राजापूर : विधवांना समाजात चांगले स्थान देण्याची चळवळ सुरू झाली आहे. विधवांना सन्मानाने जगता यावे, यासाठी ठिकठिकाणच्या ग्रामपंचायती ठराव करत आहेत. त्यातील एक पुढचे पाऊल राजापूर तालुक्यातील एका शिक्षकाने उचलले आहे. स्वतःच्याच हयातीत आपल्या पत्नीला वैधव्यप्रथेतून मुक्त करण्याचे प्रतिज्ञापत्र या शिक्षकाने केले आहे.
भानू केरू गोंडाळ असे त्या शिक्षकाचे नाव आहे. श्री. गोंडाळ मूळचे शीळ (ता. राजापूर) येथील रहिवासी असून जुवाठी (ता. राजापूर) येथे शिक्षक आहेत. अक्षरमित्रसारख्या चळवळीतून वाचनसंस्कृती जोपासणे, ग्रामीण भागातील मुलांना स्पर्धापरीक्षेची सवय लावणे असे वैविध्यपूर्ण उपक्रम राबवून श्री. गोंडाळ यांनी आपले वेगळेपण निर्माण केले आहे. त्यात त्यांनी आणखी एक पुढचे पाऊल टाकले आहे.
आपल्या निधनानंतर आपल्या पत्नीला विधवाप्रथा पाळायला प्रवृत्त करू नये, असे त्यांनी म्हटले आहे. श्री. गोंडाळ यांनी राजापूरच्या तहसीलदारांसमोर प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यात म्हटले आहे की, पतीचे निधन झाल्यानंतर अंत्यविधीच्या वेळी मरण पावलेल्या व्यक्तीच्या पत्नीच्या कपाळावरील कुंकू पुसणे, मंगळसूत्र तोडणे, बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढणे ही अनिष्ट प्रथा महिलांच्या स्वातंत्र्यावर मर्यादा आणणारी आणि आनंदी जीवन जगण्यावर गदा आणणारी आहे. त्यामुळे ही प्रथा पूर्णपणे बंद आणि कालबाह्य झाली पाहिजे. त्यामुळे माझ्या निधनानंतर माझी पत्नी सौ. मालती भानू गोंडाळ हिला या प्रथेतून मुक्त करत आहे. माझ्या अंत्यविधीवेळी विधवा म्हणून कोणतीही अनिष्ट प्रथा पाळू नये.
श्री. गोंडाळ यांनी पुढाकार घेऊन केलेल्या प्रतिज्ञापत्रामुळे अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी गावोगावी विधवा प्रथेविरुद्ध चाललेल्या चळवळीला मोठी चालना मिळणार आहे.
(फोटो – नायब तहसीलदार सौ. दीपाली पंडित यांना प्रतिज्ञापत्र सादर करताना बी. के. गोंडाळ, ओणीच्या वात्सल्य मंदिरचे अध्यक्ष डॉ. महेंद्र मोहन, जुवाठीचे माजी सरपंच प्रसाद मोहरकर)


कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड