गीता जयंतीनिमित्त गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात गीताव्रतींचा सन्मान

रत्नागिरी : ‘गीतेचे केवळ पाठांतर न करता त्यातील तत्त्वज्ञान आपलेसे करण्यासाठी गीताव्रती प्रयत्न करत आहेत. सर्वसामान्य व्यक्तीनेही गीतेतील तत्त्वज्ञान आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करावेत. सुख-दुःखामध्ये गुरफटून न जाता या दोन्ही बाबतीत साम्यावस्था आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत,’ असे प्रतिपादन निवृत्त प्राध्यापिका डॉ. नीला जोशी यांनी केले. गीता जयंतीनिमित्त रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातर्फे गुरुकृपा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

संपूर्ण भगवद्गीता पठण करून शृंगेरी पीठाचे पारितोषिक मिळवणार्‍या गीताव्रती सौ. वंदना घैसास, सौ. उज्ज्वला पटवर्धन यांचा सन्मान गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाने केला. सौ. योजना घाणेकर यांच्या वतीने पती सुमुख घाणेकर व सासूबाई श्रीमती घाणेकर बाई यांनी सत्कार स्वीकारला. या कार्यक्रमात डॉ. जोशी बोलत होत्या. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांचा सन्मान संस्कृत विभागप्रमुख व उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये यांनी केला. तेव्हा त्यांनी महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाचे कौतुक केले. विविध स्पर्धा, उपक्रमांमधून संस्कृत प्रसाराचे काम हा विभाग करत असल्याचे त्यांनी सांगितले. अशा उपक्रमातून गीताव्रती तयार होवोत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

गीताजयंतीनिमित्त गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉ. नीला जोशी. सोबत (डावीकडून) डॉ. कल्पना आठल्ये, डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, उज्ज्वला पटवर्धन व वंदना घैसास.

यानंतर डॉ. आठल्ये यांनी गीताव्रतींची प्रकट मुलाखत घेतली. त्या वेळी उज्ज्वला पटवर्धन म्हणाल्या, ‘गीतेतील संस्कृत शब्दांचे उच्चार कसे करावेत याची माहिती पुण्याच्या गीता धर्म मंडळात घेतली. नंतर पाणिनीच्या व्याकरणानुसार उच्चारण सुरू केले. १३ महिन्यांत पाठांतर केले. गोकुळाष्टमी उत्सवात जावांनी गीता म्हणण्यास बोलावले. त्या वेळी सर्व १८ अध्याय वाचल्यावर सराव झाला आणि पुढच्या वर्षी पाठ करून येईन असे मी गोपाळकृष्णाला सांगितले.’

शृंगेरी पीठामधील स्पर्धेवेळचा अनुभवही त्यांनी सांगितला. स्पर्धेसाठी सुरुवातीला ५०० जणांची प्रतीक्षा यादी होती. देशभरातून येथे स्पर्धक येतात. रत्नागिरीकरांनीही या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला गोपाळकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. जयंत अभ्यंकर यांनी केले. या वेळी डॉ. नीला जोशी यांचा सत्कार प्राचार्य कुलकर्णी यांनी केला. प्रा. स्नेहा शिवलकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला संस्कृत विभागाचे विद्यार्थी, रत्नागिरीतील गीताप्रेमी मंडळी उपस्थित होती. करोनाचे नियम पाळून कार्यक्रम झाला.

‘सेवानिवृत्तीनंतर शक्य झाले’
वंदना घैसास म्हणाल्या, ‘योजना घाणेकर यांनी प्रथम २०१६मध्ये बक्षीस मिळवले. त्यांच्याकडून मला प्रेरणा मिळाली. संस्कृत शिक्षिका असताना शक्य झाले नाही ते सेवानिवृत्तीनंतर शक्य झाले. नारायणी पठण मंडळ, तसेच सौ. विशाखा भिडे यांचे मार्गदर्शन मला मिळाले. मी दररोज चार श्‍लोक पाठ करत होते. सकाळी पाठांतर, दुपारी उजळणी आणि पुन्हा संध्याकाळी तयारी सुरू होती. काही शब्द सारखे असल्याने मध्येच दुसर्‍याच अध्यायात जायला व्हायचे. त्यामुळे स्मरण-पठण नोंद ठेवली. दररोज १० श्‍लोक लिहू लागले. त्यामुळे ७० दिवसांत ७०० श्‍लोक पूर्ण झाले.’

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply