राष्ट्रीय ग्रंथालय दिन आणि भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक

दरवर्षी १२ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या गेल्या ९ ऑगस्ट रोजी झालेल्या १३०व्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या स्मृती.
…….
ग्रंथालय आणि ग्रंथालयशास्त्र शिक्षणाची गरज संपूर्ण जगाला करून देणारे भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांची १३०वी जयंती ९ ऑगस्ट रोजी झाली, तर १२ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो. ग्रंथालयशास्त्राद्वारे ग्रंथालयाचे पावित्र्य आणि महत्त्व वाढविणारे ‘फाइव्ह लॉज ऑफ लायब्ररी सायन्स’हे पुस्तक म्हणजे ग्रंथालयशास्त्राचा पाया समजला जातो. ग्रंथालयांना जास्तीत जास्त लोकाभिमुख बनविण्याकरिता लिहिलेल्या या पुस्तकाचा फायदा सर्वसामान्यांना व्हावा, यासाठी त्यांनी तयार केलेली पंचसूत्री म्हणजेच ग्रंथालयशास्त्राचा पाया होय. त्या अर्थाने पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन भारतीय ग्रंथालयशास्त्राचे आधारस्तंभ होते.
आपल्या देशाच्या आणि देशवासीयांच्या विकासात ग्रंथालयाचे मोलाचे योगदान आहे. आधुनिक भारताच्या ग्रंथालयीन जीवनाला बहुमान्यता आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, त्या डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा जन्म तत्कालीन मद्रास राज्यातील तंजावर या इतिहासप्रसिद्ध शहराजवळच्या शियाली या गावात ९ ऑगस्ट १८९२ रोजी झाला. तेथेच त्यांचे शालेय शिक्षण झाले. मद्रास येथील ख्रिश्चन कॉलेजमधून त्यांनी इंग्रजी विषयात बी. ए. पदवी प्राप्त केली. सन १९१७ मध्ये एल. टी. म्हणजे आताची बी. एड. परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण केली. १९२४ पर्यंत सहा वर्षे गणिताचे प्राध्यापक म्हणून त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. सन १९२४ मध्ये मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेजमधील गणिताची प्रतिष्ठित प्राध्यापकी सोडून ग्रंथपालपदाची नवी खुर्ची रंगनाथन यांनी मोठे धाडस करून स्वीकारली. मद्रास विद्यापीठाचे पहिले ग्रंथपाल म्हणून रंगनाथन यांची नियुक्ती झाली. त्यावेळी त्यांना ग्रंथालयशास्त्राच्या शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवण्यात आले. इंग्लंडमधील लंडन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लायब्ररियनशिपमध्ये एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून, तेथील शंभराहून अधिक ग्रंथालयांचा अभ्यास दौरा केला. मद्रासला परत आल्यानंतर १९२५ ते १९४५ पर्यंत त्यांनी मद्रास विद्यापीठाचे ग्रंथपाल म्हणून काम केले. १९४५ साली बनारस हिंदू विश्वविद्यालयामध्ये त्यावेळचे कुलगुरू डॉ. राधाकृष्णन यांच्या निमंत्रणावरून ते तेथे रुजू झाले आणि त्यांनी १९४६ पर्यंत तेथील काम पाहिले. त्यानंतर दिल्ली विद्यापीठाचे ग्रंथालयशास्त्राचे प्राध्यापक आणि सल्लागार म्हणून काम केले. १९५७ मध्ये त्यांनी विक्रम विद्यापीठात ग्रंथालयशास्त्र विभाग सुरू केला, तर १९६२ मध्ये बंगलोर येथे डॉक्युमेंटेशन रिसर्च आणि ट्रेनिंग सेंटरची स्थापना केली. शेवटपर्यंत या संस्थेत त्यांनी प्राध्यापक म्हणून कार्य केले.

१९२८ मध्ये त्यांनी मद्रास ग्रंथालय संघाची स्थापना केली. १९३३ साली त्यांच्याच प्रोत्साहनाने भारतीय ग्रंथालय संघाची स्थापना झाली. १९५७ साली ते फेडरेशन फॉर इन्फॉर्मेशन अँड डॉक्युमेंटेशनचे मानद सदस्य म्हणून निवडले गेले. ग्रेट ब्रिटनच्या लायब्ररी असोसिएशनचे आजीव उपाध्यक्ष बनले. १९४८ साली ब्रिटिश कौन्सिलचे पाहुणे म्हणून फ्रान्स, नॉर्वे, इंग्लंड, स्वीडन इत्यादी युरोपियन देशांना आणि १९५० साली रॉकफेलर फाउंडेशनचे पाहुणे म्हणून अमेरिकेला त्यांनी भेट दिली. इंटरनॅशनल ॲडव्हायझरी कमिटी ऑफ लायब्ररी एक्स्पर्ट टू युनायटेड नेशन्स अँड ॲडव्हायझरी कमिटी ऑफ युनोचे सभासद आणि इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीचे ते आजीव सभासद होते. १९६३ मध्ये शारदा रंगनाथन एंडाउमेंट फॉर लायब्ररी सायन्स ही विश्वस्त संस्था स्थापन केली. डॉ. रंगनाथन यांनी आपल्या आयुष्यात २००० पेक्षा अधिक शोधनिबंध, ६० पुस्तके लिहिण्याबरोबरच ५ नियतकालिके प्रकाशित आणि संपादित केली.

रंगनाथ यांनी १९३१ मध्ये प्रकाशित केलेल्या ‘फाइव्ह लॉज ऑफ लायब्ररी सायन्स’ या पुस्तकात मांडलेले पाच सिद्धांत भारतीय ग्रंथालयशास्त्राचा पाया समजला जातो. ही पाच सूत्रे अशी –
१. ग्रंथ हे उपयोगासाठी आहेत.
२. प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे.
३. प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे.
४. वाचकांचा तसेच ग्रंथालय सेवकाचा वेळ वाचवा.
५. ग्रंथालय ही वर्धिष्णु संस्था आहे.
सन १९३३ मध्ये त्यांच्या प्रसिद्ध द्विबिंदू वर्गीकरण पद्धतीची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली. १९३४ मध्ये क्लासिफाइड कॅटलॉगिग कोड ही तालिकीकरण पद्धत प्रकाशित झाली, जी हिंदू तत्त्वज्ञानावर आधारित आहे. याशिवाय लिब्रामेट्री – ग्रंथालय सांख्यिकी संकल्पना त्यांनी विकसित केली. ग्रंथपालनाचा द्रष्टा त्यांच्या रूपाने भारताला मिळाला. एक नवे शास्त्र फुलविण्याचे, प्रस्थापित करण्याचे मोठे कार्य ग्रंथपाल रंगनाथन यांनी केले. त्यांनी ग्रंथालय आणि ग्रंथालयशास्त्र शिक्षणाची ओळख आणि गरज संपूर्ण जगाला करून दिली. यासाठीच भारतात ९ ऑगस्ट हा डॉ. शियाली राममृता रंगनाथन यांचा वाढदिवस ग्रंथालय दिन म्हणून साजरा केला जातो. १९३५ साली भारत सरकारकडून त्यांना रावसाहेब ही पदवी बहाल करण्यात आली, तर १९५७ साली त्यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल भारत सरकारकडून पद्मश्रीने त्यांचाच सन्मान झाला. १९४८ मध्ये दिल्ली विद्यापीठाने आणि १९६४ साली अमेरिकेतील पीटर्सबर्ग विद्यापीठाने डी. लीट. ही बहुमानाची पदवी देऊन त्यांना गौरविले. ग्रंथालयशास्त्रातील त्यांच्या अद्वितीय कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांचे ग्रंथालयशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नेमणूक केली. १९७० साली मार्गरेट मान हे बहुमानाचे पदक त्यांना प्रदान करण्यात आले.

ज्ञानप्रसार करणारा, ग्रंथालयाचा अचूक उपयोग दाखवून देणारा, सिद्धी आणि ध्यास घेऊन दीर्घकाळ कार्य करीत राहणारा, या व्यवसायाला सुप्रतिष्ठा प्राप्त करून देणारा एक असामान्य ज्ञानप्रसारक, ग्रंथालयीन कार्यात जागृती असणारा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा ग्रंथपाल सापडणे विरळाच. त्यांनी ग्रंथालयशास्त्रात केलेल्या भरीव योगदानाचे फळ आज आपल्याला सुसज्ज ग्रंथांच्या आणि स्वतंत्र ग्रंथालयशास्त्र विभागाच्या रूपाने पाहायला मिळते. यामुळेच त्यांना भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक असे संबोधण्यात येते.

ग्रंथालय आणि ग्रंथालयशास्त्राला नवी दिशा देणारे डॉ. रंगनाथन अखेरच्या श्वासापर्यंत त्या कार्याशी एकनिष्ठ राहिले. ग्रंथालयशास्त्राला परिपूर्णता देऊन बंगलोर येथे २७ सप्टेंबर १९७२ ते कालवश झाले.

  • प्रा. सुभाष सोनू मायंगडे
    एम. लिब. अँड इन्फो. सायन्स,
    एमएच- सेट /यूजीसी- नेट
    ग्रंथपाल, आठल्ये- सप्रे-पित्रे स्वायत्त महाविद्यालय, देवरूख

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply