बाळासाहेबांची शिवसेना आयोजित कोकण महोत्सवाला ठाण्यात प्रारंभ
ठाणे : स्वातंत्र्यवीर सावरकर नगर (ठाणे) बाळासाहेबांची शिवसेना आयोजित कोकण महोत्सवाला ठाण्यात आज (दि. २९ ऑक्टोबर) प्रारंभ झाला. हा महोत्सव येत्या ६ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे आरवली (ता. वेंगुर्ले) येथील आरवली गावचे ग्रामदैवत श्रीदेव वेतोबा मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
कोकण महोत्सवाचा प्रारंभ कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक प्रा. प्रदीप ढवळ यांच्या हस्ते होणार आहे. आजपासून दररोज सायंकाळी ६ ते १० या कालावधीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीत सावरकरनगर येथील ठाणे महापालिका शाळा क्र. १२० चे पटांगण येथे हा पंधरावा कोकण महोत्सव नगरसेवक दिलीप बारटक्के यांनी आयोजित केला आहे.
महोत्सवात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नगरसेवक श्री. बारटक्के यांचा पंचवार्षिक कार्य अहवाल प्रकाशित होणार आहे. कोकणातील प्रसिद्ध दशावतार नाट्यमंडळाची पारंपरिक दशावतारी नाटके, धयकाला, नमन, व्याख्यान, महिलांसाठी खेळ पैठण्यांचा, गुणवंत विद्यार्थ्यांचा, नागरिकांचा सत्कार, मुलांसाठी फनफेअर, स्थानिक नवेदित कलाकाराचा सांस्कृतिक कार्यक्रम असे महोत्सवाचे स्वरूप आहे.
कोकणातील कुटुंब प्रमुख परिवार गावी शेती करतो, व्यवसाय करतो, त्याचे मुंबईतील चाकरमान्यांतर्फे कौतुक व्हावे, त्याच्या मालाची विक्री व्हावी, बाजारपेठ मिळावी या उद्देशाने कोकणभूमीतील आंबा, फणसपोळी, काजू, घरगुती उकडे तांदूळ, कुळथाची पिठी, आमसुले, तिरफळे, मालवणी मसाले, मासळी, खाद्यपदार्थ म्हावरा, खडखडे लाडू, मालवणी खाजा आदींच्या विक्रीचे स्टॉल उभारले आहेत, अशी माहिती कोकण महोत्सव समिती संकल्पनाकार अमित लोटलीकर, शाखाप्रमुख हितेंद्र लोटलीकर, सुहास चव्हाण यांनी दिली.
आज सायंकाळी ७ वाजात रत्नागिरी येथील राधाकृष्ण नृत्य पथक कोकणातील पारंपरिक नमन सादर करणार आहे. रविवारी, दि. ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता महिलांसाठी “खेळ पैठणीचा”, ३१ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वा वाजता जय हनुमान पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ, सावंतवाडी यांचे नाटक, दि. १ नोव्हेंबरला सायंकाळी ७ वाजता स्वा. सावरकर यांच्या जीवनावर व्याख्यान, बुधवार दि. २ नोव्हेंबर सायंकाळी ७ वाजता नाटक – खानोलकर दशावतार नाट्य मंडळ, गुरुवार दि. ३ नोव्हेंबर सायंकाळी ७ वाजता कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, सुधीर कलिंगण प्रस्तुत नाटक, शुक्रवार दि. ४ नोव्हेंबर सायंकाळी ७ वाजता चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ, चेंदवण यांचे नाटक, शनिवार दि. ५ नोव्हेंबर सायंकाळी ७ वाजता सत्कार सोहळा, रवि घरत आणि सुरेश पाटील प्रस्तुत स्वर रचना प्रस्तुत गीत नृत्य आविष्कार, रविवार दि. ६ नोव्हेंबर सायं. ६ वाजता भोंडला, सायं. ७ वाजता “देवमाऊली दशावतार” नाट्यमंडळ, इन्सुली, सावंतवाडी यांचे नाटक आदी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
कोकण महोत्सवानिमित्ताने ठाण्यापासून सिंधुदुर्गात वेंगुर्ल्यापर्यंत पर्यंत अनेक चाकरमानी गाववाले यांना आपल्याला भेटता येणार आहे. मोहत्सवाक येवकच होया, कोकण आपलोच आसा… असे आवाहन आयोजक नगरसेवक दिलीप बारटक्के यांनी केले आहे.
(संपर्क ९८९२२५८४५७)


