सैनिकांच्या शौर्याची कहाणी पुस्तकरूपाने पुढील पिढीपर्यंत न्यावी : सामंत

रत्नागिरी : वेगवेगळ्या युद्धात बलिदान करणारे शूर सैनिक आणि त्यांच्या कुटुंबाची प्रत्येकाची वेगळी कहाणी आहे. ती पुस्तकरूपाने पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम जिल्हा प्रशासनाने करावे, अशी सूचना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली.

येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात ७६ व्या स्वातंत्र्यदिनी सैनिक कल्याण कार्यालयातर्फे आयोजित शौर्य पदक विजेते सैनिक तसेच सैनिकांच्या वीरमाता आणि वीरपत्नी यांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.

स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्य अबाधित ठेवणारे सैनिक आणि त्यांच्या वीरमाता, वीरपत्नी यांचा सन्मान सोहळा प्रतिवर्षी आवर्जून होण्याची गरज आहे. त्यांचे कार्य अनमोल आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. अशा पद्धथीने सैन्य दलातील जवानांच्या शौर्याचा सर्वांत अधिक सन्मान करणारा रत्नागिरी हा राज्यातील पहिलाच जिल्हा आहे. दरवर्षी मुख्य ध्वजवंदन कार्यक्रमानंतर असा कार्यक्रम आयोजित करावा. त्यातून इतर जिल्ह्यांनाही सकारात्मक संदेश जाईल आणि जिल्हा पातळीवरच नव्हे, तर देशपातळीवर सैनिकांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेतली जाईल.

आजवरच्या युद्धामध्ये शहीद झालेल्या सर्व जवानांना कार्यक्रमाच्या प्रारंभी दोन मिनिटांचे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, त्यानंतर सन्मान सोहळा झाला. वीरसैनिकांच्या माता आणि पत्नी यापैकी २५ जणांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाईल, अशी घोषणा इन्फिगो नेत्रालयाचे डॉक्टर श्रीधर ठाकूर यांनी केली. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या मदतीने या सर्वांसाठी एखाद्या शिबिराच्या माध्यमातून असे आयोजन करावे, असे सामंत यांनी यावेळी सांगितले.

सैन्य दलातील सेवा पूर्ण करून राज्यात परतणाऱ्या सैनिकांना उद्योग तसेच इतर क्षेत्रात सेवा द्यायची असेल तर त्यासंदर्भात शासनाच्या वतीने आपण सकारात्मक आहोत, असे सांगून सामंत म्हणाले की याबाबतचे निर्देश लवकरच आपण जारी करू. सैनिक कुटुंबियांच्या अडीअडचणी अनेक आहेत त्या सोडविण्याच्या दृष्टिकोनातून मंत्रालयाच्या स्तरावर एक बैठक लवकरच घेऊन त्या संदर्भातही निर्णय घेतले जातील.

नवोदय विद्यालय प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील ७५ विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गुणगौरव करण्यात आला.

जिल्हा प्रशासनातर्फे रत्नागिरीतील पर्यटन क्षेत्राची वाढ व्हावी आणि पर्यटकांना मदत व्हावी, याकरिता एक परस्परसंवादी अर्थात इंटरॲक्टिव्ह संकेतस्थळ तयार केले आहे. या संकेतस्थळाचे लोकार्पण उद्योग मंत्र्यांनी केले.

कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा सैनिक कल्याण अधिकारी सुशांत खांडेकर, शौर्यपदकधारक कमांडो मधुसूदन सुर्वे, जिल्हा विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक घाणेकर आदी मान्यवर व्यासपीठावर होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply