रत्नागिरी : येथील भारत शिक्षण मंडळाच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात तिसरी-चौथीच्या विद्यार्थ्यांनी व्यापारी बनून गणिताचे धडे घेतले.
शाळेत आयोजित केलेल्या आनंद बाजारात अनेक प्रकारच्या शालोपयोगी वस्तू, घरगुती वस्तू, फळे, भाजीपाला आणि खाद्यपदार्थ विक्री करून ते व्यवहारज्ञान शिकले. शाळेत प्रथमच आयोजित या बाजाराचे उद्घाटन रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष गणेश भिंगार्डे आणि शाळा समिती अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर यांनी केले.



शाळेच्या पटांगणावर सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत बाजार भरला. या उपक्रमात जवळपास एक हजारांहून अधिक ग्राहकांनी अनेक प्रकारच्या वस्तू खरेदी केल्या. बाजाराच्या उद्घाटनाप्रसंगी भारत शिक्षण मंडळ सदस्य व उद्योजक अनंत आगाशे यांनी श्रीफळ वाढवले. यावेळी शाळा समिती अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, भारत शिक्षण मंडळाचे कार्यवाह दादा वणजू, सतीश दळी, रत्नागिरी जिल्हा कन्झ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युशन फेडरेशनचे सचिव तुषार मलुष्टे, प्रबंधक विनायक हातखंबकर, चंद्रकांत घवाळी, संजय चव्हाण, मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम, सर्व शिक्षक, बियाणी बालमंदिरच्या मुख्याध्यापिका प्रमोदिनी शेट्ये, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. ज्येष्ठ शिक्षिका भारती खेडेकर यांनी स्वागत केले. मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम यांनी आनंद बाजारासाठी पालक, शाळा व्यवस्थापन आणि व्यापारी बंधूंचे सहकार्य लाभल्याचे सांगितले. सुधीर शिंदे यांनी आभार मानले.
गणेशशेठ भिंगार्डे यांनी शाळेच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. बाजारात विद्यार्थी खरेदीसाठी गेले तर त्यांना व्यवहारज्ञान कळणे आवश्यक असून या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना हे ज्ञान मिळेल. लागणारे सर्व सहकार्य व्यापारी महासंघ करेल, अशी ग्वाही भिंगार्डे यांनी दिली. शाळा समिती अध्यक्ष डॉ. केळकर यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. दरवर्षी हा आनंद बाजार भरवूया, असे कार्यवाह वणजू यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना गणितातील संकल्पना, बेरीज-वजाबाकी व व्यवहारज्ञान सुलभपणे कळणे आवश्यक आहे. याकरिता प्रथमच तिसरी- चौथीच्या विद्यार्थ्यांना व्यापारी बनवण्यात आले. पाच रुपयाला चणे, शेंगदाणे- वाटाणे विक्री करणारे बालव्यापारी ग्राहकांना बोलवत होते, तर भेळेच्या स्टॉलवर सर्वाधिक गर्दी पाहायला मिळाली. ताजी भाजी खरेदीसाठीही पालकांची गर्दी होती. कडक उन्हाळ्यामुळे कलिंगडाच्या फोडी खायला गर्दी झाली. शालोपयोगी वस्तू, वह्या, पेन, पेन्सील घेण्यासाठीही मुलांची झुंबड उडाली. आगाशे शाळेसह पटवर्धन हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनीही या खरेदीचा आनंद लुटला.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड