संगमेश्वर ते देवळे पेडल फॉर स्पिरिच्युअलिटी रत्नागिरी सायक्लोथॉन

रत्नागिरी : येथील सुवर्णसूर्य फाउंडेशन, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि कलांगण (संगमेश्वर) या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने संगमेश्वर ते देवळे पेडल फॉर स्पिरिच्युअलिटी म्हणजेच अध्यात्मासाठी रत्नागिरी सायक्लोथॉनचे आयोजन केले आहे.

एकूण ४२ किलोमीटरचा हा मार्ग असून ५ मार्च रोजी सकाळी ६ वाजता संगमेश्वर येथून प्रारंभ होणार आहे.

कोकणातील प्रचलित नसलेली पर्यटनस्थळे जागतिक पटलावर पोहोचावीत, यासाठी गेली तीन वर्षे सुवर्णसूर्य फाऊंडेशन सायक्लोथॉन आयोजित करते. सन २०२१ मध्ये पेडल डेली स्टे फीट हे घोषवाक्य घेऊन ही सायक्लोथॉन हेदवी ते गणपतीपुळे दरम्यान पार पडली. गेल्या वर्षी कातळशिल्पांचा प्रसार-प्रचार व्हावा, या उद्देशाने थिबा राजवाडा ते देऊड कातळशिल्प अशी ही सायक्लोथॉन घेण्यात आली. पेडल फॉर पेट्रोग्लिफ हे या सायक्लोथॉनचे घोषवाक्य होते.

यावर्षी संगमेश्वर ते देवळे अशी सायक्लोथॉन आयोजित करण्यात आली आहे. गुजरातमध्ये दत्तसंप्रदायाचा प्रसार-प्रचार करणाऱ्या रंगावधूत स्वामींचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जन्मवर्षाचे औचित्य साधून येत्या ५ मार्च रोजी होणाऱ्या या सायक्लोथॉनचे पेडल फॉर स्पिरिच्युअलिटी हे घोषवाक्य आहे. २०२१ मध्ये पेडल डेली स्टे फीट हे घोषवाक्य घेऊन ही सायक्लोथॉन हेदवी ते गणपतीपुळे दरम्यान झाली. २०२२ मध्ये पेडल फॉर पेट्रोग्लिफ म्हणजे कातळशिल्पांचा प्रसार, प्रचार व्हावा या उद्देशाने थिबा राजवाडा ते देऊड कातळशिल्प अशी सायक्लोथॉन झाली.

यंदाची सायक्लोथॉन पेडल फॉर स्पिरिच्युअलिटी संगमेश्वर ते देवळे येथील रंगावधूत महाराज मठापर्यंत आयोजित केली आहे.

महाराजांचा जन्म देवळे येथे झाला आणि त्यांचे कार्य गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्यांनी दत्त संप्रदायाचा प्रसार, प्रचार केला. रंगावधूत स्वामींचे हे शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्ष आहे. दत्तबावनी रचणाऱ्या रंग अवधूत महाराजांच्या या मठात गुजरातमधून लाखो भाविक दरवर्षी येतात. रत्नागिरीकरांनाही या रंगावधूत स्वामी महाराजांचा मठ पाहता यावा, याकरिता ही सायक्लोथॉन होणार आहे.

सायक्लोथॉनमध्ये रत्नागिरी, मुंबई, ठाणे, पुणे, कऱ्हाड, सिंधुदुर्ग, खेड, दापोली, चिपळूणमधून मोठ्या प्रमाणात सायक्लोथॉनसाठी सायकलस्वारांनी नोंदणी केली आहे. सायकलस्वारांना आदल्या दिवशी निवास, रात्रीचे जेवण, सकाळी अल्पोपाहार, स्पर्धेदरम्यान हायड्रेशन पॉईंट, मदतीसाठी वाहन, वैद्यकीय मदत, प्रत्येक सहभागींना पदक, आणि सांगता कार्यक्रमानंतर नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जास्तीत जास्त सायकलप्रेमींनी गुगल लिंकवर नोंदणी करावी, असे आवाहन सुवर्णसूर्य फाउंडेशनचे प्रसाद देवस्थळी, कलांगणचे श्रीनिवास पेंडसे, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे दर्शन जाधव, योगेश मोरे यांनी केले आहे.

वासुदेवानंद सरस्वतींचे अनुग्रहित श्रीरंगावधूत महाराज

दत्त संप्रदायातील थोरले महाराज म्हणून ओळखले जाणारे वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी यांचे श्रीरंगावधूत महाराज शिष्य होते. पण हे शिष्यत्वही अलौकिक होते.

श्रीरंग अवधूत महाराजांचे पूर्वाश्रमीचे नाव पांडुरंग विठ्ठल वळामे. देवळे (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथील विठ्ठलपंत वळामे धर्मपरायण, वेदपरायण व दशग्रंथी विद्वान् ब्राह्मण होते. सखारामपंत सरपोतदार यांच्या विठ्ठलमंदिरातील नियमित देवपूजेसाठी ते देवळे या आपल्या गावाहून गुजारातमधील गोध्रा शहरात गेले. तेथेच पांडुरंग यांचा २१ नोव्हेंबर १८९८ रोजी जन्म झाला. पण त्यानंतर अल्पावधीतच त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि त्यांचे कुटुंब देवळे या गावी परतले. वयाच्या आठव्या वर्षी तेथेच पांडुरंग यांचा व्रतबंध झाला. उपनयनविधीनंतर ते श्रीनृसिंहवाडीला श्रीवासुदेवानंदसरस्वती महाराजांच्या दर्शनाला आले. १९०६ साली ही भेट घडली. त्यानंतर त्यांची टेंब्ये स्वामींशी कधीच प्रत्यक्ष भेट झाली नाही. मात्र पहिल्याच भेटीत श्रीटेंब्ये स्वामी म्हणाले, ‘हा बाळ तर आमचाच आहे.’ आणि ते त्यांचे शिष्य बनले.

नंतर तेही गुजरातमध्ये नारेश्वर येथे गेले. तेच त्यांचे कार्यक्षेत्र ठरले. जवळच असलेल्या गरुडेश्वर येथे टेंब्ये स्वामी समाधिस्थ झाले. त्यांच्याच छत्रछायेत श्रीरंगावधूत महाराजांच्या कार्याचा विस्तार झाला. त्यांची बुद्धी तेजस्वी होती, स्मरणशक्ती तीव्र होती. मराठी, गुजराती, इंग्रजी, हिंदी आणि संस्कृत या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. विसाव्या वर्षी गृहत्याग करून त्यांनी दत्तप्रसार सुरू केल्यावर कधीही त्यांनी धन, द्रव्य घेतले नाही. कोणी पैसे ठेवले, तर ते सबंध दिवस उपवास करत. त्यांनी कधीही भाषण, प्रवचन केले नाही. आपल्या कृतीमधून त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. आपला अंतकाल जवळ आल्याची चाहूल लागल्यानंतरच जणू त्यांनी हरिद्वारला प्रयाण केले आणि तेथेच त्यांनी १९ नोव्हेंबर १९६८ रोजी देह ठेवला. त्यांची समाधी मात्र त्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या नारेश्वर येथे आहे.

अशा श्री रंग अवधूत स्वामींच्या जन्मस्थळी पेडल फॉर स्पिरिच्युअलिटीच्या माध्यमातून पाच मार्च रोजी सायकलप्रेमी पोहोचणार आहेत.

या फेरीच्या नोंदणीसाठी लिंक :

http://bit.ly/3YUdyPm

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply