रत्नागिरी : राष्ट्र सेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठानने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने वैचारिक मंथनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी भारताची शैक्षणिक प्रगती (निवृत्त शिक्षिका सौ. प्रतिभा प्रभुदेसाई), आर्थिक धोरण (लेखापाल वैभव देवधर), दळणवळण (निवृत्त मुख्याध्यापक आनंद मराठे), क्रीडा क्षेत्रातील प्रगती (जिल्हा अॅटलेटिक्स असोसिएशनचे सचिव संदीप तावडे) आणि भारताचे कृषी धोरण (नारळ संशोधन केंद्राचे माजी कृषीविद्यावेत्ता डॉ. दिलीप नागवेकर) या विषयावर चर्चा झाली.
येथील माधवराव मुळ्ये भवनात हा कार्यक्रम झाला. उपस्थितांचे स्वागत अष्टगंध लावून, रक्षासूत्र बांधून, नारळवडी देऊन करण्यात आले. भारताच्या मानचित्रासोबत ७५ पणत्या लावण्यात आल्या. भारतमातेच्या पूजनाने कार्यक्रमाची शोभा वाढली. दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम सुरू असतानाच स्नेहा बिजरगी यांनी विष्णुमय जग हा श्लोक सादर केला. जुई डिंगणकर हिने ‘ए मेरे वतन के लोगो’ हे गीत आपल्या गोड आवाजात सुरेख म्हटले.
आपले विचार मांडताना सौ. प्रतिभा प्रभुदेसाई म्हणाल्या, स्वातंत्र्यपूर्व काळात मुले गुरुगृही जाऊन शिकत असत. मातृभाषेत शिक्षण घेत असत. ब्रिटिश राजवट आल्यावर आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही इंग्रजी माध्यमाचा प्रभाव वाढू लागला. संस्कारक्षम संस्कृतचा विसर पडला. उत्तम नागरिक निर्माण झाले पाहिजेत, असे शिक्षण आता तरी दिले गेले पाहिजे.
मा. वैभव देवधर यांनी आर्थिक प्रगतीवर आपले विचार मांडले. भारत-पाकिस्तान फाळणीमुळे आपले खूप आर्थिक नुकसान झाले. नंतर पंचवार्षिक योजना सुरू झाल्या. पण आर्थिक प्रगती २०१७ सालापासून खऱ्या अर्थाने सुरू झाली. आपण अन्य काही देशांना आर्थिक मदत देऊ शकलो. क्रीडा क्षेत्रातील प्रगतीविषयी संतोष तावडे म्हआले, २०१४ सालापासून क्रीडा क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्यात आले. त्याचा चांगला परिणाम ऑलिंपिकमध्ये दिसून आला. मुलांचे १४ वर्षांपर्यंतचे वयच क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्याच्या दृष्टीने योग्य आहे, असे त्यांनी सांगितले. दळणवळणाविषयी बोलताना आनंद मराठे सर यांनी विविध साधनांच्या प्रगतीचा आढावा घेतला. कृषी क्षेत्रातील प्रगती सांगताना डॉ. दिलीप नागवेकर यांनी कोकणातील शेतीविषयक धोरणांचे विवेचन केले. आपला शेतकरी शहराकडे वळला आणि शेतीकडे दुर्लक्ष झाले. शासनाच्या अनेक योजना शेतकऱ्यांसाठी आल्या. शेतीत आधुनिकता आली. वाहतुकीमुळे शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळाला. परंतु अनेक अडचणींना सध्या शेतकऱ्याला तोंड द्यावे लागत आहे.
प्रत्येक दोन व्याख्यानांच्या मध्यंतरामध्ये श्लोक, देशभक्तिपर गीते सादर करण्यात आली. सार्थक केळकरने ‘मैं रहू या ना रहू भारत ये रहना चाहिये’ हे गीत छान सादर केले. आदिती काजरेकर आणि आर्या मुळे यांनी श्लोक सादर केले. अलका भावे यांनी देवभूमी भरतभू माँ हृदय मे साकार हो.. हे गीत सादर केले. सूत्रसंचालन सुनेत्रा जोशी यांनी आपल्या सुंदर भाषाशैलीत स्वरचित काव्यपंक्तींचा वापर करून केले. आभारप्रदर्शन प्रिया केळकर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता ‘वंदे मातरम्’ने झाली.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

