देवरूख : देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध ५०० बीजगोलकांची (सीड बॉल्स) निर्मिती केली.
महाविद्यालयाच्या अभिनव हरित वसुंधरा अभियानाच्या सांगता समारंभात त्यांचे सादरीकरण करण्यात आले.
महाविद्यालयाच्या भूगोल विभागाकडून चालू शैक्षणिक वर्षात अत्यंत नावीन्यपूर्ण आणि अभिनव पद्धतीने हरित वसुंधरा अभियान राबविण्यात आले. या अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांनी परिश्रमपूर्वक बनविलेले ५०० बीजगोलक (सीड बॉल्स) वृक्षवाढीसाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी उपयुक्त ठरणार आहेत. अभियानाच्या समारोपप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वयंरोजगारक्षम होण्यासाठी गोमयापासून निर्माण केलेले पर्यावरणपूरक सीड पेन्स, डास निर्मूलन आणि वातावरण शुद्ध करणाऱ्या कप्स आणि काड्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.
कार्यक्रमाला मंडळाचे उपाध्यक्ष कृष्णकुमार भोसले, कनिष्ठ महाविद्यालय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा ॲड. वेदा प्रभुदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, प्रा. धनंजय दळवी, प्रा. प्रतीक्षा मोहिते उपस्थित होत्या. या अभियानाचे मार्गदर्शक प्रा. डॉ. मयूरेश राणे यांनी प्रास्ताविकात उपक्रमाबद्दल विस्तृत विवेचन केले. यानंतर प्रा. धनंजय दळवी यांनी वर्षभर भूगोल विभागातर्फे आयोजित केलेले विविध उपक्रम आणि अभियानांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग तसेच यश याबाबत माहिती दिली. डॉ. सरदार पाटील यांनी विद्यार्थ्यांसाठी भूगोलशास्त्रातील नवनवीन शैक्षणिक आणि करियरविषयक संधींची माहिती दिली. प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी निसर्गातील वृक्षवाढ आणि वृक्षसंवर्धनासाठी ही चळवळ समाजामध्ये पोहोचवण्यासाठी विद्यार्थ्यांची सक्रिय भूमिका कशी असावी, याबाबत विवेचन केले. भूगोलशास्त्र व भौतिकशास्त्र या दोन विषयांतील परस्परउपयुक्तता याबाबत महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी दिली.
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रतिकृती आणि उपकरणे बनवण्यासाठी वापरलेले तंत्र, वस्तू, त्यांची उपयुक्तता याबाबतची माहिती विद्यार्थिनी गौरी सागवेकर हिने दिली. भूगोलशास्त्र विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांनी भेटवस्तू देऊन गौरविले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे प्रा. मयूरेश राणे, प्रा. प्रतीक्षा मोहिते यांनी विद्यार्थ्यांना केलेल्या अनमोल मार्गदर्शनासाठी, तसेच उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी महत्त्वपूर्ण सौरऊर्जा निर्मितीवर आधारित आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर केलेल्या शोधनिबंधासाठी कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने मान्यवरांनी सन्मानित केले.
कृष्णकुमार भोसले यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी तयार केलेली उपकरणे आणि वस्तू पर्यावरणपूरक असल्याचे नमूद करून त्यांनी संस्थेकडून अधिक प्रोत्साहन आणि मार्गदर्शन केले जाईल, असे सांगितले. विद्यार्थ्यांनी असे उपक्रम यापुढेही चालू ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.
संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, शिरीष फाटक, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे यांनी अभियानाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या विद्यार्थी स्वराज्य मंडळाची सचिव श्रुती सागवेकर हिने केले, तर आभार अश्विनी धामणे हिने मानले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड