Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

लोकोत्सवाचे जनआंदोलनात परिवर्तित करून सकारात्मक बदल घडवू या : आचार्य देवव्रत

Advertisements

कोल्हापूर : सिद्धगिरी आश्रमाच्या माध्यमातून विविध कार्य करत काडसिद्धेश्वर स्वामीजींनी आयोजित केलेला पंचमहाभूत लोकोत्सव एक जनआंदोलनात परिवर्तित करून सकारात्मक बदल घडवू या, असे आवाहन गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.

ते कणेरी येथील सिद्धगिरी मठाने आयोजित केलेल्या मंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवात पाचव्या दिवशी जलतत्त्व-महिला उत्सवात बोलत होते. ते म्हणाले, भारत ऋषी-मुनी यांची परंपरा असलेला, पंचमहाभूतांची पूजा करणारा देश आहे. आपण भौतिक विकास करताना विदेशी संस्कृतीचे अंधानुकरण केल्याने विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत. आज अचानक ढगफुटी होते, तसेच अन्य अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्याचा सामना करायचा असेल, पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक आहे.

यावेळी व्यासपीठावर कर्नाटकच्या वक्फ, हज आणि धर्मादायमंत्री सौ. शशिकला जोल्ले, स्वामी संपूर्णानंद महाराज, राजस्थानमधील कृष्ण जाखड, आयआयटीचे प्रदीप मिश्रा, लोकभारतीचे गोपाल उपाध्याय, डॉ. हर्षा हेगडे, जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह, इचलकरंजीच्या नगराध्यक्ष सौ. अलका स्वामी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
हर्षा हेगडे म्हणाल्या, स्त्री आणि पाणी यांना एकमेकांपासून दूर करता येऊ शकत नाही. प्रत्येक जीवसृष्टीचा मुख्य घटक पाणी हाच आहे. पाणी इतके महत्त्वपूर्ण आहे की, भारतात पाण्याचेही पूजन केले जाते. गंगामातेचे पूजन केले जाते. त्यामुळे पाण्याचा दुरुपयोग होऊ देऊ नका, अन्यथा पृथ्वी आपल्याला कदापि क्षमा करणार नाही.

केमिकल आस्थापनांनी आतापर्यंत सर्वांत अधिक पर्यावरणाचा र्‍हास केला, असे मत प्रदीप मिश्रा यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, सध्या संपूर्ण विश्व पर्यावरणाच्या समस्यांनी पीडित आहे. अशा परीस्थितीत पंचमहाभूत लोकोत्सवाचे आयोजन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. स्त्रीमध्ये समाजाला सर्वश्रेष्ठ स्थानी नेण्याची शक्ती आहे. त्यामुळे स्त्रियांकडून पर्यावरण रक्षणाचे संस्कार मुलांवर होणे आवश्यक आहे. मानवाच्या अयोग्य जीवनप्रणालीमुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत आहे, ते टाळल्यास जलस्रोतांचे पुनरुज्जीवन होईल. एक किलो मांस सिद्ध करण्यासाठी एक हजार लिटर पाण्याचा व्यय होतो. त्यामुळे एका व्यक्तीने मांसाहार सोडला, तर १०० लोकांची तहान भागू शकते, असे श्री. मिश्रा यांनी नमूद केले.

नदीच्या किनारी रहाणार्‍या शेतकर्‍यांनी शेतीच्या पद्धतीत पालट करून नैसर्गिक शेती करण्याचा प्रयत्न करावा. लोकभारतीच्या माध्यमातून विविध स्तरांवर जलप्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. जलप्रदूषणाच्या संदर्भात समाज वेळीच जागृत न झाल्यास वर्ष २०५० पर्यंत जलसंकट महाभयंकर रूप धारण करेल, अशी भीती लोकभारतीचे गोपाल उपाध्याय यांनी व्यक्त केली.

सौ. शशिकला जोल्ले म्हणाल्या, भारत देश संस्कृती, संस्कार आणि अध्यात्म यांनी भरलेला आहे. त्यामुळे आपण भारतभूमीत जन्माला आलो हे परमभाग्य आहे. लोक देशाची संस्कृती विसरत असल्याने महापूर, भूकंप, करोना यांसारखी संकटे येत आहेत. या महोत्सवाच्या माध्यमातून पंचमहाभूतांचे महत्त्व आणि जतन होणार आहे. त्याच्या आयोजन केल्याबद्दल काडसिद्धेश्वर स्वामीजी यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. सध्याच्या काळात समाजाने आधुनिकतेच्या नावाखाली पिझ्झा, बर्गर यांच्या आहारी जाण्याऐवजी पर्यावरण जपण्यास शिकले पाहिजे. वेळीच पाणी रक्षणासाठी उपाययोजना केल्या नाहीत, तर पाण्यावरून महायुद्ध होईल. वृक्षांच्या संवर्धनासाठी निपाणी मतदारसंघात महिलांना प्रत्येकी १४ फळझाडांची रोपे दिली आणि त्यांचे जतन आणि संवर्धन करण्यास सांगितले. तसेच त्यांना घरगुती भाजीपाला लावण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version