध्यक्ष आहेत. १९८४ पासून महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, गोवा आणि कर्नाटक राज्यात त्यांनी कीर्तने केली आहेत. त्यांना उज्जैन येथे कीर्तनरत्न ही उपाधी प्राप्त झाली. तसेच नागनाथ जोशी चऱ्होलीकर स्मृती पुरस्कार व कीर्तन भूषण पदवी, शृंगेरीपीठाधीश प. पू. विधुशेखर भारती तीर्थस्वामी महाराजांच्या हस्ते कीर्तनभूषण पुरस्कार, हरिकीर्तनोत्तेजक सभेतर्फे कीर्तनभास्कर पदवी प्राप्त झाली आहे.
रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या झाडगाव येथील राणी लक्ष्मीबाई सभागृहात गुरुवारी सायंकाळी ६ वाजता कीर्तन होणार आहे. त्यामध्ये कर्वे यांना तबलासाथ विश्वनाथ दाबके आणि हार्मोनियमसाथ चैतन्य पटवर्धन करणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर व उपाध्यक्ष मिलिंद आठल्ये यांनी केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड