पुस्तकांशिवाय भवितव्य नाही – प्रकाश देशपांडे

अलोरे (ता. चिपळूण) : पुस्तकांशिवाय भवितव्य नाही. आपापसातील मतभेद मिटवायचे असतील, किल्मिषे दूर करायची असतील, तर पुस्तकांशिवाय दुसरा मार्ग नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि इतिहास संशोधक प्रकाश देशपांडे यांनी केले.

येथील परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित मोरेश्वर आत्माराम आगवेकर माध्यमिक विद्यालय व सीए वसंतराव लाड कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवाचा समारोप समारंभात शाळेच्या कै. सुभाष धोंडू लाड ग्रंथालयाचे उद्घाटन श्री. देशपांडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. भारतातील नालंदा विश्वविद्यालयातील समृद्ध ग्रंथालय आणि ते नष्ट झाल्याचा इतिहास विशद करताना ते म्हणाले, नालंदा विश्वविद्यालयात लाखाहून अधिक ग्रंथ होते. मात्र मोगल राज्यकर्ता बख्त्यार खिलजी याने त्या ग्रंथालयात कुराणाची प्रत नसल्याच्या कारणावरून ते जाळून टाकले. बहुमोल ग्रंथसंपदा नष्ट झाली. तो इतिहास झाला. पण आज प्रत्येकाच्या खिशात मोबाइलरूपी बख्त्यार खिलजी आहे. तो वाचन संस्कृती नष्ट करत आहे. मोबाइलमुळे प्रचंड माहिती सहज मिळत असली, तरी माहिती ज्ञान यातील फरक आपण विसरत चाललो आहोत. म्हणून ग्रंथालये संपत चालली आहेत. वाचन संपत चालले आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

कोकणाला मोठा इतिहास आहे, असे सांगून श्री. देशपांडे म्हणाले, कोकण वैभवसंपन्न, निसर्गसंपन्न, खनिजसंपन्न आहेच, पण देशाला सहा भारतरत्ने देणाऱ्या नामवंतांची मूळ गावे कोकणात आहेत. कोकण सर्वांत बुद्धिसंपन्न आहे, हे कोकणाचे वैशिष्ट्य आहे. ज्ञानाच्या बाबतीत वाचनाला आणि ग्रंथांना पर्याय नाही, हे ओळखूनच चिपळूणमध्ये लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर प्रयत्नशील आहे. त्यावरही २००५ साली आलेल्या महापुरामुळे मोठे संकट ओढवले. तेथे असलेल्या ५८ हजार ग्रंथांपैकी ४० हजार ग्रंथ भिजून नष्ट झाले. त्यानंतर अनेक हातांनी ग्रंथालय पुन्हा उभारायला मदत केली. एका निवृत्त शिक्षकाने निम्मे निवृत्तीवेतन खर्च करून उभारलेली लाखभर रुपयांची ग्रंथसंपदा वाचनालयाला दिली. हे शिक्षक आणि वाचकच ग्रंथालये वाचवू शकतात. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनीही भरपूर वाचायला हवे, असा सल्लाही श्री. देशपांडे यांनी दिला. प्रत्येक पुस्तकाला वाचक हवा असतो. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांनाही पुस्तके पुरविण्यासाठी लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर सदैव सज्ज आहे, असेही ते म्हणाले.

माजी शिक्षक राधाकृष्ण यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेच्या प्राथमिक विभागाच्या सुवर्ण महोत्सवाकरिता भरीव देणगी देणार असल्याचे घोषित केले. शाळेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सुवर्णमहोत्सव सांगतेचा पाच दिवसांचा कार्यक्रम अत्यंत आखीव रेखीव पद्धतीने शिस्तबद्धतेत साजरा केल्याबद्दल सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने अमित आगवेकर यांनी मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध, अरुण माने, शशिकांत वहाळकर, चंद्रकांत राठोड आणि धीरज वाटेकर यांचा सत्कार केला.

शाळेचे दिवंगत माजी मुख्याध्यापक मोरेश्वर आगवेकर यांचे गुरू दुंडगे (ता. गडहिंग्लज, कोल्हापूर) येथील मा. ना. कुलकर्णी यांच्या परिश्रम विद्यालयाच्या प्रतिनिधींनी खास ग्रंथभेट दिली. सुवर्ण महोत्सवानिमित्ताने टपाल खात्याने काढलेल्या खास तिकिटाचे अनावरण टपाल खात्याचे अधिकारी अमोल गायकवाड यांच्या उपस्थितीत झाले. इंडिया बुकमध्ये नोंद झालेले रांगोळीकार संतोष केतकर यांचा सत्कार करण्यात आला. सुवर्ण महोत्सवानिमित्ताने शाळेचे गौरवगीत लिहिणारे शिक्षक चंद्रकांत राठोड, संगीतकार प्रथमेश दिलीप यादव, हे गीत चार दिवस सादर करणारे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी संस्थेचे पालक सीए वसंत आणि सौ. अलका लाड (दुबई), संस्थेचे उपाध्यक्ष सुधीर अभ्यंकर, विजय ओस्वाल, श्री. चक्रदेव, सुनील जोशी, शाळा समिती सदस्य राजू कानडे, अमित आणि ऋजुता आगवेकर, शाळा समिती चेअरमन विठ्ठल चितळे, माजी विद्यार्थी डॉ. तेजानंद गणपत्ये, माजी मनोज चिटणीस, प्रसाद बुटाला, गणेश वामन चव्हाण, सरकारी वकील सौ. मेघना नलावडे, प्रकाश आंब्रे, हनुमंत काटकर (युगांडा), पालक प्रतिनिधी सौ. रोहिणी अदावडे, माजी शिक्षक-कर्मचारी अनिल आणि सौ. भैरवी गणपत्ये, अरुण माने, राधाकृष्ण जोशी, रामचंद्र खोत, विद्यार्थी प्रतिनिधी प्रतीक्षा रेमजे, संदेश झुजम, कवी राष्ट्रपाल सावंत, अरुण इंगवले आदी मान्यवर उपस्थित होते. आभार सौ. सोनल गमरे यांनी मानले. सूत्रसंचालन धीरज वाटेकर यांनी केले.

ग्रंथालय उद्घाटन समारंभापूर्वी झालेल्या श्रेणीयुक्त कार्यक्रमात संजय बळीराम मोरे स्मृतिविचार मंचावर ज्येष्ठ कवी आणि समीक्षक अरुण इंगवले, शाहीर राष्ट्रपाल सावंत, साहित्यिक प्रकाश देशपांडे यांनी प्राथमिक आणि शिशुविहार गटातील विद्यार्थ्यांना गुंगवून ठेवणारा संवाद साधला. श्री. सावंत यांनी शालेय पुस्तकातील कविता, किशोर मासिकातील कविता तसेच लोकजागृतीसाठी लिहिलेल्या कविता ढंगदार पद्धतीने सादर केल्या. मुलांनीही या कवितांना ठेका धरला.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply