एक तरी पुस्तक लिहावे

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या निष्क्रियतेबाबत यापूर्वी या सदरात यापूर्वी अनेक वेळा मुद्दे मांडले होते. यावेळी मात्र एक सकारात्मक मुद्दा मांडण्याची संधी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी तालुका शाखेने दिली आहे. गेली काही वर्षे सूप्तावस्थेत असलेल्या या शाखेचे अलीकडेच पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. शाखेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. वास्तविक किमान एक पुस्तक प्रसिद्ध झालेल्या साहित्यिकालाच कार्यकारिणीवर स्थान दिले गेले पाहिजे. तसे झाले तरच ती संस्था खऱ्या अर्थाने साहित्यिकांची संस्था ठरते. पण तसा निकष लावला तर सध्याच्या काळात कोणत्याच साहित्यिक संस्था टिकू शकणार नाहीत. त्यामुळे रत्नागिरी शाखेचे पुनरुज्जीवन करताना त्या निकषाचा अवलंब केला नाही, तरी शाखा पुनरुज्जीवित झाली हीसुद्धा समाधानाची एक बाब आहे. रत्नागिरी शाखेच्या पुनरुज्जीवन संदेश रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी श्रावणधारा नावाचा एक कार्यक्रम करण्यात आला. सुमारे पंचवीस कवींनी त्यामध्ये सहभाग घेतला. भर पावसातसुद्धा कवींनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. याच कार्यक्रमात शाखेतर्फे विविध संकल्प जाहीर करण्यात आले आहेत. समाजाच्या वेगवेगळ्या स्तरापर्यंत पोहोचण्याचा संकल्प त्यामध्ये आहे. महिलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. शाळाशाळांशी संपर्क साधला जाणार आहे. नव्या पिढीला साहित्याची ओळख करून द्यावी, त्यांची रुची वाढावी, यासाठी हा प्रयत्न केला जाणार आहे. संकल्प तरी खूपच चांगला आहे. या संकल्पाला चालना दिली पाहिजे.

साहित्याची चळवळ वाढीला लावण्यात वर्तमानपत्रांनी मोठी जबाबदारी मोठी भूमिका निभावली आहे. कविता, कथा, क्रमशः प्रसिद्ध होणाऱ्या कादंबऱ्या हे कोणे एके काळी वृत्तपत्रांच्या रविवारच्या पुरवण्यांचे वैशिष्ट्य होते. अलीकडे साहित्याच्या बाबतीत वृत्तपत्रे एक प्रकारे उदासीन झाल्यासारखी स्थिती आहे. अशा स्थितीत साहित्य चळवळ राबविणाऱ्या संस्थांची जबाबदारी वाढली आहे. कहाण्या, बालकथा, कथा, कविता, गीते अशा साहित्याच्या विविध प्रकारांमधून समाजाचे मानसिक भरणपोषण होत असते. कथा काल्पनिक असल्या तरी त्यातून काहीतरी बोध दिला जातो. तो तसा दिला जावा, अशी अपेक्षा असते. जगण्याचे सर्व संदर्भच बदलले असल्यामुळे साहित्याच्या अभिरुचीमध्ये बदल झाला तर त्यात नवल वाटण्यासारखे काही नाही, पण तरीही सामाजिक मूल्य एक काही बाब असते. ते जोपासण्याचे काम साहित्य क्षेत्राने करायला हवे. पुस्तके वाचली जात नाहीत, वाचक वाचनालयाकडे फिरकत नाही, असे सांगितले जाते. काही प्रमाणात ते खरेही आहे. पण याच काळात विशिष्ट प्रकारच्या पुस्तकांचा खप वाढला आहे. त्याच्या अनेक आवृत्त्या प्रसिद्ध होत आहेत. हे लक्षात घेऊन साहित्य चळवळ पुढे चालविली पाहिजे. त्याचाच विचार रत्नागिरीच्या पुनरुज्जीवित झालेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या शाखाने करावा. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग त्यासाठी करायला हवा. कथा, कविता आणि कादंबऱ्यांच्या पलीकडे जायला हवे. काल्पनिक आविष्कारातून विद्यमान जगात विहार करायला हवा. साहित्यिकांची ओळख नव्या पिढीला करून देण्याचे कार्यक्रम राबविण्याच्या आधी संस्थेच्या सदस्यांनी तशी ओळख करून घेतली पाहिजे. मुळात शाखेच्या प्रत्येक सदस्याचे एक तरी पुस्तक प्रसिद्ध झाले पाहिजे, असे उद्दिष्ट आधी ठरवावे. असंख्य समस्या, घटना-घडामोडी आपल्या आजूबाजूला प्रत्यही घडत असतात. त्यांचे चित्रण करणारे लेखन करायला हवे. त्यावरच्या चर्चा व्हायला हव्यात. त्यातून पुस्तकाची निर्मिती होऊ शकेल. ती कळली, तर साहित्यिक चळवळ पुढे नेण्याची दिशा आपोआपच दिसेल.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, १२ ऑगस्ट २०२२)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply