रत्नागिरी : बहुरंगी कलाकार असलेले श्रीकांत ढालकर यांनी आपले बहुढंगी व्यक्तिमत्त्व उलगडून सांगितले. गोळप कट्टा (ता. रत्नागिरी) येथील मुलाखतीत त्यांच्या या अवलिया अष्टपैलू कलाकाराची ओळख उपस्थितांना झाली.
ऑगस्ट २०१८ पासून दर महिन्यात दुसऱ्या शनिवारी होत असलेल्या गोळप कट्टाच्या एकेचाळिसाव्या कार्यक्रमात श्री. ढालकर यांची मुलाखत झाली. त्यात त्यांनी आपला जीवनप्रवास उलगडला. तो त्यांच्याच शब्दांत असा –
कुटरे (ता. संगमेश्वर) हे आमचे मूळ गाव. वडील शिक्षक होते. ती नोकरी सोडावी लागली. गावातील त्यांच्या हिश्श्याची सर्व जमीन चुलत कुटुंबात देऊन ते रत्नागिरीला आले. आईसुद्धा पूर्वी शिक्षिका होती. लग्नानंतर तिने गृहिणी म्हणून काम केले. वडील बापूराव पटवर्धन यांच्या दुकानात लेखाजोखा ठेवायचे काम करायचे. त्यांना नाटकाची आणि चित्रकलेची आवड होती. अनेक नाटकांतून त्यांनी स्त्री भूमिकाही वठवली. त्यांच्यामधील गुण माझ्यात आले. लहानपणी शाळेत एक शिल्पकार विनायक करमरकर यांच्यावर धडा होता. मूर्तिकार होण्यास प्रथमतः त्या धड्यातून प्रेरणा घेतली. गणपती मूर्ती जमेल तशी बनवू लागलो. प्रसिद्ध मूर्तिकार कृष्णा कांबळे यांच्याकडे तासन् तास बसून निरीक्षण करू लागलो. नंतर स्वतः प्रयत्न केले. त्यात कमीजास्त काही असेल, तर ते सांगत असत. शिकत शिकत मूर्ती घडवू लागलो.
मला स्वतःला १९८२ मध्ये गणपती मूर्तीची पहिली ऑर्डर मिळाली. गणपती किंवा कोणत्याही मूर्तीसाठी रेखणी महत्त्वाची असते. ती मी प्रचंड निरीक्षणातून शिकलो. त्यावर हात बसला. वडिलांना व्यायामाची आवड होती. त्यांच्याबरोबर मीही व्यायाम करत असे. शाळेत असताना ५०० सूर्यनमस्कार तसेच ३०० जोर मारण्याच्या स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला होता. दहावी झाल्यावर मुंबईत जे. जे. स्कूल ऑफ आर्टला जायचे होते. मात्र तेवढी परिस्थिती नसल्याने वडिलांनी सांगितले की, बघून चित्र काढायला शिक आणि परीक्षा दे. ते अमलात आणले. प्रचंड चिकाटीने करत होतो. चित्रकलेत जम बसला. कॉलेजला असताना आकृत्या, चित्रे काढण्यासाठी प्रचंड संधी मिळाली. छत्र्यांवर नावे घालणे, भिंतीवर चित्र काढणे अशी असंख्य कामे केली. पाटबंधारे कार्यालयात अनुरेखकाचे काम मिळाले होते. तेथे चित्रकला आणि गणपती मूर्ती कलेच्या जोरावर कंत्राटी कामगार म्हणून संधी मिळाली. पुढे शून्य बजेटमध्ये नोकरी गेली. उपोषण केले. मग केस चालली. तेथे बाजू पटवून दिल्याने मला परत नोकरी मिळाली. त्यानंतर पुन्हा अतिरिक्त ठरल्याने मला महसूल विभागात तलाठी म्हणून जव्हार, ठाणे जिल्ह्यात नोकरी दिली. तेथे प्रांत ऑफिसमध्ये काम केले. तेथेही कलेच्या जोरावर स्थान निर्माण केले. खात्यांच्या अनेक स्पर्धांमध्ये कोकणाला कायम पहिला नंबर मिळवून दिला. पुढे धामणसे येथे बदली मिळाली. मग २०१५ मध्ये स्वेच्छा निवृत्ती घेतली.
लहानपणी रामदास पाध्ये यांचा दूरदर्शनवरचा कार्यक्रम पाहायचो. तो पाहून छंद जडला. आरसा गुरू मानून प्रचंड मेहनत आणि सराव केला. त्यात शब्दभ्रमकलेत यशस्वी झालो. लांजा येथे राजेंद्र कोकाटे या मित्राने पक्षिनिरीक्षणाची आवड लावली. त्यांनी खूप मार्गदर्शन केले. प्रचंड निरीक्षण, अभ्यास केला, चित्रे काढली. नंतर आवाज हुबेहूब जमायला लागले. कुठे काही पाहिले की आपल्याला आले पाहिजे, याचा ध्यास घेतला. नेहमी स्वतःशी स्पर्धा केली आणि प्रगती केली.
बंगळूरमध्ये एस व्यासा येथे योगशिक्षक शिक्षण घेतले. तेथे शिक्षणसुद्धा दिले. पतंजली योगशिक्षक झालो. योग मार्गदर्शन करतो. अनेक शाळांतून मुलांना चित्रकला मार्गदर्शन मोफत केले. प्रात्यक्षिकांसह असंख्य कार्यक्रम केले. शिरीष पै यांचे हायकू पुस्तक वाचल्यावर त्या प्रकारच्या तीन ओळींच्या कविता केल्या. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली. संगीत नाटकात कामे केली. विशेष म्हणजे पाऊले चालती पंढरीची वाट या नाटकात ५१ प्रयोगात प्रत्यक्ष रंगमंचावर प्रेक्षकांसमोर नाचत दीड ते दोन फूट विठ्ठलाची हाती मूर्ती घडविली आणि रंगविली. केवळ नव्वद मिनिटांत!
अध्यात्माचा अभ्यास केला. त्यातून चिंतनाने नवी दिशा मिळाली. अभ्यास झाला. प्रवचने केली. अनेक कीर्तने केली. आजपर्यंत अनेक मोठ्या व्यक्तींच्या हस्ते सत्कार झाला. खूप पुरस्कार मिळाले. समाधानी आहे.
स्वतःशी स्पर्धा केली आणि प्रत्येक गोष्टीचा ध्यास घेतला तर आपण त्यात यशस्वी होऊ शकतो. कोणाला तरी प्रेरणा मिळेल, या उद्देशाने गोळप कट्टा या स्तुत्य उपक्रमाला आलो.
श्री. ढालकर यांनी आयुष्यातील अनेक अनुभव, किस्से सांगितले. संयम आणि सातत्य यांचे महत्त्व सांगितले. अनेक पक्ष्यांचे हुबेहूब आवाज काढले. तोंड बंद ठेवून, ब्रश करताना, हसताना अविश्वसनीय गाणी म्हणून दाखवली. फणीवर अप्रतिम गाणी वाजवली. बोलक्या बाहुल्यांचा मंत्रमुग्ध करणारा खेळ दाखवला. हा कार्यक्रम संपूच नये, असे वाटत होते. अवलिया हे विशेषण त्यांना शोभून दिसते, याची प्रचीती आली. त्यांच्यासारखा कलावंत हा रत्नागिरीसाठी भूषण आहे, अशी सर्व श्रोत्यांची भावना झाली.
श्री. ढालकर यांचा संपर्क क्रमांक – ९४२१२३२०३६
(माहिती संपर्क – अॅड. अविनाश काळे, ९४२२३७२२१२)
