माणगावचे श्री दत्त मंदिर

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील माणगाव हे आता दत्तस्थान म्हणून नावारूपाला आले आहे. श्री टेंब्ये स्वामींनी स्थापन केलेल्या दत्तमंदिराविषयीचा हा लेख……..

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील माणगाव म्हणजे श्री दत्तात्रेयांचे प्रात:स्मरणीय चतुर्थावतार श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामींची जन्मभूमी. या भूमीने श्री टेंब्ये स्वामी महाराज व त्यांचे बंधू सीताराम स्वामी असे दोन सत्पुरुष दिले. हे गाव अतिशय छोटे असले, तरी ती पुण्यभूमी आहे. प. पू. टेंब्ये स्वामींनी स्वत:च ग्रामस्थांच्या मदतीने छोटेखानी दत्तमंदिर उभे केले आणि तिथे दत्तमूर्तीची प्रतिष्ठापना केली. तेच सध्या अस्तित्वात असलेले दत्तमंदिर. श्रीमंत इंदिराबाई होळकर यांनी वैशाख शुद्ध त्रयोदशीच्या मुहूर्तावर (१२ मे १९३८ रोजी) जीर्णोद्धार केला. स्वामी महाराजांनी बांधलेल्या दत्त मंदिराजवळ त्या वेळची विहीरदेखील आहे. तीदेखील श्रीमंत इंदिराबाई होळकरांनी पुन्हा चिरेबंदी बांधली आहे. श्री दत्त मंदिरास लागून असलेला औदुंबर स्वामींच्या वेळेपासूनच आहे. औदुंबराखाली श्री दत्तांच्या पादुकादेखील आहेत. तसेच प. प. स्वामींच्या योगचिन्हांकित पादुकादेखील स्थापन केलेल्या आहेत. आजऱ्याच्या आजरेकर बुवांनी स्थापन केलेली पश्चिमाभिमुख अशी मारुतीची मूर्ती येथे आहे.

अलीकडच्या काळात हळूहळू मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. या मंदिराच्या प्रदक्षिणेच्या मार्गात दोन्ही बाजूस १-१ असे दोन लाकडी खांब आहेत. ते स्वामी महाराजांनी अभिमंत्रित केलेले आहेत. त्यांच्या केवळ स्पर्शाने कुठल्याही प्रकारच्या बाधेचे निरसन होते. आज त्या मंदिरातच श्री वासुदेवानंद सरस्वतींचीही मूर्ती ठेवण्यात आली आहे. येथे संस्थानमार्फतच दत्तभक्तांना अभिषेक, पालखी, अन्नदान व जीर्णोद्धार यांसारख्या सेवांमध्ये अर्थदानाने सहभाग घेता येतो. श्री स्वामी महाराजांनी दत्ताज्ञेनुसार मंदिर स्थापनेपासून सात वर्षांनी माणगाव सोडले. त्यानंतर ते परत कधीच माणगावात आले नाहीत.

या मंदिरासमोरच पुरातन काळचे यक्षिणी मंदिर आहे. यक्षिणी महात्म्य या ग्रंथात दिलेल्या माहितीनुसार, महाराजांनी दिलेले अभिवचन पूर्ण करण्यासाठी श्री वासुदेवाचा जन्म माणगावात झाला. हे यक्षिणी मंदिर अत्यंत जागृत स्थान आहे.

श्री यक्षिणी देवी माणगावात कशी आली, याबद्दलची कथा या दत्तमंदिराच्या संकेतस्थळावर दिलेली आहे. ती अशी – श्री. प. प. नृसिंह सरस्वती स्वामी महाराज श्री क्षेत्र नृसिंहवाडीला असताना मध्यान्ह समयी भिक्षेसाठी अमरापूरला जायचे. तेथे ६४ योगिनी त्यांचे स्वागत, पूजन करत. भिक्षा वाढत असत. या सगळ्या योगिनींनी अमरापूर सोडून न जाण्यासंदर्भात विनंती केली. तेव्हा महाराज म्हणाले, ‘मी या औदुंबरातच सूक्ष्म चैतन्यरूपाने वास करून भक्तांच्या कामना पूर्ण करीन.’

ते श्री देवी यक्षिणीला म्हणाले,

नाम आहे कोकण, सुंदर वाटिका जाण
त्यांत आहे माणग्राम, वास तेथे करावा
तयेग्रामी टेंब्ये वंश, माझा भक्त गणेश
त्याचे पोटी ईश्वरी अंश, तोचि योगीराज जाणावा
ग्राम आहे ओस, तेथे करावा तू वास
साह्य व्हावे भक्तांस, तपस्वी असती जे कोणी
ब्रह्मराक्षस वेताळ, पिशाच्च गणांचा मेळ
राहे तेथे सर्व काळ, मनुष्यमात्रा हिंसती

‘माझा पुढचा अवतार माणगावी होणार आहे. तेथे मनुष्यवस्ती नाही. तेथे ब्रह्मराक्षस, वेताळ, भूत, प्रेत, पिशाच्चांचा संचार आहे. त्यामुळे तेथे तू जाऊन भूत पिशाच्चांचा प्रबंध कर. मनुष्यवस्ती निर्माण कर.’ महाराजांच्या या आदेशानुसार श्री यक्षिणी माता श्री देव शंकरासोबत माणगावी आली. त्या वेळी माणगावमध्ये एक कुंभार परमेश्वराचे चिंतन करत एकटाच राहत असे. दुसरा कोणी मनुष्य एक रात्रसुद्धा राहायला तयार नसे. श्री देवी यक्षिणी मातेने शंकराला गाव पाहण्यासाठी पाठविले. त्या वेळी शंकर एका वाण्याच्या रूपात कुंभाराला भेटले. सर्व सीमांची पाहणी केली.

मध्यग्रामी वैश्यनाथ, अपुले नामी लिंग स्थापित ।
म्हणे कार्य झाले आता येथ, जाऊ सत्वर गृहाशी ।।

श्री यक्षिणी मंदिर

माणगावातील मध्यवर्ती जागेची पाहणी करुन स्वतः शंकरांनी शिवलिंगाची स्थापना केली. महादेव मंदिरासमोरच श्री देवी यक्षिणीचे मंदिर आहे. संपूर्ण भारतात यक्षिणीचे एकच मंदिर आहे. शंकरांनी आपल्या गणाला पाठवून वेताळाला बोलाविले. ते वेताळाला म्हणाले, ‘श्री देवी यक्षिणी येथे राहणार आहे. त्यामुळे या गावात मनुष्यवस्ती होणे आवश्यक आहे. तू भूतपिशाश्चांचा बंदोबस्त कर. मनुष्यमात्रांना यांचा त्रास होता कामा नये.’

हळूहळू मनुष्यवस्ती वाढत गेली. ग्रामदेवता यक्षिणी मातेचे गावात आगमन झाले. श्रावण वद्य पंचमी शके १७७६ (१३ ऑगस्ट १८५४ ) रोजी महाराजांचा जन्म झाला आणि माणगाव त्यांच्या जन्माने पुनित झाले.

यक्षिणी मंदिराच्या उजव्या बाजूला श्री स्वामी महाराजांचे जन्मस्थान आहे. पूर्वीच्या जागेचा जीर्णोद्धार करून आता श्री स्वामींचे मंदिर तेथे उभारण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची अत्यंत नयनमनोहर अशी पूर्णाकृती मूर्ती (अंदाजे ५ फूट उंचीची) तयार करण्यात आलेली आहे. तेथेच अहिल्यादेवी होळकर यांनी स्थापित केलेल्या स्वामींच्या पायाच्या मापाच्या सर्व योगचिन्हांकित पादुका आहेत. तेथेच त्यांची यथासांग पूजा होते. स्वामींच्या मूर्तीच्या गळ्यातील हारात श्लोक लिहिलेला आहे. तो नृसिंहवाडीचे श्री दीक्षित स्वामी यांनी लिहिलेला आहे. जन्मस्थानाची परम पवित्र वास्तू अत्यंत प्रासादिक आहे.

टेंब्ये स्वामी महाराजांच्या माणगाव येथील जन्मस्थानाचा जीर्णोद्धार झाल्यानंतर तेथे स्थापित करण्यात आलेली त्यांची ही मूर्ती

दत्तमंदिरातील पालखी सोहळा
अगोदरच श्री वासुदेवशास्त्री यांची एक साधुपुरूष म्हणून ख्याती पसरली होती. त्यांनी श्री दत्तमंदिराची स्थापना केल्यापासून लोकांची ये-जा वाढली होती. दररोज काकड आरती, पूजा नैवेद्य, धूप व शेजारती हे सोपस्कार सुरू झाले. दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढतच गेली. भक्तमंडळींनी एक सुंदर लाकडी पालखी तयार करून मंदिराला अर्पण केली. पालखी आतल्या बाजूने मखमली कापडाने मढवलेली होती. त्यात गादी व तक्के होते. वर छानपैकी पितळी छत्र होते. पालखीचा दांडा रेशमी कापड लावून सजविला होता. दर शनिवारी पालखी निघू लागली. त्यामुळे प्रत्येक शनिवारी श्री क्षेत्र माणगावला फार मोठा समारंभच होऊ लागला.

ही पालखीची प्रथा अगदी सहजच सुरू झाली. एका भाविकाने एकदा नम्रपणे बुवांना असे सांगितले, की ‘शनिवारी पालखी निघावी अशी भक्तांची इच्छा आहे.’ त्याचे हे म्हणणे ऐकताच बुवांनी मोठ्या आनंदाने या गोष्टीला होकार दिला. त्यामुळे त्यांच्या संमतीने दर शनिवारी त्यांच्याच देखरेखीखाली पालखी निघू लागली.

आरती संपल्यानंतर उत्सवमूर्ती पालखीत ठेवून देवळाभोवती तीन प्रदक्षिणा घालत असत. ही पालखी निघण्यापूर्वी ग्रामदेवता श्री यक्षिणीची पालखी प्रथम देवळाजवळ येत असे आणि त्यानंतर श्रीदत्तमहाराजांची पालखी निघत असे. परंतु श्री यक्षिणीची पालखी श्री दत्तमंदिराकडे आणण्याला प्रथम त्या मंदिराच्या व्यवस्थापकांचा विरोध होता. हा विरोध दूर व्हावा म्हणून बुवांनी जाऊन श्री देवीची प्रार्थना केली. त्यामुळे श्री दत्तमंदिराकडे पालखी नेण्याबद्दल व्यवस्थापकांना दृष्टांत झाला. त्याप्रमाणे सर्व विरोध दूर होऊन नियमाने पालखी येऊ लागली.

अशा रीतीने दोन्ही पालख्या मंदिराबाहेर काढून तीन प्रदक्षिणा घालण्यास सुरवात होत असे. पालखीबरोबर काठी घेणारे, चवरी व मोरचेल धरणारे आणि पदे म्हणणारे अशी नित्याची दहा-पंधरा मंडळी असत. शिवाय त्या वेळी चार-पाच हजारापर्यंत गर्दी जमत असे. पालखी सुरू झाली, की उत्सवमूर्तीपुढे अनेक भक्तिपर पदे, अभंग, स्तोत्रे इत्यादी म्हटली जात. या वेळी संगीताची बाजू चि. भलोबा म्हणजे श्री शास्त्रीबुवांचे धाकटे बंधू श्री सीतारामबुवा सांभाळत असत. त्या वेळी चि. भलोबाचे वय सहा वर्षे होते. पालखीच्या तीन प्रदक्षिणा पूर्ण होण्याला पाच ते सात तास लागत. एवढा लोकांचा उत्साह मोठा असे. एकंदरीत हा पालखीचा सोहळा अत्यंत चित्ताकर्षक, प्रेक्षणीय व मनमोहक असा वाटत असे.

‘श्रीं’चा पालखी सोहळा श्री दत्तमंदिराच्या स्थापनेपासून सुरू आहे. स्वामींच्या वेळी दर गुरुवारी व शनिवारी पालखी निघत असे. श्री गुरुप्रतिपदा ते वैशाख पौर्णिमेपर्यंत पालखी सोहळा असतो. पालखी दर पौर्णिमेला व अन्य उत्सवांना काढली जाते. तसेच भक्तांच्या आग्रहाखातर योग्य धार्मिक शुल्क कार्यालयात भरून शुभदिनीदेखील पालखी सोहळा साजरा केला जातो.

ब्रह्मवृंदामार्फतच सोवळ्यात फुलांनी सजविलेली पालखी आणली जाते. आरतीनंतर दत्तमंदिरासमोरच पालखी खाली ठेवली जाते. पुजारी आरतीनंतर उत्सवमूर्ती आणून पालखीत ठेवतात. त्यानंतर जयघोषात पालखी उचलून ब्रह्मवृंदामार्फत पुढे नेली जाते. एकूण तीन प्रदक्षिणा दत्तमंदिरात होतात. प्रत्येक प्रदक्षिणेत पाच ठिकाणी पालखी थांबते. प्रत्येक थांब्याच्या ठिकाणी पदे म्हटली जातात. तसेच एका थांब्यावरून दुसऱ्या थांब्यापर्यंत चालताना अष्टके व जयघोष म्हटला जातो.

सर्वांत शेवटी पालखी ३/५ (तिसरी प्रदक्षिणा / पाचवा थांबा ) थांब्यानंतर औदुंबरापाशी येते. त्या वेळी अष्टके पूर्ण केली जातात. औदुंबराची आरती म्हणून नंतर उत्सवमूर्ती तेथूनच गर्भगृहात नेली जाते. पालखी मात्र तशीच पुढे नेऊन उत्तर दिशेला ठेवली जाते.

असा पालखी सोहळा आरतीनंतर रात्री ७.१५ ते ९.१५ पर्यंत अत्यंत उत्साहात शांत व धीरगंभीरपणे साजरा केला जातो. आरतीनंतर मंत्रपुष्प म्हटला जातो. त्यानंतर तीर्थप्रसाद होऊन पालखी सोहळा संपतो.

इ. स. १९७०पासून प. पू. श्री. नांदोडकर स्वामी येथे येऊ लागले. त्यांनी श्री दत्त मंदिराच्या कळसावर सोन्याचा कळस बसविला. तसेच श्रींच्या जन्मस्थानी श्रींच्या पादुकांची स्थापना केली. ते दर वर्षी एका यज्ञाचे आयोजन करीत असत. त्यामुळे या ठिकाणी भक्तगणांची रीघ वाढली. तसेच त्यांनी भिक्षा मागून जुन्या धर्मशाळेचा जीर्णोद्धार करून इ. स. १९७६मध्ये वैशाख शुक्ल सप्तमीला वास्तुशांती केली. त्यानंतर येथील स्वत:चे कार्य पूर्ण करून दुसऱ्या दिवशी ते वैकुंठवासी झाले. त्यांचे स्मृतिस्मारक दत्तमंदिरासमोरच आहे.

इ. स. १९७७ सालापासून दर वर्षी एका यज्ञाचे आयोजन केले जाते. गेल्या काही वर्षांपासून गुरुप्रतिपदेचे निमित्त साधून माघ महिन्यात तीन दिवसांचा यज्ञोत्सव साजरा केला जातो. त्यामध्ये हजारो भक्त सहभागी होतात.

………

(हा लेख साप्ताहिक कोकण मीडियाच्या २०२२च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला आहे. हा उत्सव विशेष संग्राह्य दिवाळी अंक आहे. या अंकात पालघर ते सिंधुदुर्ग या कोकणपट्टीतल्या वेगवेगळ्या दैवतांच्या उत्सवांबद्दलच्या एकूण ३४ सुंदर लेखांचा खजिना आहे. एकंदरीतच हा अंक संग्राह्य आणि कोकणाबद्दलच्या वेगळ्या विश्वात घेऊन जाणारा आहे. या अंकातून वाचनानंद तर मिळेलच; पण पर्यटकांना वेगवेगळ्या मंदिरांची माहितीही मिळू शकेल.

ई-बुक खरेदीसाठी लिंक :

गुगल प्ले बुक्स – https://play.google.com/store/books/details?id=LzaVEAAAQBAJ

मॅग्झटर – https://www.magzter.com/IN/Kokan-Media-Consultancy–Services/Kokan-Media-/News/1099536

बुकगंगा – https://www.bookganga.com/R/8LC78

पायल बुक्स – https://bit.ly/3VTmRyl (ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply