संगमेश्वर : कसबा-संगमेश्वर (ता. संगमेश्वर) येथील पुरातन मंदिरात उद्या (दि. १५ मार्च) सकाळी किरणोत्सव सोहळा होणार असून तेथे शिव आणि भास्कराची आगळीवेगळी भेट होणार आहे.
गेली अनेक वर्षे कोल्हापूरला महालक्ष्मी मंदिरात मावळतीला जाणाऱ्या सूर्याची किरणे देवीच्या मूर्तीवर पडता आणि किरणोत्सव होतो. कर्णेश्वर येथे मात्र उगवत्या सूर्याच्या किरणांनी हा उत्सव अनुभवता येणार आहे. उद्या सकाळी ६ वाजून ४७ मिनिटांनी सूर्योदय होणार आहे. पूर्व क्षितिजावर तेजोनिधी भास्कर प्रकट होतील. सुमारे ७ वाजेपर्यंत तो लालबुंद गोळा आकाशात दिसू लागेल आणि पुढच्या पाचच मिनिटांत श्री कर्णेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातील शिवपिंडीवर आपल्या किरणांची मुक्तहस्ते उधळण करीत शंभू महादेवांना सचैल स्नान घालेल.
किरणोत्सवाचा सोहळा खगोलशास्त्र, स्थापत्यशास्त्र आणि धार्मिकता यांचा त्रिवेणी संगम असून तो प्रत्यक्ष अनुभव घेण्याजोगाच असले. सुमारे १० ते १२ मिनिटे हा सोहळा चालेल. शिवशंकरांना वंदन करून गगनराजाची पुढील वाटचाल सुरू होईल. ही ५ मिनिटे प्रत्यक्ष डोळ्यांत साठवण्यासारखीच असतील. अकराव्या शतकातील शिल्पसमृद्ध कर्णेश्वर मंदिरात हा अनुपमेय सोहळा अनुभवण्यासाठी उद्या सकाळी ७ वाजता कसबा-संगमेश्वर येथील श्री क्षेत्र कर्णेश्वर मंदिरात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी निबंध कानिटकर (९४२२३७६३२७ किंवा ७०५७३७६३२७) यांच्याशी संपर्क साधता येईल.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

