राजन दळी यांनी उकलले कृपा हेअर टॉनिकच्या यशाचे रहस्य

अलोरे (ता. चिपळूण) : धोपावे (ता. गुहागर) येथील कृपा हेअर टॉनिकचे राजन दळी यांनी कृपा हेअर टॉनिकच्या यशस्वी उद्योगाचे रहस्य अलोरे येथील एका कार्यक्रमात उकलले.

व्यासपीठावर सीए वसंतराव लाड, राजन दळी, मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध

अलोरे (ता. चिपळूण) येथील परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित मोरेश्वर आत्माराम आगवेकर माध्यमिक विद्यालय व सीए वसंतराव लाड कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी श्री. दळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम पार पडल्यानंतर स्मृतीविचार मंचावर श्रेणीयुक्त कार्यक्रमात अकरावी-बारावी विज्ञान विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. किराणा दुकानापासून सुरू झालेला व्यवसाय आणि कृपा हेअर टॉनिकचे उत्पादन, त्यात आलेल्या अडचणी, त्यावर काढलेला मार्ग, करोनाच्या काळात व्यवसाय बंद असताना केलेले वेगळे काम, शोधलेला मातीच्या पणत्यांचा नवा आणि वेगळा व्यवसाय याविषयीची माहिती त्यांनी दिली.

विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना श्री. दळी यांनी उत्तरे दिली. तेलाला कृपा हे नाव आपल्या वडिलांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. विविध शासकीय परवानग्या, ग्रामीण भागातील अल्पशिक्षित महिलांना दिलेला रोजगार याविषयी श्री. दळी यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. केस गळणे, केसांच्या विविध समस्यांवर कोणते उपाय असू शकतात, कृपा हेअर टॉनिकमध्ये कोणती औषधी द्रव्ये वापरली जातात, स्पर्धेत टिकण्यासाठी कोणते प्रयत्न केले, व्यवसाय राज्यभर पोहोचविण्यासाठी काय केले, असे प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले. आंबा, काजू, करवंदे, फणस अशा कोकणातील फळांपासून प्रक्रियायुक्त पेये तयार करण्यासाठी आवश्यक परवाने मिळविले असून लवकरच उत्पादन सुरू होईल, असेही श्री. दळी यांनी सांगितले.

या संवादाला उपस्थित असलेले सीए वसंतराव लाड यांच्या हस्ते श्री. दळी यांचा सत्कार करण्यात आला. प्रशालेच्या दिवंगत कर्मचाऱ्यांची आठवण सुवर्णमहोत्सवी वर्षात व्हावी, यासाठी त्यांच्या नावाच्या व्यासपीठावर वक्त्यांना विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा उपक्रम सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने राबविला जात असल्याचे मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध यांनी सांगितले. त्याचाच भाग म्हणून श्री. दळी यांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी अनंत लक्ष्मण आग्रे स्मृती विचार मंचावर पाचारण केल्याचे त्यांनी सांगितले.

स्मृती विचार मंचाच्या आणखी एका व्यासपीठावर नववी-दहावीच्या विज्ञान विषयाच्या विद्यार्थ्यांशी अलोरे हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनी मंजूषा देशपांडे-कुलकर्णी यांनी संवाद साधला. त्या पुण्यातील अभियंता व्यावसायिक असून सामाजिक कामात अग्रेसर असतात. त्यांनी विद्यार्थ्यांना यशाचा कानमंत्र देताना सांगितले की, प्रत्येकाने कोणता ना कोणता छंद जोपासला पाहिजे. जीवनात वाचनाला खूप महत्त्व आहे. म्हणून वाचनाचा छंद प्रत्येकाने लावून घेतला पाहिजे, असे त्या म्हणाल्या. पुस्तकांचा उपयोग आयुष्य घडविण्यासाठी करता येतो. पुस्तके वाचून टिपणी गोळा करणे, अनुवाद करणे आणि वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करणे शक्य आहे. त्यासाठी त्यांनी थ्री इडियटस् या चित्रपटाचे उदाहरण दिले. आवडलेल्या, आवडत असलेल्या विषयांचा आणि छंदांचा अधिक अभ्यास करा, नव्या वाटा चोखाळण्याचा प्रयत्न करा, असा सल्लाही त्यांनी मुलांना दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. देवकी खोत यांनी केले. पालक प्रतिनिधी चव्हाण आणि सौ. शिंदे वहिनी यांच्या हस्ते सौ. देशपांडे-कुलकर्णी यांचा सन्मान करण्यात आला..

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply