अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्ताने स्वराज्यभूमी कोकण यात्रा

रत्नागिरी : स्वराज्याच्या आणि स्वातंत्र्याच्या चळवळीत देशात सहभाग कोकणवासीयांचा मोठा होता. त्याचे स्मरण म्हणून कोकणवासीयांना अभिमानास्पद ऐतिहासिक स्वराज्यभूमी कोकण यात्रा आयोजित करण्यात आली आहे. समृद्ध कोकण प्रदेश संघटनेने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने कोकणातील ऐतिहासिक सर्व प्रमुख गावांना भेट आणि जनजागृती सभा, देशाचे नेतृत्व करणाऱ्या कोकणातील व्यक्तिमत्त्वांना अभिवादन आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही यात्रा निघणार आहे.

आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, भारतरत्न विनोबा भावे, सरखेल कान्होजी आंग्रे, महापराक्रम योद्धा बाजीराव पेशवे, माधवराव पेशवे, आधुनिक चाणक्य नाना फडणवीस, क्रांतिसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, असीम निष्ठेचे प्रतीक सरनोबत प्रतापराव गुजर, सरसेनापती नेताजी पालकर, भारतरत्न महर्षी धोंडो कर्वे, भारतरत्न पां. वा. काणे, भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गांधीजींचे गुरू गोपाळ कृष्ण गोखले, सशस्त्र क्रांतीचे प्रमुख वीर सावरकर, १८५७ च्या बंडाचे प्रमुख मातृशक्ती झाशीची राणी लक्ष्मीबाई नेवाळकर, छत्रपती संभाजी महाराज, नरवीर तानाजी मालुसरे अशा स्वातंत्र्याच्या क्रांतीच्या नायकांना त्यांच्या मूळ गावी जाऊन अभिवादन करणे, कृतज्ञता व्यक्त करणे, या प्रत्येक गावात जनजागृती सभा घेणे, त्या गावातील प्रत्येक घरावर तिरंगा लावणे, त्या महान व्यक्तिमत्त्वांचे यथोचित स्मारक त्या त्या गावात उभे राहावे याकरिता सातत्याने प्रयत्न करणे, त्या त्या परिसराच्या विकासाचे केंद्र त्या त्या गावांमध्ये उभारणे या उद्देशाने कोकणातील संस्थांच्या मदतीने १२ ते १५ ऑगस्ट या काळात ही स्वराज्यभूमी कोकण यात्रा आयोजित करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्यावर १५ ऑगस्ट रोजी ध्वजवंदन करून या यात्रेची समाप्ती होईल.

यात्रेचा संपूर्ण कार्यक्रम असा – १२ ऑगस्ट – शिरढोण, पनवेल – आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, गागोदे, पेण – भारतरत्न विनोबा भावे, अलिबाग – राज्याच्या नौदलाचे प्रमुख कान्होजी आंग्रे, श्रीवर्धन – नेपोलियनपेक्षा महान योद्धा पहिला बाजीराव, नानासाहेब पेशवे, माधवराव पेशवे.

१३ ऑगस्ट – आंबडवे, मंडणगड – भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पालवणी, मंडणगड- सरनोबत प्रतापराव गुजर, चिखलगाव, दापोली – लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, मुरूड, दापोली – भारतरत्न महर्षी धोंडो कर्वे, पालगड, दापोली – साने गुरुजी, वेळास, मंडणगड आधुनिक चाणक्य नाना फडणवीस, गुहागर – गोपाळ कृष्ण गोखले.

१४ ऑगस्ट – रत्नागिरी – स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, लोकमान्य टिळक स्मारक, कोट, लांजा. – झाशीची राणी लक्ष्मीबाई नेवाळकर, कसबा, संगमेश्वर- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, परशुराम, भारतरत्न पां. वा. काणे, आयनी – क्रांतिकारक अनंत कान्हेरे, उमरठ – नरवीर तानाजी मालुसरे.

समारोप १५ ऑगस्ट – रायगड किल्ला. शिवप्रभू छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याची राजधानी. ध्वजवंदन.

या उपक्रमात कोकणातील या यात्रेत सुमारे दोनशे तरुणांनी सहभागी व्हावे, अशी अपेक्षा आहे. शिवाय जास्तीत जास्त संस्थांनी, राष्ट्रप्रेमी युवकांनी, नागरिकांनी सहभागी व्हावे. आपापल्या भागात यात्रा ज्या दिवशी येणार आहे त्या दिवशी संपूर्ण दिवसभर उस्फूर्तपणे या यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply