रत्नागिरी : येथील खारवी समाज विकास पतसंस्थेच्या सौ. दीप्ती देवेंद्र कोळथरकर आणि कु. प्रथमा मिरजुळकर या दोघींचा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने सन्मान केला.
फेडरेशनतर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सक्षम सहकार, सक्षम महिला पुरस्कार बेस्ट प्यून ते बेस्ट अध्यक्ष अशा विविध पदांवर पतसंस्थांमधून काम करणाऱ्या महिलांकरिता पुरस्कारांचे वितरण काल (दि. २४ मार्च) नाशिक येथे झाले. नाशिक येथे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार यांच्या हस्ते आणि फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे याच्या उपस्थितीत हा समारंभ झाला. यावेळी मंचावर बँकर व अभिनेत्री आशाताई शेलार नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे, सीमाताई हिरे, राज्य महिला आयोगाच् अध्यक्ष रूपालीताई चाकणकर उपस्थित होत्या.
यावेळी खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या सौ.दीप्ती कोळथरकर यांना बेस्ट डायरेक्टर, सक्षम सहकार, सक्षम महिला पुरस्कार देण्यात आला. सौ. कोळथरकर संस्थेच्या स्थापनेपासूनच डायरेक्टर म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पाडत आहेत. त्या दाभोळ शाखेच्या यशस्वी पालकत्वाच्या भूमिकेत आहेत. दीप्तीताई अंगणवाडी सेविका म्हणून २२ वर्षे, सरस्वती महिला मंडळाच्या १० वर्षे सेक्रेटरी आहेत. एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प दाभोळ मास्टर ट्रेनर -२ वर्षे, १९९५ पासून महिला बचत गट मार्गदर्शन, २० वर्षे स्वाध्याय परिवार केंद्र संचालक, १५ वर्षे बालसंस्कार केंद्र संचालक अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.
याच समारंभात पतसंस्थेच्या कु. प्रथमा मिरजुळकर यांना बेस्ट क्लार्क, सक्षम सहकार, सक्षम महिला पुरस्कार देण्यात आला. कु. मिरजुळकर यांचे शिक्षण बीकॉम, जीडीसी अँड एपर्यंत झाले आहे. गेल्या ८ फेब्रुवारीपासून त्या खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेत क्लार्क म्हणून काम करत आहेत.



