लांज्यात राणी लक्ष्मीबाई जयंती स्पर्धांमध्ये मुलींचे वर्चस्व

लांजा : राणी लक्ष्मीबाईंच्या जयंतीच्या निमित्ताने लांजा तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये मुलींनी वर्चस्व राखले. यावेळी देण्यात आलेल्या पारितोषिकांपैकी २१ पैकी १७ पारितोषिके मुलींनी मिळविली, तर मुलांना अवघ्या ४ पारितोषिकांवर समाधान मानावे लागले.

कोट (ता. लांजा) येथील रणरागिणी लक्ष्मीबाई स्मारक ट्रस्ट आणि लांज्यातील लोकमान्य वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने राणी लक्ष्मीबाई जयंती लोकमान्य वाचनालयात उत्साहात साजरी झाली. यावेळी या स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले.

राणी लक्ष्मीबाईंच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी रणरागिणी लक्ष्मीबाई स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष लाड, लोकमान्य वाचनालयचे अध्यक्ष ॲड. अभिजित जेधे, उपाध्यक्ष योगेश वाघधरे, आबा सुर्वे, शिक्षण विस्तार अधिकारी विनोद सावंग, महेंद्र साळवी, ललिता भिंगे, विजयालक्ष्मी देवगोजी, विनोद बेनकर, मिलिंद कोटकर, मंगेश चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला माजी सभापती दत्तात्रय कदम यांनी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री. लाड म्हणाले, राणी लक्ष्मीबाईंची जयंती इतर महापुरुषांप्रमाणेच सर्वत्र साजरी व्हायला हवी. राणीच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा द्यायला हवा. लोकमान्य वाचनालयाने ही सुरुवात केली आहे, याचा आनंद वाटतो, असे सांगून त्यांनी राणीच्या पराक्रमाची गाथा ऐकवली. राणी लक्ष्मीबाईंचे स्मारक होणे ही अस्मिता असल्याचे नमूद करून कोट गावी भव्य स्मारक उभारण्यासाठी ट्रस्टने पुढाकार घेतलेला आहे, असेही ते म्हणाले.

श्री. जेधे यांनी राणी लक्ष्मीबाईंच्या कार्याचा गौरव केला. वाचनालयात जयंती साजरी करण्यात आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच ध्येयाच्या मार्गावर चालण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

राणी लक्ष्मीबाईंच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेच्या विजेत्यांना गुणानुक्रमे रोख ५०१, ३०१ आणि २०१ रुपयांची पारितोषिके तसेच पुस्तक, प्रशस्तीपत्र आणि गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत एकूण ८२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

स्पर्धेतील विजेत्यांचा गुणानुक्रमे तपशील असा – निबंध स्पर्धा- प्राथमिक गट (पाचवी ते सातवी)- समीक्षा प्रकाश नाझरे (लांजा शाळा क्र. ५), प्राची संतोष राजापकर (शिरवली), वेदिता विजय डिके (कोट नं. १), आशीष अनिल गोबरे (शिरवली), कस्तुरी संदीप मेस्त्री (तळवडे).

निबंध स्पर्धा – माध्यमिक गट (आठवी ते दहावी) सिद्धी दिलीप कोतापकर (लांजा हायस्कूल), शुभम् सुरेश भितळे (तळवडे हायस्कूल), प्रीती मंगेश निब्दे (वेरवली), सिद्धी राजेश पावसकर (आसगे हायस्कूल), धनश्री हेमराज सुर्वे (लांजा हायस्कूल).

वक्तृत्व स्पर्धा प्राथमिक गट (पाचवी ते सातवी) – आदिती प्रभाकर म्हेतर (प्रभानवल्ली), लतिका भूषण सावंत, नीरजा संतोष राजापकर (शिरवली), शमिका संतोष जाधव, आशीष अनिल गोबरे (शिरवली).

वक्तृत्व स्पर्धा माध्यमिक गट (आठवी ते दहावी) अथर्व विवेक पाध्ये (लांजा हायस्कूल), स्वरांगी दिनेश पांचाळ (तळवडे हायस्कूल), कोमल संतोष मेस्त्री (वेरवली हायस्कूल), सारा संतोष जाधव (विद्यादीप हायस्कूल, लांजा), शर्वरी संजय चिपटे (व्हेळ हायस्कूल), चंदना चंद्रकांत चिपटे (व्हेळ हायस्कूल).

स्पर्धेचे परीक्षण दिगंबर मुळ्ये, प्रकाश बंडबे, ललिता भिंगे, विजयालक्ष्मी देवगोजी, महेंद्र साळवी, संजना वारंग, संगीता कदम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकमान्य वाचनालयाचे कार्यवाह उमेश केसरकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्रंथपाल स्मिता उपशेटे, रामचंद्र लांजेकर, अश्विनी गुरव, शुभम नागवेकर यांनी मेहनत घेतली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply