दोघा छोट्या मुलींनी उघडली ज्ञानाची कवाडे

राजापूर : जुवाठी (ता. राजापूर) येथे सान्वी आणि भूमी या दोन छोट्या मुलींनी ज्ञानाची कवाडे उघडली. स्वतःसह इतर बालमित्रमैत्रिणींनाही उपयुक्त ठरणार असलेल्या गंमत जंमत बालवाचनालयाचे उद्घाटन त्या दोघींनी केले.

जुवाठीच्या कोष्टेवाडीतील सेवानिवृत्त सिटी सर्व्हे ऑफिसर विष्णू गुणाजी धुमाळे यांनी आपल्या निवासस्थानी बालवाडी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी हे मोफत वाचनालय सुरू केले आहे. वय वर्षे ७५ असणाऱ्या या वाचनवेड्या व्यक्तीने वाचनालय सुरू करताना लहान मुलांना अंगणवाडीपासूनच पुस्तकांची, वाचनाची गोडी लागावी, मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, त्यांना गोष्टीची पुस्तके उपलब्ध व्हावीत, ती त्यांना हाताळता यावीत, निवडता यावीत, हा उद्देश ठेवला आहे. त्यासाठी चित्रमय पुस्तकांसह गोष्टी, बडबडगीते, थोर लोकांची छोटी चरित्रे, साने गुरुजी संस्कारमाला, हितोपदेश, पंचतंत्र आदी पुस्तके वाचनालयात ठेवण्यात आली आहेत. तसेच वाचनालयात ओरिगामी, चित्रकला, सुंदर हस्ताक्षराचे मार्गदर्शनही नियमित केले जाणार आहे, अशी माहिती श्री. धुमाळे यांनी उद्घाटनप्रसंगी दिली.

यावेळी जुवाठीचे माजी सरपंच दिवाकर मयेकर, पोलीस पाटील पांडुरंग मयेकर, माजी मुख्याध्यापक भीमराव कोंडविलकर, ज्ञानप्रबोधिनी वाचनालयाचे अध्यक्ष संदीप घेवडे, प्रकाश सकपाळे, दयाळ बाणे, सुहासिनी गिरकर, विठोबा जुवाठकर तसेच जुवाठीचे ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. के. गोंडाळ यांनी केले.

जुवाठीसारख्या छोट्या गावात सुरू झालेल्या या मोफत वाचनालयाचे ग्रामस्थांनी कौतुक केले आणि अधिकाधिक मदत करण्याची तयारी दर्शविली. नव्या वाचनालयाला दिवाकर मयेकर (२५०० रुपये), पांडुरंग मयेकर (५००), दयाळ बाणे (५००), विठोबा जुवाठकर (५००), भीमराव‌ कोंडविलकर (५००), हिराजी कुडाळकर (५००) यांनी आर्थिक देणगी दिली. या वाचनालयाला संदीप घेवडे, सुहासिनी गिरकर आणि प्रकाश सकपाळे यांनी पुस्तके देण्याचे जाहीर केले. विष्णू धुमाळे यांनी त्या सर्वांचे आभार मानले.

वाचनालयाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित असलेले ग्रामस्थ

श्री. धुमाळे यांच्याशी बी. के. गोंडाळ यांनी साधलेला संवाद सोबतच्या व्हिडीओमध्ये

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply