उद्योगमंत्री उदय सामंत यांचा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सला सकारात्मक प्रतिसाद

मुंबई : महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील उद्योगांचे गेल्या दोन वर्षांपासूनचे प्रलंबित अनुदान राज्य सरकारने तत्काळ वितरित करावे, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली. श्री. सामंत यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाने उद्योगधंद्यांच्या प्रलंबित अनुदानासंबंधी आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या शाखेचे रत्नागिरीत अलीकडेच श्री. सामंत यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्या पार्श्वभूमीवर लगेचच झालेल्या बैठकीत श्री. सामंत यांनी महाराष्ट्र चेंबरचे मुद्दे बैठकीत उचलून धरले.

ललित गांधी यांनी यावेळी सांगितले की, राज्यातील उद्योग प्रकल्पांचे प्रलंबित अनुदान सुमारे ९ हजार कोटी इतके आहे. त्यापैकी सरकारने तीन हजार कोटी रुपये अनुदान मंजूर केले असून ६७० कोटी रुपये प्रत्यक्ष वितरित केले आहेत. मंजूर रकमेपैकी उर्वरित २३०० कोटी रुपये एकरकमी अदा करावेत, अशी मागणीही ललित गांधी यांनी केली.

सरकारने अनुदान लवकर वितरित व्हावे, अशी भूमिका घेतली असून तात्काळ हे अनुदान वितरित करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले. मंजूर रक्कम एक अथवा दोन टप्प्यांत ताबडतोब वितरित करण्याचे आदेश निर्गमित केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

ललित गांधी यांनी यावेळी नवीन व विस्तारित उद्योग प्रकल्पांच्या अनुदान योजनेच्या पात्रतेची मर्यादा करोना काळातील दोन वर्षांचा काळ गृहीत धरता यापुढे दोन वर्षे वाढवण्याची मागणीही केली. औद्योगिक वसाहतीमधील विविध प्रलंबित प्रश्न उद्योग जगताच्या अन्य मागण्यांसंबंधी उद्योग मंत्री आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक लवकरच घेऊ, असे आश्वासन उदय सामंत यांनी ललित गांधी यांना दिले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply