राजापूर : नदीच्या पाण्याच्या पातळीची अपडेट देणारी रिअल टाइम डाटा अॅक्विझिशन सिस्टीम (आरटीडीएएस) ही अत्याधुनिक यंत्रणा पाटबंधारे विभागाने राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीवरील पुलावर बसविली आहे. त्याचवेळी तालुक्यातील आठ ठिकाणी पावसाच्या पाण्याची मोजणी करणारी रेन गेज यंत्रणाही बसविण्यात आली आहे.

एआरएस आणि एडब्लूएलआर या दोन्ही अत्याधुनिक यंत्रणा सॅटेलाइट, सेन्सर आणि जीपीएसच्या साह्याने मोबाइल अॅपला जोडण्यात आलेली आहे. त्याद्वारे राजापूर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागाला अतिवृष्टीमध्ये वारंवार पडणार्या पुराच्या वेढ्याला कारणीभूत ठरणार्या अर्जुना नदीच्या पाण्याची पातळी आणि पावसाच्या पाण्याची मिनिटा-मिनिटाला अपडेट प्रशासकीय यंत्रणेला मिळणार आहे.
याबाबतची माहिती नुकतेच निवृत्त झालेले देवरूख येथील जलविज्ञान प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता रावसाहेब चौगुले यांनी दिली. या माहितीद्वारे संभाव्य पूरस्थितीपासून लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना देणे वा संभाव्य पूरस्थितीपासून संभाव्य आपद्ग्रस्त लोकांचा बचाव करणे प्रशासकीय यंत्रणेला अधिक सोपे होणार आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये अतिवृष्टी होऊन विशेषतः कोकणामध्ये वारंवार पूरस्थिती निर्माण होते. त्यामध्ये अतोनात नुकसान होते. या संभाव्य पूरस्थितीची लोकांना आधीच माहिती मिळाल्यास त्यामध्ये होणारी वित्त आणि जीवितहानी टाळणे अधिक सोपे होईल. यादृष्टीने पाटबंधारे विभागाकडून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कृष्णा खोर्याच्या धर्तीवर जलसंपदा विभागाच्या नाशिक येथील जलविज्ञान प्रकल्पाच्या माध्यमातून अर्जुना नदीवरील आरटीडीएएस या अत्याधुनिक यंत्रणेचा समावेश आहे. एआरएस आणि एडब्लूएलआर या दोन यंत्रणांमुळे पडलेला पाऊस आणि नद्यांची पाण्याची पातळी त्वरित कळणार असल्याचे श्री. चौगुले यांनी सांगितले.
पाटबंधारे विभागाकडून पावसाची नोंद ठेवणारी रेन गेज ही अत्याधुनिक यंत्रणा राजापूर तालुक्यातील करक, रायपाटण, सोलिवडे, शेंबवणे, येरडव, आडिवरे आदी ठिकाणी बसविण्यात आली आहे. रेन गेज (पर्जन्यमापन) उपकरणामध्ये पडलेल्या पावसाची नोंद ही सॅटेलाइट यंत्रणेद्वारे नाशिक आणि कळवा येथील जलविज्ञान प्रकल्पाच्या सर्व्हरवर जाणार आहे. यामधील नोंद मिनिटाला अथवा तासाला जशी हवी आहे, त्यानुसार त्याचे नियोजन केलेले आहे. ब्रिज रडार सेन्सॉर हे नदीतील पाणीपातळीचे फोटो सॅटेलाइटद्वारे सर्व्हरला पाठवण्याचे काम करतो. यामध्येही वाढलेल्या पाणी पातळीसह नदीतील विसर्गाचीही माहिती मिळते. ही माहिती त्वरित देणारे मोबाइल अॅप पाटबंधारे विभागाने विकसित केले आहे, असेही श्री. चौगुले यांनी सांगितले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड