देवरूख : येथील एसटी आगारातून येत्या २५ मार्चपासून गोंदवले-म्हसवड बसफेरी सुरू होत आहे.
राज्यातील ७ तालुके, ७ शहरे, ७ नद्या, ७ देवस्थाने आणि ७ पर्यटनस्थळे जोडणारी ही बस देवरूखहून दररोज दुपारी सव्वाबारा वाजता सुटेल. ती देवरूख, साखरपा, मलकापूर, कोकरूड, शेडगेवाडी, उंडाळे, कराड, पुसेसावळी, वडूज, दहिवडी, गोंदवले मार्गे म्हसवडला पोहोचेल. परतीच्या प्रवासाकरिता ती सकाळी साडेसहा वाजता म्हसवड येथून सुटणार आहे. या बसचा लाभ घेण्याचे आवाहन एसटी आणि एसटीप्रेमींतर्फे करण्यात आले आहे.
“मानेंच्या माणदेशात”, मानेंच्या गावाला, म्हसवडला जायला ही बसफेरी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. माने, राजमाने या आडनावाचे लोक म्हसवडला मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांना आपल्या मूळ गावी थेट जाऊन सिद्धनाथाचे दर्शन घेता येईल. कोकणात राहणाऱ्या माणदेशातील माहेरवाशिणींना आपल्या माहेरी, आपल्या आजोळी, मामाच्या गावात जायला थेट हक्काची गाडी चालू होणार आहे. देवरूखची सोळजाई, मारळचा मार्लेश्वर, विशाळगडचा रेहान मलिक, औंधची यमाई, गोंदवल्याचे ब्रह्मचैतन्य, म्हसवडचा सिद्धनाथ या सर्व देवस्थानांना ही गाडी जोडली जाणार आहे.
देवरूखच्या व्यापाऱ्यांनाही या गाडीमुळे कराडची बाजारपेठ खुली होणार आहे. सकाळी सव्वानऊ वाजता कराडमध्ये माल चढवला, की की दुपारी बारा वाजता तो देवरूखला पोहोचेल. देवरूखमधून पुण्याला दुपारच्या वेळी जायचे असेल, तर फिरत जाण्याची गरज नाही. या गाडीने कराडला जाऊन तेथून जेवायला पुण्यात पोहोचता येईल.
ही बससेवा येत्या २५ मार्चपासून सुरू होत असून त्यादिवशी दुपारी सव्वाबारा वाजता बसच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
