
एकसष्टावी हौशी राज्य नाट्य स्पर्धा – रत्नागिरी केंद्र
आजचे नाटक (८ डिसेंबर २०२२) : तुझा माझ्यावर भरोसा नाय काय?
सादरकर्ते : कुणबी कर्मचारी सेवा संघ, रत्नागिरी
ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणारे तुझा माझ्यावर भरोसा नाय काय? हे नाटक सचिन शितप यांनी लिहिले आहे, तर दिग्दर्शन प्रदीप रेवाळे यांनी केले आहे. कोकणात काही वर्षांपासून अनेक प्रकल्प येत आहेत. त्यात काही चांगले, तर काही विनाशकारी आहेत. या प्रकल्पांमुळे निर्माण झालेले ग्रामीण जीवनातील प्रश्न आणि त्यातून निर्माण होणारे राजकारण, समाजकारण यांचा वेध नाटकात घेण्यात आला आहे. नाटकाची कथा कोकणातील एका खेडगावात घडते. त्या गावात प्रकल्प आला आहे. अशिक्षित ग्रामस्थांना त्याचा पत्ता नाही. गावात पिढ्यान् पिढ्या आपले अस्तित्व वर्चस्व अबाधित ठेवून असलेल्या खोत मंडळींनी हुशारीने गोरगरिबांना अंधारात ठेवून शेतकऱ्यांच्या जमिनी मातीमोल भावाने खरेदी चालविली आहे. त्यासाठी सरपंचाच्या खांद्यावर बंदूक ठेवून ठेवून शेतकऱ्यांना जमिनी विकायला भाग पाडले जाते. चेहरा सरपंचाचा असला, तरी त्याचे सूत्रधार खोत मंडळीच असतात. गावात तंत्रज्ञानाचा वापर खूप कमी प्रमाणात होतो. त्यामुळे सरकारच्या अनेक योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. गावातील अनिष्ट रूढीपरंपराही गावाच्या विकासाच्या आड येतात. त्यामुळे लोकांची प्रगती होत नाही. या अनिष्ट रूढी कशा चुकीच्या आहेत, याविषयीचे प्रबोधन नाटकात करण्यात आले आहे.
संगमेश्वरी बोलीभाषेत हे नाटक असल्याने त्याचा बाज उत्तम झाला आहे. त्यामुळे नाटकाचा विषय थेट रसिकांच्या काळजात जाऊन बसतो.
श्रेयनामावली
लेखक – सचिन शितप
दिग्दर्शक – प्रदीप रेवाळे
व्यवस्थापक – गोविंद तारवे सर
संगीत – योगेश बांद्रे – अविनाश गोसावी
नेपथ्य – प्रवीण धुमक
प्रकाशयोजना – नितीन बैकर
रंगभूषा – रमाकांत घाणेकर
वेशभूषा – लवू भातडे
पात्रपरिचय
सुरेश – सूर्यकांत गोताड
बाबा – दामोदर गोरिवले
तात्या – सचिन शितप
सख्या – लवू भातडे
खोत – संतोष सारंग
सरपंच – हरीश रेवाळे
इन्स्पेक्टर/नरेश – किशोर फडकले
धर्मा – प्रदीप रेवाळे
गावकरी – अनंत पातये, दिनेश निंबरे, अनंत गोताड
सुमन – श्वेताली अडसूल

…………………

असे होते कालचे नाटक
काल (दि. ७ डिसेंबर) रत्नवेध कलामंच या संस्थेने प्रतिध्वनी हे नाटक सादर केले.
“प्रतिध्वनी’ हे नाटक ‘ध्यास’ या स्वयंसेवी संघटनेच्या कार्यालयात घडते. या संस्थेतली माणसे समाजाचे भले करण्यासाठी उत्सुक असलेली माणसे आहेत. त्यांचे एकमेकांशी नाते आहे. तसेच त्यांच्या भोवतीच्या समाजाशीही आहे. परंतु या दोन्ही नात्यांचे नेमके स्वरूप या माणसांना कळलेले नाही. त्यांच्या कार्याचे मोल त्यांना जाणवलेले आहे. या कार्यामुळे त्यांच्या आयुष्याला एक मौलिकता सहजच मिळत असली तरी पूर्णवेळ ते या स्थितीत राहू शकत नाहीत. आपल्या कार्याविषयीचे समाधान आणि मधूनच आयुष्यात डोकावणारे असमाधान यांचा अन्वय लावण्याचा ही माणसे प्रयत्न करताना दिसतात. कधी त्यांच्या हाती काही लागते, तर कधी घोर निराशा त्यांच्या पदरी येते. त्यांच्या मनातल्या उलाढालींचे हे नाटक आहे. ‘प्रतिध्वनी’ हे नाटक जसे समाजसेवा करणाऱ्या माणसांवर कुठली कॉमेंट करत नाही, तसेच त्यांच्या प्रेरणांचे फार उदात्तीकरणही करत नाही. जसे इतरांचे जगणे आपण एरवी समजून घेतो, तसेच या माणसांचेही जगणे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात कुठला मूल्यविचार नाही. कुठली अनावश्यक पोझ नाही. त्यांचे आपापसातील संबंध आणि त्यांचे जगणे निखळपणे समजून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे.
दुसरा एक विशेष म्हणजे हे नाटक व्यक्ती आणि समाज यांच्यातला बंध तपासून बघत असले तरी नाटकात समाज समूहाच्या रूपात प्रत्यक्षात अस्तित्वात नाही. आज आपला समाज सामाजिक कार्याच्या संदर्भात एका निर्नायकी अवस्थेतून मार्गक्रमण करतो आहे. आपल्याला सामाजिक क्षेत्रात कुठला आदर्शच उरलेला नाही. असे नेमके कशामुळे झाले असेल? चांगले काम करणारी प्रज्ञावान माणसे सभोवताली असतानाही आपण समाज म्हणून असे का झालो आहोत? हा कुतूहलाचा विषय आहे. आज सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सगळ्यांचेच पाय शेवटी मातीचेच आहेत, या जाणिवेतून असे घडले असेल का? आपण आपापसात किंवा इतरांशी जे बोलतो, जसे बोलतो, तसे यातली माणसे करताना दिसतात.
त्यामुळे कधी कधी त्यांचा थांग लागत नाही. त्यांना जे बोलायचे आहे, सांगायचे आहे, व्यक्त करायचे आहे, ते सांगण्याची संधी त्यांना मिळतेच असे नाही. जेव्हा तशी संधी मिळते, तेव्हा ते सगळे व्यक्त करण्याची त्यांची ओढच संपलेली असते.
माणसाच्या सामाजिक प्रेरणेतील शक्यता यातल्या माणसांना जाणवत राहतात. आपल्याच जगण्याचा
निवाडा करण्याची वेळ येते, तेव्हा ही माणसेही इतरांसारखी आधी बिचकतातच. पण त्यांच्यात असलेल्या आंतरिक बळांमुळेच त्यांना आपले जगणे तपासून बघण्याची निकडही जाणवते. हेच त्यांच्या मनाचे मोठेपण आहे. अतिशय लाइट मूडमध्ये सुरू झालेले नाटक हळूहळू आर्त होत जाते. पथनाट्यांचा चांगला उपयोग नाटकात करून घेतला आहे. सर्वच पात्रे आपल्या भूमिकेला न्याय देताना दिसतात. सहजसुंदर अभिनयामुळे रंगमंचावरचा सर्वच पात्रांचा वावर चांगला झाला आहे.
नाटकाला ४३० प्रेक्षक उपस्थित होते. एकूण २ हजार ९२४ रुपयांची तिकीट विक्री झाली.
श्रेयनामावली
लेखक – पराग घोंगे
दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना – विनायक सावर्डेकर
पार्श्वसंगीत, ऱ्हिदम – हरेश केळकर
नेपथ्य निर्माण – सत्तू गुरव आणि मंडळी
वेशभूषा – मेघा कांबळी
रंगभूषा – दिया मयेकर
गायन – रफिक मुल्ला
सूत्रधार – अॅड. प्रशांत सावंत
रंगमंच व्यवस्था – गौरव चव्हाण
सल्लागार – अॅड. उन्मेष मुळे आणि अॅड. परेश वीरकर
निर्मिती प्रमुख – संतोष कनावजे
विशेष साह्य – समिधा सचिन शिंदे, साई मंगल कार्यालय व्यवस्थापक राजन कोतवडेकर
पात्रपरिचय
प्रणव – प्रशांत सावंत
राजेश – जगदीश कदम
सारंग – रफिक मुल्ला
कुणाल – रोहन साळवी
सई – सुकन्या शिंदे
राधा – आसावरी अरुण आखाडे
…………………
प्रतिध्वनी काही क्षणचित्रे











कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड