आचार्य हयात असते, तर वेगळा महाराष्ट्र दिसला असता : ज्ञानेश महाराव

मुंबई : आचार्य अत्रेंचा त्या काळातील महाराष्ट्राचा प्रगल्भ विचार आणि अग्रेसर भूमिका पाहता ते काही वर्षे जगले असते, तर वेगळा महाराष्ट्र दिसला असता, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, वक्ते चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांनी केले.

मराठी वृत्तपत्र लेखक संघ (मुंबई) आणि आचार्य अत्रे स्मारक समिती (मुंबई) यांच्या वतीने दादर येथील सार्वजनिक वाचनालयात घेण्यात आलेल्या ‘कुठे नेऊन ठेवला आहे आचार्य अत्रे यांचा महाराष्ट्र’ या विषयावरील परिसंवादाच्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ख्यातनाम राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. राजेंद्र पै, ज्येष्ठ उद्योजक प्रमोद घोसाळकर, मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, दादर सार्वजनिक वाचनालयाचे कोषाध्यक्ष मनोहर साळवी, आचार्य अत्रे स्मारक समितीच्या अॅड. आरती सदावर्ते-पुरंदरे उपस्थित होते.

श्री. महाराव पुढे म्हणाले, देशातील बहुजन समाज बुद्धीचा वापर न करता भावनेच्या आहारी जात असल्याने मातीचे गोळे डोक्यावर घेऊन बुडविले जातात. ज्या देशात माणसापेक्षा दगडाला जास्त किंमत असते, तो देश मोठा कसा होणार? आज आचार्य अत्रे असते तर महाराष्ट्रच नव्हे तर देशपातळीवर चाललेल्या एकंदर राजकीय परिस्थितीवर घणाघात केला असता, त्याचबरोबर वाढती बुवाबाजी, कर्मकांड आणि जातीयवाद्यांवर आणखी प्रहार केले असते. आयुष्यभर त्यांनी आपल्या अग्रलेखातून आणि पुस्तके लिहून हे काम केले आहेच. संत बहिणाबाई, संत तुकाराम, कबीर, संत एकनाथ, ज्ञानेश्वर, तुकडोजी महाराज, यांच्या ओव्या, अभंग, पोवाड्यातील कडवी उद्धृत करून भटशाही हा सामाजिक आणि राजकीय रोग असल्याचे ठासून सांगितले. सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, शाहीर अमरशेख इत्यादी महापुरुषांनी समाजाला जागृत करण्याचे काम केले. बुवाबाजी, कर्मकांड या भ्रामक गोष्टी आहेत, हे आपल्या साहित्यातून मांडले. त्याअगोदर छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन करताना आणि ते वाढविताना तिथी आणि मुहूर्त कधी पाहिले नाही. परंतु आजकालचे सुशिक्षित लोक अजूनही वास्तुशास्त्राचा आधार घेतात. घरात दिशा शोधणाऱ्यांची नेहमीच ‘दुर्दशा’झाली, असे स्पष्ट करून श्री. महाराव यांनी भावनेच्या आहारी जाण्यापेक्षा बुद्धीने विचार करावा, असे आवाहन केले.

श्री. देसाई म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आपल्या तथाकथित भक्तीचे नाटकी प्रदर्शन करणाऱ्या भाजपने आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या एकनाथ शिंदे टीमने उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवण्याचे ठरवले आहे. तरी या दोन गोष्टींत अर्थातच विसंगती आहे! मात्र एका गोष्टीकडे मुद्दामहून लक्ष वेधायचे आहे. महाविकास आघाडीचा प्रयोग बाळासाहेबांना आवडला नसता, असे सांगितले जात आहे. परंतु फडणवीस सरकारात शिवसेनेच्या मंत्र्यांना काडीची किंमत नव्हती आणि म्हणून त्यांनी राजीनामे खिशात ठेवले होते. बाळासाहेब त्यावेळी हयात असते, तर त्यांनी ‘कमळाबाई’ला शेलक्या शब्दांत सुनावून, आपल्या मावळ्यांना सरकारबाहेर पडण्याचा सल्ला दिला असता. मोदी सरकारने केंद्रात शिवसेनेला महत्त्वाचे खाते दिले नाही, म्हणूनही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला असता. शिवसेनेला तुच्छतेची वागणूक देणाऱ्या फडणवीस यांना त्यांनी ठाकरी शैलीत फटकारले असते. उलट महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार असल्यामुळे, बाळासाहेब आणि त्यांचे अधिक जमले असते. अर्थात समजा मतभेद झाले असते, तर पवारांनाही बाळासाहेबांनी सोडले नसते, हा भाग वेगळा. परंतु बाळासाहेबांच्या नावाने आपल्याला हव्या त्या गोष्टीच सोयीस्करपणे सांगायच्या, ही भाजपची आणि शिंदे गटाची लबाडी आहे, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. शिवाय ‘मार्मिक’ सुरू झाल्यापासूनच बाळासाहेबांचे काँग्रेस नेत्यांशी कसे जवळचे संबंध होते, हे सर्वज्ञात आहे. काँग्रेसच्या हिंदुत्ववादी दुष्मनांनी या गोष्टी दडवून आणि दुसरीकडे बाळासाहेबांची ढाल पुढे करून, उद्धव ठाकरे यांच्यावर जाणीवपूर्वक हल्लाबोल सुरू केला आहे. ही चाल सर्वजणांनी लक्षात ठेवली पाहिजे.

दोन्ही वक्त्यांनी परखड भाषेत आपले विचार मांडल्याबद्दल अॅड. राजेंद्र पै यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनीसुद्धा आज आचार्य अत्रे असते तर कसे व्यक्त झाले असते, याची अनेक तत्कालीन प्रासंगिक उदाहरणे देऊन आपले विचार मांडले. कुटुंब रंगलंय काव्यात कार्यक्रमाचे विसूभाऊ बापट यांनी शिवाजी पार्क येथील आचार्य अत्रे कट्ट्याच्या संदर्भात माहिती दिली. अॅड. आरती सदावर्ते यांनी आचार्य अत्रे स्मारक समितीच्या तर रवींद्र मालुसरे यांनी मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या वाटचालीचा आढावा घेतला. ज्येष्ठ वृत्त निवेदिका शिबानी जोशी यांनी सूत्रसंचालन केले, तर संघाचे प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी आभार मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष रमेश सांगळे, कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड, माजी अध्यक्ष विजय ना. कदम, कार्यवाह नितीन कदम, सुनील कुवरे, राजन देसाई, नारायण परब, दत्ताराम गवस, दिगंबर चव्हाण, चंद्रकांत पाटणकर, अनंत आंगचेकर, राजेंद्र घरत, श्रीमती मंदाकिनी भट, कृष्णा काजरोळकर, श्रीनिवास डोंगरे, दीपक गुंड्ये, भाऊ सावंत, शांतू डोळस यांनी विशेष परिश्रम घेतले.
(रवींद्र मालुसरे)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply