कीर्तनासंध्यामध्ये उलगडणार राजपुतांचा इतिहास

रत्नागिरी : करोनामुळे दोन वर्षे खंडित झालेला रत्नागिरीतील कीर्तनासंध्याचा वार्षिक उत्सव येत्या जानेवारीत पुन्हा रुजू होत आहे. येत्या ३ ते ७ जानेवारी २०२३ या कालावधीत रत्नागिरीच्या स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुलात भव्य रंगमंचावर कीर्तनसंध्या रंगणार असून राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्त आफळेबुवा यांच्या ओजस्वी वाणीतून राजपुतांचा गौरवशाली इतिहास ऐकायची आणि पाहायची संधी रसिकांना लाभणार आहे. आज ही माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

भारत हा ॠषीमुनी आणि संतांचा देश, तर महाराष्ट्र ही संतांची कर्मभूमी आहे. अभंग, गाथा यामधून आपल्याला त्याचा परिचय येतो. कीर्तन हासुद्धा याच परंपरेचा एक अविभाज्य भाग आहे. नारदमुनींना कीर्तनाच्या व्यासपीठाचे कुलगुरू मानले जाते. भारतीय कीर्तनपरंपरेला मोठा इतिहास आहे. कीर्तन हे समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे. कीर्तन सादर करताना साकी, दिंडी, वृत्त, गाणी, संगीत, अभिनय अशा विविध कलांचा आधार घेतला जातो. परमेश्वराच्या कीर्तीच्या गायनालाच कीर्तन असे म्हटले जाते. असा हा कीर्तन प्रकार खासकरून महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय आहे. मंदिरांमध्ये विविध उत्सवात, खास आनंदाच्या क्षणी कीर्तन आयोजित केले जाते. बुवा त्यांच्या बरोबरीने एक तबलजी एक पेटीवाले असे दोन साथीदार घेऊन कीर्तन म्हणजेच परमेश्वराच्या कीर्तीचे गायन करतात. कीर्तन साधारणपणे दीड ते दोन तास चालते. हेच माध्यम वापरून रत्नागिरीतील काही तरुणांनी एकत्र येऊन २०१२ मध्ये प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्त आफळेबुवा यांच्या साथीने कीर्तनसंध्या हा समाजप्रबोधनाचा ज्ञानयज्ञ प्रज्वलित केला.

कीर्तन प्रामुख्याने मंदिरांमध्ये उत्सवात केले जाते. परंतु कीर्तनसंध्या कार्यक्रम मात्र कीर्तनातून समाजप्रबोधन, भारतीय इतिहासाची ओळख करून देण्याच्या उद्देशाने राबविला जात आहे. दहा वर्षे सतत चाललेला कीर्तनसंध्येचा ज्ञानयज्ञ करोनाच्या काळात शांत झाला होता. आता दोन वर्षांनी येत्या जानेवारीत कीर्तनसंध्या पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येत आहे.

प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्त आफळेबुवा कीर्तनसंध्येच्या केंद्रस्थानी आहेत. कीर्तनसंध्येतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून ते सर्जिकल स्ट्राइकपर्यंतचा भारताचा देदीप्यमान विजयाचा इतिहास कीर्तनातून मांडला गेला आहे. यंदा कीर्तनसंध्येत राजपुतांचा इतिहास उलगडला जाणार आहे. कीर्तनाला वाद्यवृंदाची अत्यावश्यक असते. तबला, पेटी, झांज, चिपळ्या आणि बुवा या पारंपरिक कीर्तनाच्या पद्धतीला पखवाज, सहगायक, व्हायोलीन, सिंथेसायझर अशा आधुनिक वाद्यांची जोड देऊन आफळे बुवा भारताचा वैभवशाली इतिहास डोळ्यांसमोर उभे करतात. त्यामुळे अतिशय कठीण वाटणारा इतिहास हा विषय मुलांना, तरुणांना सहज लक्षात राहतो. आजवर हेरंब जोगळेकर, मिलिंद टिकेकर, मधुसूदन लेले, विलास हर्षे, राजा केळकर, आनंद पाटणकर, वरद सोहोनी, हर्षल काटदरे, प्रथमेश तारळकर, उदय गोखले, प्रसाद करंबेळकर, प्रसाद जोशी, वैभव फणसळकर, अजिंक्य पोंक्षे, अभिजित भट यासारखे मातब्बर साथीदार लाभले आहेत. तबल्याची उत्तम साथ, बरोबरीने ऑर्गनची जादू, साथीला व्हायोलिनचे सूर आणि पखवाजचा ठेका, हे कमी म्हणून की काय विमान, रॉकेट बॉम्ब गोळ्यांचे आवाज काढण्यासाठी सिंथेसायझरची समर्थ साथ हे सर्व कीर्तनसंध्येला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते.

यावर्षी हेरंब जोगळेकर (तबला), उदय गोखले (व्हायोलीन), वरद सोहोनी (हार्मोनियम), अजिंक्य पोंक्षे (सहगायक) आणि अन्य कलाकारांची साथही लाभणार आहे. बरोबरीने तेवढीच तोलामोलाची साथ उदयराज सावंत यांची साऊंड सिस्टीम देत असते. यावर्षीही ती असेल. तसेच ओम साई डेकोरेटर्सचे नेपथ्य आणि रंगमंच, मंडप व्यवस्था असेल.

कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करत असताना या कार्यक्रमाच्या निमित्ताने नगरपालिका सफाई कामगारांना हातमोजे, मतिमंदांसाठी काम करणाऱ्या आशादीप संस्थेला मदत असे समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले. समाजप्रबोधनाचा वसा घेतलेल्या कीर्तनसंध्या परिवाराने करोनाच्या काळातही कोविड योद्धे म्हणून काम करत असताना कोविड सेंटरमधील वातावरण आनंदी राहण्यासाठी तेथे वाचनालय सुरू करण्याचा उपक्रम राबविला. याशिवाय विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या मंडळींचा सत्कार करण्यात आला. त्यात नगरपालिकेतील सफाई कामगार, गणपतीपुळे येथील जीवरक्षक, झाशीच्या राणीचे वंशज नेवाळकर, सर्वोच्च कीर्तनकार हभप दत्तदासबुवा घाग, हभप ढोल्ये बुवा, गोरक्षक मुकेश गुंदेचा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कुटुंबातील सात्यकी सावरकर, आशादीप संस्थेचे संचालक दिलीप रेडकर, निवृत्त सेनाधिकारी राजेंद्र निंभोरकर, सौ. निंभोरकर, वृद्धाश्रम चालवणाऱ्या गायत्री फडके, सौ. शुभांगी चारुदत्त आफळे, चारुदत्त आफळेबुवा यांचे अधिकृत संकेतस्थळ तयार करणारे संकेत सरदेसाई इत्यादींचा समावेश होता. मुलांना इतिहासाची गोडी लागावी, या उद्देशाने दरवर्षी बच्चे कंपनीसाठी चालू कथानकावर आधारित प्रश्नमंजूषा घेतली जाते.

अशा या भव्य दिव्य कीर्तनाच्या कार्यक्रमाला पितांबरी उद्योग समूह आणि पाध्ये गांधी असोसिएटस् नेहमीच मोलाचे सहकार्य करत आले आहेत. कायम कोणत्याही स्वरूपाची मदत लागली तरी उत्साहाने पुढे येऊन मदत करणारे हितचिंतकही वेळोवेळी लाभले आहेत. कीर्तनसंध्या परिवारातर्फे आर्थिक मदतीचे आवाहन जाणकार रसिक श्रोत्यांना करण्यात आले आहे.

कीर्तनसंध्येचे स्वरूप दरवर्षीप्रमाणेच असेल. ब्रह्मवृंदांच्या शांतीपठणाने कीर्तनाची सुरवात होईल. बैठक व्यवस्था आणि वाहनांच्या पार्किंगची व्यवस्थाही असेल. येत्या३ ते ७ जानेवारी २०२४ या कालावधीत दररोज सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत होणार असलेल्या या कीर्तनसंध्येचा लाभ घ्यावा, असे आवाहन कीर्तनसंध्या परिवारातर्फे अवधूत जोशी यांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply