रत्नागिरी जिल्ह्याचा औद्योगिक विकास साधण्यासाठी प्रयत्न – उदय सामंत

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याचा औद्योगिक विकास साधण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करण्याची ग्वाही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी ध्वजवंदनाच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या मुख्य सोहळ्यात ते बोलत होते. जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या संचलन मैदानावर हा सोहळा झाला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग उपस्थित होते. स्वातंत्र्य लढ्यात योगदान करणारे स्वातंत्र्यसैनिक, हुतात्मा आण देशाचे रक्षण करणारे सैनिक यांना अभिवादन करून श्री. सामंत यांनी जिल्ह्याच्या प्रगतीचा आढावा घेतला. ते म्हणाले, जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यास शासन कटिबद्ध आहे. जिल्ह्याला जागतिक स्तरावर वेगळी ओळख मिळवून देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योग खात्याची जबाबदारी मला दिली आहे. त्यामुळे अधिकाधिक उद्योग जिल्ह्यात सुरू होतील आणि त्यातून रोजगार निर्मिती करण्याचा आपला प्रयत्न राहील. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास ही शासनाची प्राथमिकता आहे. पर्यटन, शिक्षण, कृषी आणि उद्योग क्षेत्रात येथील क्षमता लक्षात घेऊन विकास योजना आखण्यात आल्या असून त्यानुसार शासन प्राधान्याने जिल्ह्याच्या विकासासाठी निधीदेखील देत आहे. जिल्ह्यातील विकासकामांसाठी नियोजन निधीतून २७१ कोटी रुपये यावर्षी मंजूर करण्यात आले आहेत. जिल्हा विकसित करायचा असेल तर ग्रामीण भागात दळणवळण व्यवस्था आवश्यक आहे. हे लक्षात ठेवून यापैकी ३५ कोटी ९० लाख रुपये मुख्यमंत्री सडक योजनेवर खर्च करण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्हा कोकणातील शैक्षणिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे. मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रासोबत गेल्या काळात येथील कवी कालिदास संस्कृत विद्यापीठाचे उपकेंद्र आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्र रत्नागिरीत सुरू केले आहे. भावी पिढीचा विचार करून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यावर्षी कार्यान्वित केले असून स्थानिकांना रोजगार व स्वयंरोजगार मिळावा, यासाठी कौशल्य प्रशिक्षण केंद्रदेखील सुरू केले. यातून रत्नागिरी जिल्ह्यात कुशल मनुष्यबळ निर्मिती होईल. तसेच येथील उद्योगांना आवश्यक असणारे कौशल्य प्रशिक्षण दिल्याने सर्वच बाबतीत विकासाला चालना मिळेल.

जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी अनेक वर्षांपासून होती. कोविड काळात याची आपणास अधिक तीव्रतेने जाणीव झाली. या महाविद्यालयाचा प्रस्ताव नुकताच राज्य सरकारने मंजूर केला, याबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे मी माझ्या वतीने विशेष आभार मानतो. मला खात्री आहे की आगामी ३ वर्षांमध्ये या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आणि ४३० खाटांच्या जिल्हा रुग्णालय श्रेणीवर्धनाचे काम पूर्ण होईल. याबाबत पाठपुरावा करुन येत्या शैक्षणिक वर्षात येथे वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

येणाऱ्या काळात आपण जिल्ह्यात विधी महाविद्यालयदेखील सुरू करणार आहोत. जिल्हा एक महldत्वाचे शैक्षणिक केंद्र म्हणून नावारुपास येईल यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे, असे सांगून श्री. सामंत म्हणाले, शहरातील रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांची समस्या कायमस्वरूपी संपविण्यासाठी आता सिमेंटचे रस्ते बांधण्याचा निर्णय झाला असून यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी १०० कोटी रुपये देऊ केले आहेत. जिल्ह्याचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. मधील काळात काही भागात अतिवृष्टी झाली. यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी मदतीचे निकष आपण बदलले. शासनाने एनडीआरएफच्या दुप्पट दराने आणि २ ऐवजी ३ हेक्टरपर्यंत मदत करण्याचा निर्णय आघाडी शासनाने घेतला आहे. जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत शासन गंभीर असून या उत्पादकांना अधिकाधिक संधी व सवलत कशी देता येईल, याबाबतही धोरण आखले जाणार आहे. शेतीसोबतच उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया वित्तसहाय्य योजना जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. त्यातील ७६ पैकी २६ शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करण्यात आले असून याच धर्तीवर आघाडी शासन आता राज्याची योजना सुरुt करीत आहे. याचा अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ घ्यावा, असे आवाहन मी याप्रसंगी करतो. जिल्ह्यातील विकास कामांना गतिमान पद्धतीने पुढे नेण्यात महसूल विभागाचा मोठा वाटा राहिलेला आहे. आपत्ती व्यवस्थापनात महसूल विभागाने मोलाचे काम केले आहे.

गेल्या वर्षी चिपळूण शहर पूरस्थितीत सापडले त्यानंतर शासनाने खास बाब म्हणून नद्यांमधील गाळाचा उपसा करण्याची परवानगी दिली. त्यानंतर ७.५ दशलक्ष घनमीटर गाळ काढल्याने यंदा तशी स्थिती आली नाहीस असे त्यांनी सांगितले.
१६५ किलोमीटर सागर किनारा लाभलेल्या आपल्या या जिल्ह्यात मासेमारी आणि त्यावर अवलंबून व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहेत. सततच्या वादळी स्थितीने शहरातील मिऱ्या बंदराची धूप होत आहे. यासाठी १६० कोटी रुपये खर्च करून धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम सुरू आहे. यासोबतच २६ ठिकाणी असे बंधारे बांधले जाणार आहेत. जिल्ह्याचे दैवत असलेल्या श्री गणपती देवस्थान गणपतीपुळे येथे १०२ कोटी रुपये खर्चून विकास आराखड्यातील कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यात कोविड काळात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले. त्यामुळे आपण त्यावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी झालो. येणाऱ्या काळात कोणतेही निर्बंध न घालता गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी आघाडी शासनाने दिले आहे. या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी बूस्टर डोस घेण्यासोबत कोविडबाबत खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी आवाहन केले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply