
रत्नागिरी : सर्वच क्षेत्रात करिअर संधी आहेत. परंतु विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे करिअर करावे. सध्या बीसीए, नर्सिंग आणि फॅशन डिझायनिंग या क्षेत्रात सर्वाधिक करिअरच्या संधी आहेत. स्वतःची क्षमता, पात्रता पाहून आणि देशासाठी काय करू शकतो ही भावना ठेवावी. पैसाकेंद्रित करिअर नको तर कर्तृत्वकेंद्रित करिअर करा, असा मोलाचा सल्ला करिअर समुपदेशक प्रा. विजय नवले यांनी दिला.

इयत्ता बारावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थी, पालकांसाठी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिरगाव प्रकल्पातर्फे मराठा भवन मंगल कार्यालयात त्यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला. सुरवातीला भारतमाता, संस्थापक भारतरत्न महर्षी कर्वे आणि बाया कर्वे यांच्या प्रतिमांना वंदन करून मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले. त्यानंतर प्रा. नवले यांचा सत्कार प्रकल्प प्रमुख मंदार सावंतदेसाई यांनी केला.
कार्यक्रमात प्रा. नवले यांनी छोट्या छोट्या उदाहरणांमधून करिअर कसे निवडावे हे सांगितले. ते म्हणाले की, सध्या शासकीय नोकऱ्या नसल्यामुळे उद्योजक होण्यासाठी मोठी संधी आहे. लग्नकार्य असो वा कोणताही कार्यक्रम, सर्व सेवा पुरवल्या जातात. या सेवा देणारे नवउद्योजक तयार होत आहेत. अशा सेवा देण्यासाठी कौशल्य विकसित करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पारंपरिक शिक्षणासह आपल्या क्षमता, पात्रता यांचा विचार करून कौशल्य अभ्यासक्रमाकडे वळले पाहिजे.
प्रा. नवले यांनी सांगितले की, प्रथम आपले उद्दिष्ट निश्चित करावे. त्या दिशेने पावले टाकावीत, सातत्याने मेहनत केली पाहिजे. कौशल्य विकासासाठी सहा महिने, १ वर्ष कालावधीचे अभ्यासक्रम घ्यावेत. त्यामुळे आपल्याला प्रत्यक्ष ज्ञानही मिळते. यश मिळवायचे आहे, हे चित्र दृष्टीसमोर उभे करायचे. देहभान विसरून कष्ट केले पाहिजेत. तर चांगले करिअर होऊ शकते.
कार्यक्रमात महर्षी कर्वे संस्थेच्या बीसीए कॉलेजच्या प्र. प्राचार्य स्नेहा कोतवडेकर यांनी बीसीए अभ्यासक्रम आणि संस्थेविषयी माहिती दिली. संस्थेच्या लवकरच सुरू होणाऱ्या नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या अक्षता तेंडुलकर यांनी नर्सिंग कॉलेजची वैशिष्ट्ये सांगितली. प्रकल्प समन्वयक स्वप्नील सावंत यांनी बाया कर्वे कौशल्य विकास केंद्रातर्फे सुरू होणाऱ्या कमी कालावधीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती सांगितली. प्रा. प्रतिभा लोंढे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला स्थानीय व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रकाश सोहनी, सीए आनंद पंडित आदी उपस्थित होते. निमिषा शेट्ये यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. केतन पाथरे यांनी आभार मानले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड