बाळशास्त्री जांभेकरांचे कार्य देश-विदेशात जावे : भारत सासणे

पोंभुर्ले (ता. देवगड) : ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे संस्मरणीय कार्य महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून रवींद्र बेडकिहाळ आणि त्यांचे सहकारी गेली ३५ वर्षे सातत्याने करीत आहेत. हे महाराष्ट्रातील पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्राला अभिमानास्पद आहे. बाळशास्त्रींचे कार्य माहितीपट, चित्रपट, चरित्र ग्रंथ आदींच्या माध्यमातून देशात, परदेशात जावे, अशी अपेक्षा ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी व्यक्त केली.

‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करताना संदेश पारकर, भारत सासणे, रवींद्र बेडकिहाळ, अॅड.प्रसाद करंदीकर, सादिक डोंगरकर, अमर शेंडे आदी.

मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या १७६ व्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे पोंभुर्ले (जि. सिंधुदुर्ग( येथील ‘दर्पण’ सभागृहात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री. सासणे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ होते.

पोंभुर्ले येथील स्मारक आणि गाव राष्ट्रीय पातळीवरील दर्जेदार मॉडेल व्हावे, अशी अशी अपेक्षा व्यक्त करून राज्यातील पत्रकार आणि साहित्यिक यांनी यासाठी एकत्रितपणे सहकार्य करावे. या गावी आणखी मोठे सभागृह, ग्रंथालय व्हावे. त्यातून दिशादर्शक अशी विविध प्रश्नांवर चिंतन शिबीरे व्हावीत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या आजी-माजी अध्यक्षांची व्याख्याने आयोजित करावीत, असेही भारत सासणे यांनी यावेळी बोलताना सूचित केले.

कोकण प्रादेशिक पर्यटन विकास समितीचे नूतन उपाध्यक्ष संदेश पारकर म्हणाले, ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची पत्रकारिता, लोकशिक्षण, ग्रंथलेखन, इतिहास संशोधन, पुरातत्त्व लेखन, समाज प्रबोधन कार्य फक्त कोकणालाच नाही तर महाराष्ट्राला, देशाला अभिमानास्पद आहे. त्यामुळे रवींद्र बेडकिहाळ यांनी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून पोंभुर्ले येथे उभारलेले बाळशास्त्रींचे स्मारक आणि पोंभुर्ले गावाचा विकास पर्यटन क्षेत्र म्हणून राष्ट्रीय स्तरावर व्हावा, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सहकार्याने गावाचा विकास आराखडा निश्चित करून आवश्यक तो निधी उपलब्ध करून देऊ. पोंभुर्लेचे सरपंच सादिक डोंगरकर, अॅड. प्रसाद करंदीकर, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ, देवगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर आणि जांभेकर कुटुंबीय यांनी एकत्रित बसून याबाबतचा आराखडा पर्यटन विकास समितीकडे सादर करावा, असेही पारकर यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात रवींद्र बेडकिहाळ यांनी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या कार्याचा आढावा घेतला. पोंभुर्ले गाव पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित व्हावे. येथील ‘दर्पण’कारांच्या स्मारकाचा विकास आणि विस्तार व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

२०२२ चे दर्पण पुरस्कार
संस्थेतर्फे प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या सन २०२२ च्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा श्री. बेडकिहाळ यांनी या समारंभात केली. त्यांचा तपशील असा – धाडसी महिला पत्रकार पुरस्कार – सौ.शीतल करदेकर (विशेष प्रतिनिधी, दै.वृत्तमानस, मुंबई), दर्पण पुरस्कार पश्चिम महाराष्ट्र विभाग – अनुराधा कदम (उपसंपादक, दै.तरुण भारत, कोल्हापूर), मराठवाडा विभाग – प्रल्हाद उमाटे (जिल्हा प्रतिनिधी, दै.मराठवाडा नेता, नांदेड), विदर्भ विभाग – प्रा. डॉ. राजेंद्र मुंढे (ज्येष्ठ पत्रकार, वर्धा), उत्तर महाराष्ट्र विभाग – जयप्रकाश पवार (निवासी संपादक, दै. दिव्य मराठी, जळगाव), कोकण विभाग – शैलेश पालकर (संपादक, महावृत्त डॉटकॉम, रायगड), सुरेश कौलगेकर (प्रतिनिधी, दै.पुण्यनगरी, वेंगुर्ले), विशेष दर्पण पुरस्कार – किरण बोळे (प्रतिनिधी, दै. सकाळ, फलटण), स. रा. मोहिते (प्रतिनिधी, दै. जनमत, फलटण). या पुरस्कारांचे वितरण राज्यस्तरीय पत्रकार दिनी ६ जानेवारी २०२३ रोजी समारंभपूर्वक होणार असल्याचेही श्री. बेडकिहाळ यांनी स्पष्ट केले.

प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बाळशास्त्रींची प्रतिमा असलेल्या पालखीचे पूजन झाले. सभागृहातील अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सभागृहात लोकशिक्षणकार कै. ग. गं. जांभेकर, मुंबईनगरीचे आद्य शिल्पकार कै. जगन्नाथ ऊर्फ नाना शंकर शेठ, परखड संपादक कै. प्रबोधनकार ठाकरे यांच्या तैलचित्रांचे अनावरण भारत सासणे यांच्या हस्ते झाले.

पोंभुर्लेच्या विकासासाठी प्रयत्न करू : डॉ. नीलम गोऱ्हे
बाळशास्त्री जांभेकरांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला दूरदृश्यप्रणालीद्वारे महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे या उपस्थित राहणार होत्या. तथापि, तांत्रिक अडचणींमुळे ते शक्य न झाल्याने त्यांनी कार्यक्रमाला उद्देशून आपला व्हिडीओ संदेश पाठवला. त्यामध्ये त्यांनी सांगितले की, अन्यायाविरोधात लक्ष वेधण्याचे काम पत्रकार बांधव करीत असतात. ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रेरणेतून पत्रकारांकडून हे अमूल्य कार्य सुरू आहे. आज पत्रकारांचे प्रश्न अनेक आहेत. पत्रकारांमुळे लोकशाही आहे. जगामध्ये पत्रकारांना ‘व्हिसल ब्लोअर’ म्हणून संबोधले जाते. पत्रकारांच्या मागण्यांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून कायदेशीर आणि योजनांच्या चौकटीतून त्यावर तोडगा काढावा लागणार आहे. पोंभुर्ले गावाला पर्यटनस्थळ म्हणून दर्जा मिळावा. तेथील ‘दर्पण’ सभागृहाचा विस्तार आणि विकास व्हावा, या महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि माहिती, जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. तसेच पोंभुर्ले येथील स्मारकाच्या विकास आणि विस्तारासाठीही स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आपण प्रयत्न करू.

कार्यक्रमास पत्रकार संतोष कुळकर्णी, निकेत पावसकर, देवगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर, सौ. सासणे, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या विश्वस्त सौ. अलका बेडकिहाळ, शाहीर कांबळे, पोंभुर्ले गावचे सरपंच सादिक डोंगरकर, सामाजिक कार्यकर्ते अॅड. प्रसाद करंदीकर, सुधाकर जांभेकर, तळेरे येथील श्रावणी कॉम्प्युटर एज्युकेशनचे प्रमुख सतीश मदभावे, विद्यार्थी, देवगड तालुक्यातील पत्रकार, पोंभुर्ले ग्रामस्थ, जांभेकर कुटुंबीय उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे विश्वस्त अमर शेंडे यांनी केले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply