स्त्रीचे माणूसपण नाकारणाऱ्या परंपरांना नाकारायला हवे : सरिता पवार

राजापूर : स्त्रीतील माणूसपण नाकारणाऱ्या परंपरांना आपण नाकारायला हवे, असे आवाहन कणकवलीतील राष्ट्र सेवा दलाच्या सामाजिक कार्यकर्त्या, ज्येष्ठ साहित्यिक सरिता पवार यांनी केले.

जुवाठी (ता. राजापूर) हायस्कूलचे सहायक शिक्षक अक्षरमित्र बी. के. गोंडाळ व सौ. मालती गोंडाळ यांनी आपली आई कै. सौ. सावित्री केरू गोंडाळ यांच्या स्मरणार्थ जुवाठी ग्रामपंचायत सभागृहात संपूर्ण गावातील महिलांसाठी विधवा महिलांना सोबत घेऊन पहिल्यांदाच हळदीकुंकू कार्यक्रम आणि प्रबोधनात्मक व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी सरिता पवार यांनी आपले विचार मांडले.

त्या म्हणाल्या, आपल्या धर्म, संस्कृतीने लादलेली आणि पिढीजात जपलेली, सर्व अनिष्ट चालीरीतींची बंधने झुगारून स्त्रियांनी आपल्या मानसिक गुलामगिरीतून मुक्त व्हावे आणि आपल्या प्रगतीसाठी एक पाऊल पुढे यावे. परंपरेने चालत आलेल्या अनेक प्रथा महिलांसाठी जाचक आहेत. पतिनिधनानंतर विधवा होणाऱ्या महिलांची समाजात अगदी अत्यंत वाईट पद्धतीने होणारी अवहेलना त्यांना जगणे नकोशी करणारी असते. मासिक पाळीच्या काळात त्यांना आपल्याच हक्काच्या घरातून चार दिवसांत कसे वाळीत टाकले जाते, याचे वास्तव दर्शन कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सुमारे २०० महिलांसमोर पवार यांनी मांडले. त्यांच्याशी संवाद साधत, त्यांच्याकडून होकार-नकार घेत त्यांच्या दु:खांना वाट मोकळी करून दिली. त्या पुढे म्हणाल्या, बी. के. गोंडाळ यांनी विधवा मातांच्या आजच्या प्रगतीच्या काळात होणाऱ्या अवहेलनेबाबत कृतिशील प्रबोधनाचे उचललेले पाऊल धाडसी आणि क्रांतीकारी आहे. यासाठी त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. त्यांनी याबाबत आपल्या वैयक्तिक स्तरावर कृती कार्यक्रमाची आखणी केली. आपल्या मृत्युपश्चात आपल्या पत्नीच्या अंगावरील दागदागिने काढू नयेत, तिचे कुंकू पुसू नये, याबाबतचे पहिले प्रतिज्ञापत्र त्यांनी राजापूरच्या तहसीलदार कार्यालयात लिहून दिले. त्यानंतर आपल्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त जुवाठी गावातील १५ विधवा मातांचा साडीचोळी देऊन प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार केला. त्यांच्यामध्ये जाणीव, जागृती व्हावी, यासाठी प्रबोधनात्मक व्याख्यान ठेवले.

कार्यक्रमाचे उद्घाटन जुवाठी गावातील ज्येष्ठ माता यशोदा यशवंत घेवडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. सरिता पवार यांचा त्यांच्याच हस्ते शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांना कुंकवाचा करंडा देण्यात आला. सोबत, प- पाळीचा हे शास्त्रीय दृष्टिकोन देणारे पुस्तक आणि विटाळाबाबत प्रबोधन करणारे पत्रक वाटण्यात आले.

यावेळी ओणीच्या गोकुळचे डॉ. महेंद्र मोहन, आशाताई गुजर, रिना आलोक गुजर, राजापूर हायस्कूलचे शिक्षक उमेश शिवगण, पूजा सप्रे, सुहासिनी गिरकर, प्राथमिक शिक्षिका शीतल मणचेकर, माजी सरपंच रिया मयेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य नेत्रा मयेकर, विद्यमान सदस्य अस्मिता घेवडे, प्राजक्ता मयेकर, सुजाता कांबळे, अंगणवाडी सेविका दीप्ती कोकाटे, ग्रामसंघ प्रमुख अश्विनी सारंग, स्मिता सूर्यवंशी, वैशाली मोहरकर, चंद्रभागा मयेकर उपस्थित होत्या. याशिवाय भरारी, रमाई, निनादेवी, शक्ती, गीताई, सखी, झेप, संघर्ष, समर्थ, क्रांती, माऊली, श्रीगणेश, एकता आणि सावित्रीबाई या बचतगट समूहाच्या अध्यक्ष, सचिव आणि सदस्याही उपस्थित होत्या.

सरिता पवार यांचा सत्कार करताना यशोदा यशवंत घेवडे, आशाताई गुजर आणि इतर माता

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply