रत्नागिरी : धामणसे (ता. रत्नागिरी) गावचे सुपुत्र आणि सेवानिवृत्त गटविकास अधिकारी मधुकर पुरुषोत्तम कुळकर्णी (वय ९१) यांचे काल (दि. ४ जुलै) सायंकाळी वार्धक्याने निधन झाले. त्यांनी मरणोत्तर नेत्रदान केले.
अण्णा कुळकर्णी या नावाने ते सर्वपरिचित होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कोकणातून खानदेशात जाऊन त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते ग्रामसेवक म्हणून शासकीय सेवेत रुजू झाले. कामाची आवड आणि शिकण्याची ओढ असल्याने खात्यांतर्गत परीक्षा देत ते गटविकास अधिकारी पदापर्यंत पोहोचले. तळमळीने काम करणाऱ्या अण्णा कुळकर्णींनी शासनाच्या जनकल्याणाच्या योजना प्रभावीपणे राबवत अनेक उद्दिष्टे पूर्ण केल्याबद्दल शासनातर्फे त्यांना अनेकदा गौरविले होते.
अण्णांना उपजतच असलेले कायद्याचे ज्ञान आणि अनुभव तसेच प्रशासनावर असलेली पकड लक्षात घेऊन तत्कालीन पालकमंत्री भाई सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या स्थापनेनंतर त्यांना ओरोसचे बीडीओ म्हणून नियुक्त केले. तेथे काम करताना सिंधुदुर्गाच्या विकासात एक शासकीय अधिकारी म्हणून आपल्या कामाची छापप उमटवली. रत्नागिरीचे बीडीओ म्हणूनही त्यांनी उत्तम काम केले.
सेवानिवृत्तीनंतर त्यांनी धामणसे गावाच्या विकासाकडे लक्ष दिले. गावात हायस्कूल सुरू करण्यासाठी मेहनत घेतली. धामणसे माध्यमिक उच्च शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना त्यांनी केली.
गेले काही दिवस त्यांची प्रकृती बरी नव्हती. काल सायंकाळी ६.२० वाजता रत्नागिरीच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, २ मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रत्नागिरीतील सुप्रसिद्ध डाॅक्टर मिलिंद कुळकर्णी यांचे ते वडील होत.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड