सवतकड्याच्या निमित्ताने चुनाकोळवण!

कोकणातील धबधब्यांचे आकर्षण कोकणाबाहेरील अनेकांना असतेच. अशाच एका धबधब्याचा मनमुराद आनंद लुटणाऱ्या मूळच्या कोकणवासीय चाकरमान्याने केलेले वर्णन निसर्गवेड्यांना त्या धबधब्याकडे घेऊन गेले नाही, तरच नवल!
………

बऱ्याच वर्षांनंतर कोकणातल्या पावसाचा यथेच्छ आनंद घेण्यासाठी मी गावाला (रिंगणे, ता. लांजा) पोहोचलो. माझ्या घरची शेती बंद असल्यामुळे शेतीत प्रत्यक्ष काम करण्यातला आनंद मला मिळंद (ता. राजापूर) या गावी घेता आला. मिळंद गावातल्या आयरे घराण्यात माझी मुलगी दिली आहे. मोठ्या प्रमाणात पारंपरिक शेती करणारे मुलीचे सासरे गेल्या वर्षी करोनाचा बळी ठरले. यावर्षी त्यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने गेलो असता कर्तबगार व्यक्ती गेली तरी जमेल तेवढी शेती करण्याचा त्यांच्या कुटुंबीयांचा निर्णय ऐकून मला बरे वाटले. दुसऱ्या दिवशी काही पैरी गडी माणसे बोलावल्याचे कळल्याने मीही तिथे थांबण्याचा निर्णय घेतला. माझा आनंद द्विगुणीत करावा म्हणून पाऊससुद्धा मनासारखा पडला. जोताच्या ऐवजी पॉवर टिलरने चिखल करण्यात आला. पण दाढ काढणे, त्यांच्या पेंड्या धुणे, कोन मारणे, बांधांवर चिखल थापणे, कोरड्या जागेत पाण्याचे शिंपण करणे आणि मुख्य म्हणजे कमरेत वाकून लावणी करीत मागे मागे येणे या सगळ्या कामांचा आनंद घेताना, त्या सर्वांचे चित्रण करताना मी हरखून गेलो.

आता मला गावाकडच्या धबधब्यात डुंबण्याची ओढ लागली. राजापूर तालुक्यातल्या चुनाकोळवण गावचा धबधबा मी ऐकून होतो. मी लांज्यात आलो. विजय हटकर यांना माझा मनोदय सांगितला. रविवारी जाण्याचा बेत पक्का झाला. ओणीतल्या नूतन विद्यामंदिरचे मुख्याध्यापक एम. आर. पाटील सरांनी, “तुम्ही सकाळी निघून या, मी तुम्हाला तिवंदे माळावरच्या मंदरूळ फाट्यावर भेटतो आणि दुपारच्या जेवणाची व्यवस्थाही करतो. फक्त किती जण आहात ते सकाळी लवकर कळवा.” असे सांगून टाकले. त्यामुळे सगळी चिंताच मिटल्याने रविवारी अकरा वाजता मी, हटकर सर आणि रामदास पांचाळ सर असे आम्ही तिघेजण तिवंदे माळावर पोहोचलो. स्वागताला पाटील सर शरद देसाईंना घेऊन हजर होतेच. मंदरूळ ग्रामपंचायतीने लावलेल्या स्वागताच्या कमानीखालून पाटील सरांची दुचाकी पुढे आणि आम्ही मागे मागे निघालो. चुनाकोळवणच्यात्या डोंगरावर जेथून धबधबा सुरू होतो, तिथपर्यंतचा चांगला रस्ता आणि गाड्या लावण्यासाठी पक्की जागा पाहून समाधान वाटले. वरून डोकावून पाहत होतो. तेव्हा “आपण प्रथम पुढचा परीट धबधबा पाहू या”, असे विजय हटकर म्हणाले आणि आम्ही पुन्हा गाड्यांवर स्वार झालो. जंगलातून वाट काढत खाली उतरून तो धबधबा पाहून आलो. “या गावात एक जुना वाडा आहे, तो पाहू या”, या हटकरांच्या आदेशाबरहुकूम आम्ही पुढे कूच केले.

चुनाकोळवण गावच्या मध्यभागी सोनार वाडीच्यालगत असलेल्या लक्ष्मीकांत महाकाली देवस्थानाच्या सुंदर प्रवेशद्वारातून आत गेलो. अनेक मंदिरे आणि त्यांच्या मध्यभागी असलेला बांधीव, पूर्ण भरून वाहणारा तलाव असे रमणीय तीर्थक्षेत्र आणि परिसर पाहून मन हरखून गेले. इथे अनेक पक्षी मनमुराद विहरताना दिसले. असाच वकील पक्षी एका झुडुपात इकडे तिकडे फिरताना त्याच्याबद्दलची माहिती देताना पाटील सरांनी त्या पक्ष्याचा चक्क आवाज काढून दाखवला.
बाजूलाच एक पडक्या स्वरूपातील जुने बांधकाम कसले आहे याची माहिती घ्यावी, म्हणून हटकर सरांच्या बरोबर बाजूला गेलो. वास्तुकलेचा सुंदर नमुना असलेल्या त्या मंदिरात शंकराची पिंडी दिसली. थोडे पुढे गेल्यानंतर एक मोठे घर दिसले. मग पाय तिकडे वळले. तो श्रीपाद लळित यांचा विस्तीर्ण वाडा अडीचशे वर्षांपूर्वीचा आहे आणि आजही तो सुस्थितीत असल्याचे श्रेय श्री. आणि सौ. लळित यांना जाते. अंगणासमोरच पूर्ण लाकडी दुमजली माडी पाहून थक्कच झालो. त्या माडीखालून बारमाही वाहणारा पाण्याचा पाट त्या वाड्याच्या वैभवात भर टाकतो.

घराच्या परसात असलेली नारळीची आणि सुपारीची बाग पाहताच आपण सुप्रसिद्ध लेखक श्री. ना. पेंडसे यांच्या ‘गारंबी’त येऊन पोहोचलो तर नाही ना, असा भास होतो.

आम्ही घरात डोकावताच श्रीपाद लळित यांनी हसतमुखाने स्वागत केले. ते सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक आहेत. सौ. लळित पोस्टमास्तर म्हणून काम पाहतात. त्यांची भेट होताच आम्ही गप्पांमध्ये हरवून गेलो. त्यादरम्यान आमचा शोध घेत पाटील सर आणि इतर मंडळी आली. पाटील सर आणि लळित सर अनेक वर्षांचे परिचित असल्याचे त्यांच्या स्वागतावरून कळले, पण आमच्यामुळे त्यांना या त्यांच्या घराची माहिती झाली. या जुन्या वाड्याची ठेवण लळित वहिनींनी फिरून दाखवताना माळ्यावर पूर्वीच्या जतन करून ठेवलेल्या वस्तूही दाखवल्या. घरातच असलेले दत्ताचे छोटखानी पण प्रसन्न वाटणारे मंदिर आपसूक नम्रतेने हात जोडायला लावते. आपुलकीचे कुरकुरीत तळलेले गरे आणि मायेचा गोडवा असलेला चहा घेऊन आम्ही लळित कुटुंबाचा निरोप घेतला.

आता मात्र सवतकड्याच्या चंदेरी धारा अंगावर कधी घेतोय, असे झाले होते. पण पाटील सरांनी घरून आणलेले जेवण अगदीच थंड होण्याअगोदर खाल्ले तर बरे होईल, असे सांगितल्याने सवतकड्यात उतरण्याच्या वाटेच्या बाजूलाच फरसबंद जागेत आम्ही कोंबडीचा रस्सा आणि चपात्यांवर ताव मारला. बाजूच्या टपरीवरून एका शाळकरी मुलीने दोन गरम भज्यांच्या बश्या आणल्या आणि म्हणाली, “सर, आमची टपरी आहे ती.”

पाटील सरांकडून बारावी पास झालेल्या मुलीला आपल्या आईवडिलांना मदत करताना पाहून कौतुक वाटले. तिला पुढल्या शिक्षणासाठी मार्गदर्शन करायला ते विसरले नाहीत. त्यांनी दिलेल्या प्रेमाची भेट असली तरी त्यांच्या कष्टाचे मोल म्हणून त्यांनी पुढे केलेले पैसे तिच्या आईडिलांनीही घ्यायचे नाकारले, पण काहीतरी घ्याच म्हणून केलेल्या आग्रहापुढे त्यांचेही काही चालले नाही.

आता एकदाचे आम्ही त्या खोल दरीत उतरलो. कंबरभर पाण्याचा डोह संथगतीने पाणी वाहून नेण्याचे काम करीत होता, तर समोरून स्वच्छ पाण्याचा लोट तुषार उडवत अवखळपणे उडी घेत होता. हा सवतकडा धबधबा गेले अनेक वर्षे पाहायचा राहून गेला होता, तो आज प्रत्यक्ष पाहताना इतके विलोभनीय दृश्य आपण उशिरा पाहिल्याचे शल्य अधिक गडद झाले. मी तत्काळ शर्ट काढला आणि त्या डोहात झोकून दिले. धबधब्याकडे जवळ जाऊन पाहतो तर अर्ध्यावर चढून उड्या मारणाऱ्यांमध्ये पाटील सरही एखाद्या मुलासारखे बागडत होते. वय वर्षे अठ्ठावन्न पण शरीर आणि मनाचे धारिष्ट्य तरुणांना लाजवील असेच आहे. मी कौतुक म्हणून झपझप फोटो काढले. मला इथे मुद्दाम नमूद करावेसे वाटते, ते गावचे तरुण सरपंच श्रीकांत मटकर (पाटील सरांचे विद्यार्थी). इथे दिवसभर उपस्थित राहून पर्यटकांची व्यवस्था आणि त्याच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी थांबतात. इथे अधिक सुधारणा होणार आहेत, असेही त्यांनी आमच्याशी बोलताना सांगितले.

धबधब्याचा यथेच्छ आनंद लुटून परतीचा प्रवास करताना प्रसिद्ध अंबिकेश्वराचे मंदिर पाहावे, म्हणून टेकडीवरच्या कच्च्या रस्त्यावर गाड्या वळवल्या. इथल्या मातीत जांभा दगड असल्याने तो कच्चा रस्ता तितकासा त्रासदायक वाटला नाही. त्या मंदिरातील शांत वातावरणात गप्पागोष्टी करतानाच गावच्या श्रीकांत कडणे या सामाजिक कार्यकर्त्याला मुंबईला फोन केला. “चुनाकोळवण गाव खरंच सुंदर आहे. मी आज फिरून पाहिलं”, असे सांगितले. आपण गावी असताना एक दिवस या, असे प्रेमाचे आमंत्रण त्यांनी दिले.

येताना मंदरूळला मासये यांचे दुकान लागते. तेथेही पाटील सरांचे आपुलकीने स्वागत झाले. चहाचा आग्रह झाला, पण आम्हाला पुढे जायचे असल्याने तो आग्रह नाकारावा लागला. तिवंदा माळ आला, आम्ही एकमेकांचा निरोप घेतला आणि परस्परविरोधी दिशांनी प्रवास सुरू झाला. हटकर सरांच्या गाडीवर मागे बसले होतो. हा दिवस स्मरणात राहील, असेच काही दिवसभर अनुभवले होते.

एकेकाळी चुन्याची खाण असलेले कोळवण म्हणून चुनाकोळवण. आज सिमेंटच्या जंगलात जीवन जगणाऱ्यांना सवतकड्यासारखे सुरक्षित धबधबे नैसर्गिक जीवनाचा आस्वाद घेण्यासाठी खुणावतात. पूर्वी उभा पावसाळा अंगावर घेणाऱ्यांना अशा धबधब्यांचे कौतुक नव्हते. आमच्या गावातल्या धबधब्यापेक्षा मोठा किंवा वेगळ्या वैशिष्ट्याचा असेल एवढेच त्यांचे मत असायचे.

आता मुंबईसारख्या उंच उंच इमारती छोट्या शहरात उभ्या राहत आहेत, तर उतरत्या कौलारू छपरांच्या आणि दगड-मातीच्या घरांच्या जागा सिमेंटच्या बंगल्यांनी घेतल्या आहेत. त्यामुळे अनेकांना पूर्वीची घरे कशी होती, हे सांगण्यासाठी कोणीतरी आताच गुगलवर अशी जुनी घरे शिल्लक असतील, तर त्यांचे फोटो टाकून ठेवायला हवेत.

पूर्वीचे ग्रामीण जीवन कसे होते याचा अभ्यास ज्यांना करावयाचा असेल, त्यांनी चुनाकोळवणला एकदा अवश्य भेट द्यावी. श्रीपाद लळीत यांच्या वाड्याला भेट देऊन त्यांच्याशी गप्पांच्या ओघात मिळणारी माहिती गोळा करावी. भरपूर ऐवज जमा होईल.

भविष्यात अशा घरांची डागडुजी करणे कष्टाचे ठरणारे आहे. कदाचित तुम्ही पैसे खर्च कराल, पण कोकणात मजूर मिळेनासे झाले आहेत. स्थानिक व्यवसाय बंद पडल्याने सुतारांची मुले रंधा मारायची कला विसरताहेत. मग एखाद्या घराचा वासा बदलायचा असेल तर नुसत्या पैशाचा उपयोग नाही तर जोडीला कसबी सुतार लागेल, तो कुठून आणणार आहोत, हा प्रश्नच आहे. म्हणून या पिढीतल्या अभ्यास करणाऱ्या तरुणांना सध्या संधी उपलब्ध आहे, तिचा त्यांनी लाभ घ्यावा. सवतकड्याच्या धबधब्यात उतरण्याअगोदर चुनाकोळवण गाव नजरेखालून घालावे. अभ्यासासाठी बरेच काही मिळेल. ते पुन्हा पुन्हा यायला खुणावेल. तरीही तृप्ती होणार नाही, याची खात्री मी देतो.

  • सुभाष लाड, मुंबई
    (संपर्क : 98691 05734)
    (पूर्वप्रसिद्धी : साप्ताहिक कोकण मीडिया, २९ जुलै २०२२)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply