रत्नागिरी : यावर्षी रत्नागिरीतील श्री हनुमान मंदिरातर्फे प्रथमच विठ्ठल मंदिरापर्यंत पायी वारीचे आयोजन करण्यात आले आहे. यासंबंधी आज सायंकाळी व्यंकटेश हॉटेलमध्ये झालेल्या तिसऱ्या बैठकीमध्ये वारीच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. ही वारी १० जुलै रोजी सकाळी ६.३० वाजता मारुती मंदिर येथून निघणार आहे.
पंढरपूरच्या वारीला ८०० वर्षांची परंपरा आहे. आयुष्यात एकदा तरी वारी घडावी, ही प्रत्येक मराठी माणसाची मनोमन इच्छा असते. वर्षानुवर्षे पायी वारी करणारे वारकरी पाऊस पाणी, ऊन, वारा कसलीही पर्वा न करता मैलोन् मैल पायी जाऊन विठोबाचे दर्शन घेतात आणि कृतार्थ होतात. प्रापंचिक समस्या, व्यावहारिक अडचणी आणि शारीरिक मर्यादा यामुळे मनात असूनही वारीला जाणे अनेकांना जमत नाही. पण मनातली वारीची ओढ काही कमी होत नाही. त्यासाठीच यावर्षी रत्नागिरीत वारी निघणार आहे. हनुमान मंदिर (सडा), विठ्ठल मंदिर देवस्थान समिती यांच्यासमवेत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्था, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राष्ट्रीय सेवा समिती, हिंदू राष्ट्र सेना, जनजागृती संघ यांच्या पुढाकाराने ही वारी आयोजित केली आहे.
टाळ मृदुंगाच्या साथीने आणि विठुनामाचा गजर करत, भजने म्हणत मारुती मंदिर ते विठ्ठल मंदिरपर्यंत वारी निघणार आहे. रत्नागिरीमधील विठ्ठल मंदिर प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते. म्हणून या विठ्ठलाची वारी यंदापासून सुरू करण्यात येणार आहे. या वारीमध्ये जात-पात विसरून वारकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे रत्नागिरीचे अध्यक्ष राकेश नलावडे, बजरंग दलाचे वल्लभ केनवडकर आणि श्री. जोशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भावे, महाजनी फाउंडेशनच्या अॅड. रुची महाजनी, राष्ट्रीय सेवा समितीचे अध्यक्ष संतोष पावरी यांच्या हस्ते वारीच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी विविध संस्था, संघटनांचे ५० हून अधिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


