वंदे मातरम् गीताविषयी रत्नागिरीत धनंजय चितळे यांचे व्याख्यान

रत्नागिरी : ‘स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस’ यांच्यातर्फे रत्नागिरीच्या अध्यात्म मंदिरात गेले दीड वर्ष सुरू असलेल्या मासिक व्याख्यानमालेत या वेळी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून, भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या अनुषंगाने वंदे मातरम् या गीताविषयी प्रवचनकार धनंजय चितळे विवेचन करणार आहेत. शनिवार-१३ ऑगस्ट, रविवार-१४ ऑगस्ट आणि सोमवार-१५ ऑगस्ट २०२२ असे तीन दिवस दररोज सायंकाळी पावणेसहा ते सव्वासात या वेळेत हे व्याख्यान होणार आहे.

धनंजय चितळे हे महाराष्ट्रातील तरुण पिढीतील नामवंत प्रवचनकार असून, अध्यात्माचे गाढे अभ्यासक आहेत. पेशाने भौतिकशास्त्राचे शिक्षक असलेल्या धनंजय चितळे यांच्या व्यक्तिमत्त्वात शास्त्र आणि अध्यात्माचा संगम झालेला आहे. ज्ञानेश्वरी, दासबोध, मनाचे श्लोक, रामरक्षा, अथर्वशीर्ष, श्रीसूक्‍त, श्री समर्थ रामदास स्वामी आणि स्वामी विवेकानंद यांच्यातील साम्यस्थळे, वेदांतील विज्ञान अशा अनेक विषयांवर त्यांनी आजवर २३०० प्रवचने आणि व्याख्याने दिली आहेत. महाराष्ट्र राज्यासह गोवा, कर्नाटक, हैदराबाद, ग्वाल्हेर अशा विविध ठिकाणी त्यांची व्याख्याने व प्रवचने झाली आहेत.

भौतिकशास्त्राचे त्यांचे स्वत:चे क्लासेस असून, त्यांच्या क्लासची स्वत:ची प्रयोगशाळाही आहे. चिपळूणच्या लोकमान्य टिळक ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष आणि परशुराम शिक्षण संस्थेचे विश्वस्त म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. ग्रंथालय चळवळीतील कार्याबाबत आणि आध्यात्मिक अभ्यासासाठी त्यांना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

दरम्यान, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त गेले वर्षभर चालवण्यात आलेल्या क्रांतिकारकांवरील कीर्तनमालिकेचा समारोप निवृत्त कर्नल हेमंत भागवत यांच्या उपस्थितीत १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे.

तसेच, सोमवारी, १५ ऑगस्ट रोजी श्री स्वामी स्वरूपानंदांची तारखेनुसार पुण्यतिथी आहे. त्याचे औचित्य साधून ‘श्री क्षेत्र पावस’ या षण्मासिकाचे प्रकाशन होणार आहे. अ‍ॅड. राजशेखर मलुष्टे, सुधीर (अप्पा) वणजू आणि अमेय पोतदार हे मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून या वेळी उपस्थित राहणार आहेत.

हे सर्व कार्यक्रम रत्नागिरीच्या अध्यात्म मंदिरात होणार असून, अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांना जास्तीत जास्त रत्नागिरीकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन स्वरूपानंद सेवा मंडळ आणि ‘अखिल भारतीय कीर्तन कुल-रत्नागिरी’ यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply