स्वराज्य भूमी अभिवादन यात्रेत भारतरत्न पां. वा. काणे यांना आदरांजली

दापोली : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने स्वराज्य भूमी प्रतिष्ठानच्या पुढाकाराने निघालेल्या स्वराज्य भूमी अभिवादन यात्रेत भारतरत्न पां. वा. काणे यांच्या स्मारकस्थळी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली.

स्वराज्य भूमी अभिवादन यात्रा १२ ऑगस्ट रोजी सुरू झाली असून तिचा समारोप १५ ऑगस्ट रोजी होणार आहे. कोकणातील क्रांतिवीर आणि भारतरत्न आणि नररत्न यांना अभिवादन करण्यासाठी अभिवादन यात्रा सुरू झाली आहे. काल (दि. १३ ऑगस्ट) सायंकाळी ही यात्रा दापोली तालुक्यातील जालगाव येथील महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे स्मारकामध्ये पोहोचली. तेथे या अभिवादन यात्रेचे कार्यकर्ते पोहोचल्यानंतर त्यांचे समितीचे कार्याध्यक्ष विमलकुमार जैन आणि अध्यक्ष प्रशांत परांजपे, दापोलीच्या नगराध्यक्षा सौ. ममता मोरे, ज्येष्ठ नागरिक विजय गोळे यांनी स्वागत केले.

समितीचे प्रमुख संजय यादवराव यांनी अभिवादन करताना सांगितले की, कोकणाने देशाला शेकडो महान रत्ने दिली. त्यातही प्रमुख भारतरत्ने रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड या तालुक्यांनी दिली. त्या भूमीमध्ये आल्याबद्दल भावना उचंबळून आल्या आहेत. काणे यांच्या स्मारकामध्ये त्यांच्याबद्दल तसेच दापोली तालुक्यातील तीन भारतरत्ने, सात नररत्नांची महती आणि माहिती स्मारक समितीचे अध्यक्ष प्रशांत परांजपे यांनी उपस्थितांना दिली.

स्मारकात आल्यानंतर फार मोठ्या भूमीमध्ये येऊन एकाच छत्राखाली अभिवादन करण्याची संधी प्राप्त झाल्याबद्दल स्वराज्य भूमी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

ही यात्रा चिखलगाव मार्गे गुहागरला जाऊन गोपाळकृष्ण गोखले यांना वंदन करून रत्नागिरीत स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक जन्मस्थान, कोट व कोलदे (ता. लांजा) येथे झाशीच्या राणीला वंदन करून रायगडकडे प्रस्थान करणार असल्याची माहिती संजय यादवराव यांनी दिली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply