रत्नागिरीची प्लॅंट लायब्ररीची स्टार्ट अप संकल्पना राज्यात लाखमोलाची

रत्नागिरी : येथील सौ. माधुरी कळंबटे यांनी मांडलेली प्लँट लायब्ररीची स्टार्ट अप संकल्पना जिल्ह्यात आणि राज्यात अव्वल ठरली आहे. त्याबद्दल त्यांचा मुंबईत रविवारी (दि. १६ ऑक्टोबर) राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एक लाखाच्या पुरस्कारासह सत्कार करण्यात येणार आहे.

जिल्हा स्तरावरील स्टार्ट अप पुरस्कार स्वीकारताना सौ. माधुरी कळंबटे, प्रतीक कळंबटे, कन्या ऊर्वी

महाराष्ट्र स्टार्टअपअंतर्गत काल रत्नागिरीच्या फिनोलेक्स अकादमीत बूट कॅम्प झाला. नावीन्यपूर्ण व्यवसाय संकल्पनांसाठी तीन पुरस्कार यात निश्चित करण्यात आले. यात जिल्हास्तर आणि राज्यस्तरावरील विजेत्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात आणि राज्यात सर्वोत्तम संकल्पना मांडणाऱ्या माधुरी कळंबटे यांना एक लाख रुपयांचा राज्य व जिल्हा पुरस्कार जाहीर झाला आहे. कौशल्य विकास विभागातर्फे येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पंडित दिनदयाळ रोजगार मेळावा आज झाला. त्यावेळी सौ. कळंबटे यांचा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्लँट लायब्ररी ही आगळी संकल्पना अशी आहे की, लोकांना झाडे आवडतात. पण झाडे लावल्यानंतर त्यांची जोपासना करणे त्यांना वेळेअभावी शक्य होत नाही. त्यावरचा उपाय म्हणून प्लँट लायब्ररी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमानुसार ग्राहकाला अल्प शुल्कात दरमहा वेगवेगळी झाडे दिली जातात. त्यांना फक्त पाणी घालण्याचे काम ग्राहकाला करावे लागते. त्यातून ग्राहकांची झाडांची आवड पूर्ण होते. घरातील वातावरण चांगले राहायला मदत होते आणि व्यवसायही केला जातो. रत्नागिरीत साळवी स्टॉप-नाचणे रस्त्यावर वृक्षवल्ली नर्सरीतून हा व्यवसचालविला जातो. सौ. कळंबटे यांच्या या आगळ्यावेगळ्या संकल्पनेकरिता त्यांना पुरस्कार मिळाला असून उद्या (दि. १६ ऑक्टोबर) मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत त्यांना तो दिला जाईल. त्यांचा आजच्या कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हास्तरावर द्वितीय पुरस्कार मयूर कोल्हे याला मिळाला असून तृतीय पुरस्कार विश्वजित साळवी याला मिळाला आहे. या दोघांचाही यावेळी पुरस्कार आणि धनादेश देऊन गौरव करण्यात आला.

दरम्यान, दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याचे उद्घाटन करताना पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, स्थानिकांना रोजगार मिळवून देणाऱ्या उद्योगांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील आणि यासाठी उद्योगांनीही पुढाकार घ्यावा. व्यवसाय आणि उद्योग वाढीला प्रोत्साहन देण्याचे काम शासन करीत आहे. तथापि या उद्योगांनी स्थानिकांना डावलण्याचा प्रयत्न केला, तर ते खपवून घेतले जाणार नाही. उद्योग उभारणी करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा पुरविण्याची भूमिका मी पालकमंत्री या नात्याने घेतली आहे. उद्योगांना कोणत्या प्रकारचे कुशल मनुष्यबळ हवे आहे, हे त्यांनी सांगावे. त्या स्वरूपाचे शिक्षण आणि प्रशिक्षण येथे उपलब्ध करून रोजगारात स्थानिकांचा वाटा वाढावा यासाठी प्रयत्न केला जाईल. आयटीआयमध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी मूलत: ग्रामीण भागातून येतो त्यामुळे त्याची आर्थिक स्थिती बेताची असते. अशा सर्वांना शिक्षण घेणे शक्य व्हावे, यासाठी संपूर्ण राज्याचे सर्वंकष धोरण ठरविण्यात येईल, असेही उद्योगमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
विद्यार्थ्यांनी उपलब्ध सुविधांचा वापर करून रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करावेत, असे यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सांगितले.

या कार्यक्रमास कौशल्य विभाग सहायक संचालक इनुजा शेख, जिल्हा सहायक व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी कोतवडेकर, रत्नागिरी आयटीआयचे प्राचार्य शेट्ये आदी उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

One comment

  1. अभिनंदन. माझी खूप वर्ष आवडती कल्पना आहे ही. वेळेअभावी मी करू शकले नाही आपण ती प्रत्यक्षात राबवत आहात हे वाचून आनंद झाला. 👍💐💐

Leave a Reply