Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

झोंपाळ्यावरची गीता : जशी आहे तशी

Advertisements

भारतीय संस्कृतीमध्ये भगवद्गीतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मानवी जीवनाचे संपूर्ण तत्त्वज्ञान गीतेमध्ये सामावले आहे, असे म्हटले जाते. गीतेचे वैशिष्ट्य असे की केवळ १८ अध्यायांमधील ७०० लोकांमध्ये सामावलेले हे तत्त्वज्ञान प्रत्येक वाचनाच्या वेळी नवनवा अर्थ देत असते. म्हणूनच या तत्त्वज्ञानाबद्दल जगभरात सर्वत्र आकर्षण आहे. मूळ संस्कृत भगवद्गीतेचे भारतातील विविध भाषांमध्ये भाषांतर तर झालेच, पण इंग्लिश, जर्मन, रशियन भाषांसह जगभरातील अनेक भाषांमध्ये गीतेविषयीचे हजारो ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. जागतिक कीर्तीच्या अनेक तत्त्वचिंतकांच्या अभ्यासपूर्ण वाङ्मयावर गीतेतील तत्त्वज्ञानाचा प्रभाव पडल्याचे मत अनेक अभ्यासकांनी मांडले आहे. ज्ञानेश्वरी हा गीतेतील तत्त्वज्ञान तेव्हाच्या सोप्या मराठीत समजावून सांगणारा ओवीबद्ध ग्रंथ सातशे वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरांनी लिहिला. त्याची पारायणे सातत्याने मोठ्या भाविकतेने केली जातात. त्या ज्ञानेश्वरीचे आणि मूळ भगवद्गीतेचेही मराठी भाषेतही असंख्य ग्रंथ निर्माण झाले. लोकमान्य टिळकांनी लिहिलेले गीतारहस्य सर्वमान्य झाले आहे. गीता म्हणजे निवृत्तीचा नव्हे, तर प्रवृत्तीचा, चांगले काही करण्याची प्रेरणा देणारा ग्रंथ आहे, असे लोकमान्यांनी म्हटले आहे. गीता म्हणजे निवृत्तीचा नव्हे, तर प्रवृत्तीचा, चांगले काही करण्याची प्रेरणा देणारा ग्रंथ आहे, असे लोकमान्यांनी म्हटले आङे. गीतारहस्य ग्रंथ निर्माण झाला, त्याच काळात म्हणजे १०० वर्षांपूर्वी झोंपाळ्यावरची गीता हा असाच एक संस्कृतमधून मराठी भाषेत झालेला ओवीबद्ध आविष्कार आहे.

दत्तात्रेय अनंत आपटे यांनी १९१७ साली झोंपाळ्यावरची गीता हे ५४६ ओव्यांचे पुस्तक प्रसिद्ध केले. विनोबा भावे यांनी १९३२ साली समश्लोकी गीताई लिहिली होती. गीतेमध्ये ७०० श्लोक आहेत. त्या प्रत्येक श्लोकाचे शब्दशः मराठीकरण विनोबा भावे यांनी केले होते. त्यामुळे गीताईमध्ये ७०० श्लोकच आहेत. त्यापूर्वी पंधरा वर्षे दत्तात्रेय अनंत आपटे ऊर्फ अनंततनय यांनी झोंपाळ्यावरची गीता लिहिली होती. ती मात्र समश्लोकी नाही. मूळ गीतेतील अनेक श्लोकांचा त्यांनी मराठीमध्ये स्पष्टीकरण करताना विस्तार केला आहे, तर काही श्लोक कमी शब्दांमध्ये रूपांतरित केले आहेत. कोकण मीडिया साप्ताहिक ज्या संस्थेतर्फे प्रसिद्ध केले जाते, त्या कोकण मीडियाच्या सत्त्वश्री प्रकाशनाने २०१५ साली अनंततनय यांचे हे पुस्तक पुनर्प्रकाशित केले होते. आता त्याचा पुढचा टप्पा म्हणजे कोकण मीडियाचेच एक लेखक राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी त्या झोंपाळ्यावरच्या गीतेचा केलेला समश्लोकी इंग्रजी अनुवाद गीता जयंतीच्या मुहूर्तावर प्रसिद्ध होत आहे. (ई-बुक लिंक)

अलीकडे वाचनाची आवड कमी झाली आहे. पुस्तकांचा खप ओसरत आहे. मराठीमध्ये तर प्रकाशन व्यवसायाला उतरती कळा लागली आहे, असे सांगितले जाते. अशा या काळात भगवद्गीतेसारख्या क्लिष्ट विषयाचे आणखी एक पुस्तक प्रसिद्ध करणे म्हणजे अव्यापारेषु व्यापार आहे, असेच अनेकांना वाटेल. पण मराठीतील एका श्रेष्ठ वाङ्मयकृतीचा इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याच्या आजच्या काळातील नव्या पिढीतील मराठी मुलांना परिचय व्हावा, या हेतूने कोकण मीडियाने हा अव्यापारेषु व्यापर मांडला आहे. या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद करणारे राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनीच भगवद्गीतेचा जगभरातील साहित्यिकांवर कसा प्रभाव पडला होता, याचा मागोवा घेणार लेख लिहिला आहे. तो याच अंकात प्रसिद्ध केला आहे. त्यावरून गीतेचे जागतिक महत्त्व लक्षात येईल. ते ओळखून गीतेचा अभ्यास करायला प्रवृत्त होणाऱ्यांना या इंग्रजी पुस्तकाचा नक्कीच उपयोग होईल. पुस्तकाला वाचकांचा प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version