गर्जा जयजयकार क्रांतीचा कीर्तनमालिकेतून जवानांसाठी २५ हजाराची मदत

रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाच्या (पावस, रत्नागिरी) आणि अखिल भारतीय कीर्तन कुलाच्या रत्नागिरी शाखेच्या वतीने वर्षभर पार पडलेल्या गर्जा जयजयकार क्रांतीचा कीर्तनमालिकेतून जवानांसाठी २५ हजाराची मदत देण्यात आली.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सुरू झालेल्या गर्जा जयजयकार क्रांतीचा या कीर्तनमालिकेचा समारोप रत्नागिरीच्या अध्यात्म मंदिरात झाला. स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे रत्नागिरीच्या अध्यात्म मंदिरात गेले दीड वर्ष सुरू असलेल्या मासिक व्याख्यानमालेत यावेळी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्ताने भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या अनुषंगाने वंदे मातरम् या गीताविषयी चिपळूणचे प्रवचनकार धनंजय चितळे यांनी विवेचन केले. तीन दिवसांच्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. संपूर्ण वंदे मातरम् या गीतातील प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगून गीताचे सुमधुर विवेचन श्री. चितळे यांनी केले. भारताच्या समृद्धतेचे यथायोग्य वर्णन या गीतात असल्याचे श्री. चितळे यांनी सांगितले. त्यासाठी पुराणवाङ्मयासह आधुनिक वाङ्मय, इतिहास, लोकमान्य टिळक, स्वा. सावरकर, स्वामी विवेकानंद, नेताजी सुभाषचंद्र बोस इत्यादी स्वातंत्र्यसंग्रामातील नेत्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांचे दाखले देत त्यांनी वंदे मातरम् गीताचे महत्त्व रंजक पद्धतीने सांगितले.

याच कार्यक्रमात वर्षभर मोफत सेवा देणारे कीर्तनकार आणि त्यांच्या संगीत साथीदारांचा सन्मान करण्यात आला. वर्षभरात दर महिन्याला चौथ्या शनिवार-रविवारी कीर्तने झाली. त्यामध्ये आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, नेताजी सुभाषचंद्र बोस, कान्हेरे बंधू, बालमुकुंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, धर्मवीर संभाजी अशा अनेक क्रांतिकारकांची चरित्रे सांगण्यात आली. या कीर्तनमालिकेमध्ये एकाही कीर्तनकाराने किंवा साथीदाराने कोणतेही मानधन घेतले नाही. आदित्य वैद्य, किरण जोशी, महेश काणे, नंदकुमार कर्वे, श्रीनिवास पेंडसे, सौ. रेश्मा खेडकर, सौ. सुखदा घाणेकर, सौ. सायली मुळ्ये, कैलास खरे यांनी ही कीर्तने सादर केली. त्यांना विजय रानडे, आनंद ओळकर, चैतन्य पटवर्धन, वरद सोहोनी, संकेत चक्रदेव, वेदांग जोशी, केदार लिंगायत यांनी संगीतसाथ केली. या साऱ्यांचा प्रातिनिधिक सत्कार समारोपाच्या समारंभात करण्यात आला. समारंभाला अखिल भारतीय कीर्तन कुलाचे रत्नागिरीचे अध्यक्ष वाडदेकर बुवा, स्वरूपानंद सेवा मंडळाचे ऋषिकेश पटवर्धन, मंडळाचे श्री. गोडबोले, किरण जोशी, प्रवचनकार धनंजय चितळे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढच्या वर्षी अधिक श्रावण महिना येणार आहे. त्यानिमित्ताने अध्यात्म मंदिरात सेवा करण्याची घोषणा श्री. वाडदेकर यांनी यावेळी केली.

कीर्तनाच्या आरतीमधून वर्षभरात जमा झालेले पंचवीस हजार रुपये भारतीय जवानांना मदतीसाठी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती यावेळी विवेक भावे यांनी दिली.

संपूर्ण वर्षभराचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे जयंतराव देसाई, ऋषिकेश पटवर्धन, शिल्पाताई पटवर्धन, विवेक भावे, विनायक जोशी यांनी विशेष सहकार्य केले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply