छायाचित्र दिनानिमित्ताने दहीहंडी उत्सव छायाचित्रण स्पर्धा

रत्नागिरी : जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्हा फोटो व्हिडिओ व्यावसायिक सहकारी संस्थेने छायाचित्र स्पर्धेचे आयोजन केले आहे. मोबाइल आणि व्यावसायिक अशा दोन गटांत स्पर्धा होणार असून यामध्ये दहीहंडी उत्सवाचे फोटो पाठवता येणार आहेत.

येत्या १९ ऑगस्ट रोजी छायाचित्र दिन आहे. त्यानिमित्त या स्पर्धेची घोषणा संस्थेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ छायाचित्रकार अजय बाष्टे यांनी केली. स्पर्धेसाठी फक्त एक फोटो पाठवता येईल. तो ८ बाय १२ इंचाचा आणि ३०० रिझोल्यूशनमध्ये असावा. मोबाइलमधून काढलेल्या फोटोंच्या गटासाठी अनुक्रमे १५००, १००० आणि ७५० अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. व्यावसायिक गटासाठी अनुक्रमे ३०००, २००० आणि १००० रुपयांची पारितोषिके दिली जातील. १९ ला दहीहंडी असल्यामुळे त्या दिवशी काढलेला फोटो rdpvphotographers@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवायचा आहे. फोटो पाठवण्याची अंतिम मुदत २० ऑगस्टला रात्री १० वाजेपर्यंत आहे.

फोटोग्राफर रत्नागिरी जिल्ह्याचा रहिवासी असावा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दहीहंडीचा फोटो अपेक्षित आहे. हे फोटो रत्नागिरी जिल्हा फोटो व्हिडिओग्राफर व्यावसायिकांच्या संस्थेच्या इन्स्टाग्राम आणि फेसबुक पेजवर अपलोड करण्यात येणार आहेत. निकाल २२ ऑगस्टला जाहीर करण्यात येणार आहे.

पुढील काळात गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी असे सण, उत्सवावर स्पर्धा होणार आहे. या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील सण, उत्सवांचा फोटोग्राफीतून दस्तावेज जमा करण्यात येणार आहे. याचा उपयोग भविष्यात होणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या हौशी, आऊटडोअर फोटोग्राफर्सना संघटनेच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन करण्याकरिता सेमिनार, वर्कशॉपचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती अजय बाष्टे यांनी दिली.

हौशी आणि आऊटडोअर छायाचित्रकार व व्हिडिओ व हौशी मोबाईल छायाचित्रकार यांनी १९ ऑगस्ट रोजी छायाचित्र दिन कार्यक्रमात सहभागी होऊन संस्थेचे सभासद व्हावे आणि प्रोफेशनल व्हिडीओग्राफर व छायाचित्रकार व्हावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply