अवधूत संप्रदाय : सद्गुरू दत्तभक्तीचा सुंदर आविष्कार

आज मार्गशीर्ष शुद्ध १४, बुधवार दिनांक ७ डिसेंबर २०२२ म्हणजेच श्रीदत्त जयंती. त्यानिमित्ताने बाळेकुंद्री (कर्नाटक) येथील अवधूत संप्रदायाविषयी विशेष लेख. सोबत माणगाव (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी यांनी स्थापन केलेल्या दत्तमंदिरातील उत्सवाची क्षणचित्रे.


कर्नाटक प्रांतात सद्गुरू श्रीपंत महाराज (बाळेकुंद्री) यांनी १८८५ ते १९०५ या कालखंडात अवधूत संप्रदायाच्या माध्यमातून आध्यात्मिक क्षेत्रात आगळी वेगळी क्रांती केली आहे. अध्यात्माचा वारसा न लाभलेले दत्तात्रेय रामचंद्र कुलकर्णी पुढे श्रीपंत महाराज या नावाने प्रसिद्धीस पावले. वैयक्तिक सेवाभाव, सामाजिक बंधूभाव आणि आध्यात्मिक ब्रह्मभाव यांचा त्रिवेणी संगम म्हणजे श्रीपंत महाराज यांचे जीवनचरित्र होय.

सर्वसामान्यांसारखे लौकिक जीवन व्यतीत करूनही श्रीपंत महाराज असामान्य अशा संतपदाला पोहोचले, यातच त्यांचे मोठेपण कळून येते.
श्रीपंत महाराजांनी दत्तभक्ती आणि सदगुरूभक्ती यातील अभेदशक्तीचा आविष्कार अवधूत संप्रदायात घडविला. जातपात, धर्म, पंथ, स्त्रीपुरुष, गरीब, श्रीमंत या क्षुद्र भेदापलीकडे जाऊन त्यांनी आपले प्रेमामृत सर्वांना समानतेने आणि ममतेने वाटले. आध्यात्मिक ‘साधना’ या शब्दाचा दबदबा त्यांनी एकतारीवरील भजनानंदात बुडवून टाकला.

श्रीपंत महाराजांना श्री दत्ताचे भजन फारच महत्त्वाचे वाटत असल्याचे उद्गार पाहावयास मिळतात. “श्री दत्त महाराजांनी भक्ती हाच मोक्षाचा खरा मार्ग सांगितला आहे. उपासनेमध्ये उपासना आणि उपास्य यामध्ये भेद राहिला तर ती उपासना मोक्षदायी ठरत नाही”, असे ते स्पष्टपणे सांगतात. श्रीदत्ताचे अभेद भजन त्यांना प्रिय होते. म्हणून ते म्हणतात दत्त भजन
“दत्तभजन करी नित्य मना रे॥धृ॥
भक्ती विरक्ती संपन्न होऊनी॥शरण जाई सज्जना रे॥1॥*
श्रवण मनन निदिध्यासन करुनी । साधी ज्ञानांजना रे ॥2॥
अलक्ष दत्तरूप पाहाया। जाई निरंजना रे॥3॥(पद क्र. 125)
मनाला दत्तभजन कर म्हणून सांगणारे श्रीपंत महाराज भजन का करावे हेही सांगतात…

“सुखकर दत्तभजन। पाही॥धृ॥
कशाला हें जपतपसाधन॥करिसी देवपूजन॥1॥*
स्त्री पुत्रादिक छळिती म्हणूनी॥सेविसी व्यर्थ जीवन॥2॥*
ऋद्धिसिद्धि गारूड दाउनि। भुलविसी हे जन॥3॥
ज्ञानाभिमानें प्राप्त नोहे कदा। श्रीगुरुकृपांजन॥4॥
निशिदिनीं दत्तभजन करिसी तरी पावसी निरंजन॥5॥
(दत्तप्रेमलहरी, पद क्रं.128)
तर या दत्तभजनामध्ये जीव रमला की, त्याला जन्ममरण उरत नाही, याचा स्वानुभव घ्या, असा दत्तभजनाबद्दल निर्वाळा देताना श्रीपंत महाराज म्हणतात…
दत्तभजनीं रमतां जन्म मरण नाहीं रे।
स्वानुभवें अंतरी ही खूण पाही रे॥धृ॥
दत्तात्रयनाम निशिदिनीं गाई रे।
अनन्यभावे थारा करी दत्तपायीं रे॥1|| (दत्तप्रेमलहरी)
शेवटी ते दत्तप्रभूंकडे आणि सद्गुरूचरणी विनवणी करताना म्हणतात…
“तव चरणीं प्रीति॥ पूर्ण करीं ही विनंती॥धृ॥
भुक्ति मुक्ति न मागे तुज॥ देई अनन्यभक्ति॥1॥
इहपर भोग नलगे मजला॥ पुरवीं भजनप्रीति॥2॥
अवधूत दत्ता देईं नित्य॥ निजप्रेमशांति॥3॥
(आशीर्वाद पद-2454)
भजनाचा पुरस्कार करणारा हा अवधूत संप्रदाय सर्वसामान्यांना,दीनदलितांना अत्यंत जिव्हाळ्याचा आणि प्रेमाचा वाटतो.
“भक्ताभिमानी भक्तीप्रिय।
भजनी रमवी प्रेमा भक्त |
बालावधूत प्रेमळ सदगुरू|
प्रेमानंदे नाचतो दत्त॥
असा भजनी सेवेचा पुरस्कार करणारा हा संप्रदाय आहे. श्री दत्त ‘प्रेमलहरी’ या ग्रंथात श्रीपंतांची बहुतेक सर्व पदे आली असून यातील एकूण २७५४ पदांमध्ये मराठी, संस्कृत, हिंदी आणि कानडी पदांचा समावेश आहे. श्रीदत्तात्रेय आणि सदगुरूंवर केलेल्या ८४ आरत्या, धावे, पाळणे, इत्यादींचा भर आहे. एकूण बघता सद्गुरूपदावर आरूढ झालेले हे भक्तरूपी वादळ भक्तांच्या हृदयाचा ठाव घेणारे आहे.

श्री पंत महाराजांनी प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीचा समतोल राखत आपल्या अवधूत संप्रदायाचा, अध्यात्माचा ध्वज लावून भक्तिवैभवाचा कळस गाठला आहे. भक्तीच्या सामर्थ्याने श्रीपंतांनी भक्तांना पावन करत समाजाची घडी बसविली. हे करत असताना त्यांच्या हृदयातून ज्या अविरत प्रेमलहरी निर्माण झाल्या, त्या लहरींचे शब्दरूप म्हणजे श्रीदत्त प्रेमलहरी.

या ‘श्रीदत्त प्रेमलहरी’मधील सादरीकरण या भजनातून होत असते. “सत्यमेव जयते। जगी सत्याची मिरविते।” यांसारख्या पदातून सत्याचा गौरव केल्याचे दिसून येते. सत्य हे नेहमीच यशस्वी होत असते, असे सांगताना त्यांनी आपल्या भजनातून सत्याचा पुरस्कार केला आहे. श्रीपंत महाराजांनी अवधूत संप्रदायाच्या उपासनेत भजनाला अग्रस्थानी मान दिला आहे. पारंपरिक सांप्रदायिक भजनी मंडळात मृदुंग अर्थात पखवाज हे चर्मवाद्य वाजविले जायचे, मात्र श्रीपंतांनी दीनदलितांना निकटची वाटणारी आणि तमाशात वाजवली जाणारी ‘ढोलकी’ या चर्मवाद्यांचा समावेश करून एक प्रकारे सनातनी विचाराला चपराक दिली आहे. टाळ, झांज, डिमडी, तंबोरा यांसारखी वाद्ये वापरून लयबद्ध अशा चालीवर भजने गाणारा भक्तगण इतका रंगून जातो की त्याला त्याच्या देहाचे भानही राहत नाही. प्रेमामृते धुंद मी झालो। डुलत डुलत पदी लोळलो ।। यासारख्या श्रीपंतांच्या रचना पाहिल्या की या संप्रदायाचे वेगळेपण लक्षात येते. इतकेच नव्हे, तर सद्गुरूंच्या वात्सल्यपूर्ण प्रेमाचा आविष्कार आणि पंतभक्तांचे भजनात देहभाव विसरून समरस होणे हे दृश्य पाहणाराही रंगून जातो. पंतांनी ही पदे निरनिराळ्या भावावेगातून, निरनिराळ्या वेळी रचलेली असली तरी पहिल्या पदापासून ते अखेरच्या पदापर्यंत त्यातून व्यक्त झालेले माधुर्य किंचितही कमी झालेले नाही. या पदांकडे वरवर पाहिले तरी श्रीपंतांच्या ठिकाणचे करुणारसाने भरलेले वात्सल्यरूप दृष्टीस पडते.

अवधूत संप्रदायातील ध्वजाला ‘प्रेमध्वज’ असे नाव देणे औचित्यपूर्ण निजबोधाच्या परिपक्वतेचे प्रतीक आहे. ध्वज हे एकात्मतेचे, संस्कृतीचे, अस्मितेचे, परंपरेचेही प्रतीक आहे. तसेच श्रीपंत संप्रदायाचे श्रद्धास्थान म्हणूनही वंदनीय आहे. म्हणून श्रीपंतांचे अनुग्रहित भक्त आपल्या भजन उपासनेत खालील पद हमखास गातात…
प्रेमवृत्ति मांडारे। मिरवा अवधूत झेंडा रे॥धृ.॥
वासनामय दंडूनी आजी। द्वैत समूळ खंडा रे॥1॥
सत्यज्ञानानंत सर्व। भेद न पिंड ब्रह्मांडा रे॥2॥
सद्गुरू भेटला संशय फिटला । दत्त अखंडा रे॥3॥
दत्तनामाचा आणि पंतनामाचा गजर करीत एकतारी, झांज ढोलकी आणि दिमडीच्या साथीने चालणारी ही अवधूत संप्रदायातील श्री पंतांची भजने भक्तांचे कान आणि मने तृप्त करतात, बदलत्या काळासोबत माइक, पेटी (हार्मोनियम), तबला, ढोलकी, खंजिरी, संबळ यांची साथ संगत घेऊन भजनानंदात तल्लीन व्हायला लावणारी ही भजने आजही दत्तभक्तांमध्ये हृदयस्थानी विराजमान झाली आहेत.

  • सुनीलकुमार सरनाईक, कोल्हापूर.
    (९४२०३५१३५२)
    (लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित आहेत.)
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply