कुर्धे : स्वामी स्वरूपानंदांच्या पावसजवळच्या कुर्धे (ता. जि. रत्नागिरी) या गावाने गुढीपाडव्याला शोभायात्रा काढून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची परंपरा सुरू केली. यंदाच्या गुढीपाडव्याला म्हणजेच २२ मार्च २०२३ रोजी दुपारी काढण्यात आलेल्या या गावातील पहिल्या स्वागतयात्रेत कुर्ध्यासह आजूबाजूच्या गावांतील मंडळी मोठ्या उत्साहाने सहभागी झाली होती.
मोठमोठ्या शहरांतून गेली अनेक वर्षे चैत्र शुद्ध प्रतिपदेला नववर्ष स्वागतयात्रा मोठ्या प्रमाणावर आयोजित केल्या जातात; मात्र ग्रामीण भागात या दिवशी शोभायात्रा किंवा स्वागतयात्रा काढण्याची प्रथा फारशी दिसत नाही. या पार्श्वभूमीवर कुर्धे ग्रामस्थांनी यंदा एक नवीन पायंडा सुरू करून गावात नववर्ष स्वागतयात्रा आयोजित केली होती. दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत बंडबेवाडीतून निघून देशमुखवाडी, शिंदेवाडीमार्गे ही यात्रा कुर्धे हायस्कूलच्या मैदानावर आली आणि तिथे या यात्रेची सांगता झाली. त्यानंतर रत्नागिरीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महामार्ग संपर्क प्रमुख ॲड. प्रकाश रिसबूड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या स्वागतयात्रेत कुर्धे ग्रामस्थांसह मेर्वी, पूर्णगड, गणेशगुळे या आजूबाजूच्या गावांतील मिळून १००हून अधिक नागरिक सहभागी झाले होते. या यात्रेतील चित्ररथात मराठी शाळेतील लहान मुले राम, सीता, लक्ष्मण, राधा, कृष्ण यांच्या वेशभूषेत सहभागी झाली होती. ढोल,ताशे आणि लेझीमच्या तालात, भगवे झेंडे उंचावत आणि घोषणा देत उत्साह आणि जल्लोषात ही स्वागतयात्रा पार पडली. नव्याने ही परंपरा सुरू केल्यामुळे या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. सकल हिंदू समाजाच्या संघटनाची गरज विशद करून स्वागतयात्रा नियोजन समितीने या उपक्रमामागचा हेतू व्यक्त केला आणि आता दर वर्षी नववर्ष स्वागतयात्रेचे आयोजन करण्याचा निर्धार या प्रसंगी व्यक्त करण्यात आला.
(अधिक फोटो, व्हिडिओ पाहा पुढील लिंकवर…)

