समजून घेण्याचा आटापिटा मौनापाशी थांबतो तेव्हा…

एकसष्टावी हौशी राज्य नाट्य स्पर्धा – रत्नागिरी केंद्र

आजचे नाटक (७ डिसेंबर २०२२) : प्रतिध्वनी

सादरकर्ते : रत्नवेध कलामंच, रत्नागिरी

“प्रतिध्वनी’ हे नाटक ‘ध्यास’ या स्वयंसेवी संघटनेच्या कार्यालयात घडते. या संस्थेतली माणसे समाजाचे भले करण्यासाठी उत्सुक असलेली माणसे आहेत. त्यांचे एकमेकांशी नाते आहे तसेच त्यांच्या भोवतीच्या समाजाशीही आहे. परंतु या दोन्ही नात्यांचे नेमके स्वरूप या माणसांना कळलेले नाही. त्यांच्या कार्याचे मोल त्यांना जाणवलेले आहे. या कार्यामुळे त्यांच्या आयुष्याला एक मौलिकता सहजच मिळत असली तरी पूर्णवेळ ते या स्थितीत राहू शकत नाहीत. आपल्या कार्याविषयीचे समाधान आणि मधूनच आयुष्यात डोकावणारे असमाधान यांचा अन्वय लावण्याचा ही माणसे प्रयत्न करताना दिसतात. कधी त्यांच्या हाती काही लागते, तर कधी घोर निराशा त्यांच्या पदरी येते. त्यांच्या मनातल्या उलाढालींचे हे नाटक आहे. ‘प्रतिध्वनी’ हे नाटक जसे समाजसेवा करणाऱ्या माणसांवर कुठली कॉमेंट करत नाही, तसेच त्यांच्या प्रेरणांचे फार उदात्तीकरणही करत नाही. जसे इतरांचे जगणे आपण एरवी समजून घेतो, तसेच या माणसांचेही जगणे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात कुठला मूल्यविचार नाही. कुठली अनावश्यक पोझ नाही. त्यांचे आपापसातील संबध आणि त्यांचे जगणे निखळपणे समजून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे.

दुसरा एक विशेष म्हणजे हे नाटक व्यक्‍ती आणि समाज यांच्यातला बंध तपासून बघत असले तरी नाटकात समाज समूहाच्या रूपात प्रत्यक्षात अस्तित्वात नाही. आज आपला समाज सामाजिक कार्याच्या संदर्भात एका निर्नायकी अवस्थेतून मार्गक्रमण करतो आहे. आपल्याला सामाजिक क्षेत्रात कुठला आदर्शच उरलेला नाही. असे नेमके कशामुळे झाले असेल? चांगले काम करणारी प्रज्ञावान माणसे सभोवताली असतानाही आपण समाज म्हणून असे का झालो आहोत? हा कुतूहलाचा विषय आहे. आज सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सगळ्यांचेच पाय शेवटी मातीचेच आहेत, या जाणिवेतून असे घडले असेल का? आपण आपापसात किंवा इतरांशी जे बोलतो, जसे बोलतो तसे यातली माणसे करताना दिसतात.
त्यामुळे कधी कधी त्यांचा थांग लागत नाही. त्यांना जे बोलायचे आहे, सांगायचे आहे, व्यक्‍त करायचे आहे, ते सांगण्याची संधी त्यांना मिळतेच असे नाही. जेव्हा तशी संधी मिळते तेव्हा ते सगळे व्यक्‍त करण्याची त्यांची ओढच संपलेली असते.

माणसाच्या सामाजिक प्रेरणेतील शक्‍यता यातल्या माणसांना जाणवत राहतात. आपल्याच जगण्याचा
निवाडा करण्याची वेळ येते तेव्हा ही माणसेही इतरांसारखी आधी बिचकतातच. पण त्यांच्यात असलेल्या आंतरिक बळांमुळेच त्यांना आपले जगणे तपासून बघण्याची निकडही जाणवते. हेच त्यांच्या मनाचे मोठेपण आहे. अतिशय लाईट मूडमध्ये सुरू झालेले नाटक हळूहळू आर्त होत जाते.

श्रेयनामावली
लेखक – पराग घोंगे
दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना – विनायक सावर्डेकर
पार्श्वसंगीत, ऱ्हिदम – हरेश केळकर
नेपथ्य निर्माण – सत्तू गुरव आणि मंडळी
वेशभूषा – मेघा कांबळी
रंगभूषा – दिया मयेकर
गायन – रफिक मुल्ला
सूत्रधार – अॅड. प्रशांत सावंत
रंगमंच व्यवस्था – गौरव चव्हाण
सल्लागार – अॅड. उन्मेष मुळे आणि अॅड. परेश वीरकर
निर्मिती प्रमुख – संतोष कनावजे
विशेष साह्य – समिधा सचिन शिंदे, साई मंगल कार्यालय व्यवस्थापक राजन कोतवडेकर

पात्रपरिचय
प्रशांत सावंत
जगदीश कदम
रफिक मुल्ला
रोहन साळवी
सुकन्या शिंदे
आसावरी अरुण आघाडे

…………………

असे होते कालचे नाटक

काल (दि.६ डिसेंबर) सहयोग रत्नागिरी संस्थेने मड वॉक हे नाटक सादर केले.

स्पर्धेच्या युगात माणूस माणसापासून दुरावत चालला आहे. धर्म आणि जात यात अडकत चाललेली पिढी तसेच त्याचा चुकीचा चाललेला प्रसार आणि माणसामाणसामधील वाढलेले अंतर, विध्वंसाकडे चाललेली मानवी वृत्ती कुठेतरी थांबली पाहिजे. माणसाने माणसाशी कसे वागले पाहिजे, याची जाणीव करून देणारे हे नाटक आहे. मड वॉक म्हणजे चिखल तुडवणे. भगवान बुद्धाच्या तत्त्वज्ञानावर पीएचडी करणाऱ्या तिघा विद्यार्थ्यांनी चिखल तुडवत, बिकट वाट पार करत बुद्धाच्या लेण्यांपर्यंत पोहोचून केलेला अभ्यास, तेथे बेंजामिन फ्रँकलिनने त्यांना केलेली मदत, परतल्यानंतर पीएचडीच्या मार्गदर्शकाला हवे, तेच लिहून काढण्याची आलेली वेळ अशा विविध प्रसंगांमधून प्रचलित राजकीय, सामाजिक स्थिती, शैक्षणिक क्षेत्रातील गोंधळ यावर भाष्य केले आहे.

श्रेयनामावली
प्रकाशयोजना – चंद्रशेखर वसंत मुळे
नेपथ्य – विनायक (जॉनी) चंद्रकांत आपकरे, अप्पा रणभिसे
पार्श्वसंगीत – निखिल संतोष भुते
रंगभूषा – ओंकार प्रदीप पेडणेकर
वेशभूषा – तन्वी शिंदे, स्वप्नील धनावडे

पात्रपरिचय
दुर्गा – आर्या वंडकर
बब्बू – शुभम गोविलकर
रघू – अजिंक्य केसरकर
डॉ. रघुवीर – हेमंत चक्रदेव
बेंजामिन फ्रँकलीन – दीपक माणगावकर
कीर्तनकार – मयूरेश पाडावे
अध्यक्ष १ – स्वप्नील धनावडे
अध्यक्ष २- किरण राठोड
रघुची आई – प्रिया वाडकर-साटविलकर
अन्य कलावंत –
साक्षी कोतवडेकर, सुयोग बेंडल, साई जिरोळे, बबलू शर्मा, ईशा फाटक, मुक्ता शेंबेकर, मानीष भिडे, सौरभ मंडल, तुषार गिरकर, गिरीश तेंडुलकर, पार्थ देवळेकर, दीपेन भोजे, नकुल नाडकर्णी, ऋषिकेश कोकजे, रजत भरणकर, तन्वी शिंदे.

या नाटकाचा आस्वाद सर्वाधिक ६५० प्रेक्षकांनी घेतला. त्यातून एकूण ९ हजार ४२५ रुपयांची तिकीट विक्री झाली.

…………………

मड वॉक काही क्षणचित्रे

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply