पुणे : विश्व मराठी परिषदेने जीवनाचे व्यवस्थापन या विषयावर येत्या मंगळवारपासून (दि. २८ मार्च) चार दिवसांची ऑनलाइन मोफत कार्यशाळा आयोजित केली आहे.
जन्माला येऊन मरेपर्यंत केवळ पशूसारखे जगणे हा मानवी जीवनाचा उद्देश नाही. जीवनाचा प्रवास अत्यंत विलक्षण आणि अद्भुत असतो. प्रत्येकाचे जीवन एक कादंबरी किंवा चित्रपटाची कथा असते. नियतीचे आणि प्रारब्धाचे नानाविध आविष्कार प्रत्येकाच्या जीवनात असतात. माणूस काळा असो की गोरा, गरीब असो की श्रीमंत, खेड्यातला असो की शहरातला, स्त्री असो की पुरुष, त्याला जीवनामध्ये अनंत प्रकारच्या अतर्क्य आव्हानांना आणि तितक्याच गमती-जमतींना अनुभवावे लागते. भोग, उपभोग, प्रारब्ध, नियती, अपघात, आनंदोत्सव, कृतार्थता, हतबलता, असहाय्यता, जल्लोष अशा नानाविध अलंकारांनी मानवी जीवन नटलेले असते.
अशावेळी शहाण्या माणसांनी जीवनाचे व्यवस्थापन करणे अतिशय आवश्यक असते. यशस्वी, समाधानी आणि कृतार्थ जीवन जगण्यासाठी जीवनाचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. त्यासाठी जीवन म्हणजे काय ते समजून घेणे आवश्यक आहे. तसेच यशस्वी जीवन म्हणजे नेमके काय, तेही समजून घेतले पाहिजे. अनेकदा आपल्याला वाटते की व्यवस्थापन वगैरे या व्यावसायिक कल्पना आहेत. त्याचा व्यक्तिगत आणि कौटुंबिक आयुष्यबरोबर काही संबंध नाही. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी अशा प्रकारचे लोक एकीकडे दिसतात तर काहीजण सतत कार्यमग्न आणि धावपळ करताना, चिंता करताना दिसतात. मात्र जीवनाचा मूलभूत विचार समजून घेतला तरच सर्वार्थाने समृद्ध, आनंदी आणि समाधानी जीवन जगता येते. विशेषतः तरुणांसाठी, युवक युवतींसाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरेल.
त्यासाठीच ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून सुप्रसिद्ध लेखक, वक्ता, भारतविद्या तज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, डिजिटल माध्यम तज्ज्ञ आणि भीष्म स्कूल ऑफ इंडिक स्टडीजचे संचालक प्रा. क्षितिज पाटुकले मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेत जीवनाचे स्वरूप आणि व्याप्ती, जीवनाची विविध अंगे आणि आयाम, व्यक्ती म्हणजे काय? व्यक्तित्व म्हणजे काय? व्यक्तित्वाचा परीघ? कार्यक्षमता आणि त्याचा विकास, व्यवस्थापनाची तत्त्वे, आर्थिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक व्यवस्थापन, वयोमानानुसार जीवनातील विविध टप्पे (ब्रह्मचर्याश्रम- विद्यार्थी जीवन, गृहस्थाश्रम- विवाहोत्तर जीवन, वानप्रस्थाश्रम- निवृत्तीनंतरचे जीवन, संन्यासाश्रम- आनंदी जीवनांत), यशस्वी जीवन म्हणजे नक्की काय? संतुलित जीवनाचे मापदंड – चार पुरुषार्थ (धर्म, अर्थ, काम, मोक्ष), पंचमहाभूते आणि पंचकोष म्हणजे काय ? पंचकोषांचे व्यवस्थापन, विविध इषणा इच्छा, जन्म आणि मृत्यू विचार, कुटुंब व्यवस्था, व्यष्टी, समष्टी, परमेष्टी म्हणजे व्यक्ती, समाज, निसर्ग यांचे संतुलन, इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.
येत्या २८ ते ३१ मार्च या कालावधीत दररोज सायंकाळी ८ ते ९ या वेळेत एक तासाची ही कार्यशाळा होणार आहे. अधिक माहितीसाठी समन्वयक स्वाती यादव (9673998600) किंवा मुख्य संयोजक प्रा. अनिकेत पाटील (7507207645) यांच्याशी संपर्क साधावा.
कार्यशाळेत मोबाइलवर झूम अॅप्लिकेशनद्वारे ऑनलाइन नावनोंदणीसाठी लिंक –
www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/lifemanagement


